रक्ताळल्या हातांचे सांगणे हेच आता 
मी घेतलेत काटे तू फुले वेच आता 
याच्यात प्राण नाही त्यालाही कान नाही
सारी मुखे पहातो मी मुक्यानेच आता 
प्यादे पळून गेले फासे झिजून गेले 
डाव चल उभारू हा नव्यानेच आता 
आम्ही कधी न केले कोणास दार बंद
ये वारीयासवेने सारे खुलेच आता 
उपमा नवीन शोधा आता जनावरांना 
आहेत हिंस्त्र झाली हि माणसेच आता 
निवडून कोण आला खड्ड्यात त्यास घाला 
मंत्री कुठे धनाचे ते बाहुलेच आता 
दरवाढ पृथ्वीवरी स्वर्गात नाही जागा 
नरकात सूट आहे जावे तिथेच आता 
फेडूनिया कटीचे माथ्यास बांधलेले 
कर 'डोळेझाक' दुनिये 'ते' नागवेच आता  
उस्फुर्तला कवी नि प्रतिभेस पूर आला 
उतरती शब्द पानी हे ओळीनेच आता 
हासला विदुषक पाहून आसवे का ?
कि भासती मुखवटे चेहरेच आता 
ओठात तुझ्या काही अर्थात काही बाही 
होती सवाल सारी का उत्तरेच आता ?
या क्षणी पास येशी त्या क्षणी दूर जाशी 
अर्थ काय याचा ? ( मज नवा 'पेच' आता )
शब्दांसवे असा का तू खेळशी 'विशाला'
झाली पुरे रोख ना हि 'रस्सीखेच' आता 
------विशाल 
No comments:
Post a Comment