Thursday, May 23, 2019

भय इथले संपत नाही

गर्द निबिड रात्रीत
साथीला केवळ शब्द
ओठात गोठले गाणे
भोवती सर्व निस्तब्ध
मी लयीत चालतो तरीही
पायात वाट भरकटते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

एकांती विरतो देह
अलवार धुक्यात तमाच्या
नावास निळाई उरते
काठावर दग्ध मनाच्या
गाथेतील अभंग ओळ
अस्तित्व दुभंगत जाते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

स्तोत्रात झिंगले पाप
मरणांत छंद पेशींना
रक्तातील खुळे आलाप
गात्रात छेडती वीणा
दिसते ते नसते बहुधा
नसते ते फिरुनी दिसते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

- विशाल (२४/०५/२०१९)

Sunday, April 21, 2019

अंतराय

शल्य कैवल्याचे बाई
दुःख रानोमाळ जळे
रक्त गोठून गोठून
नसानसात साखळे

नाद कांचनमृगाचा
ओलांडते बाई रेघ
वेणी सोडून मोकळी
बोलावते काळा मेघ

कोरी साखर साखर
दुधामधे विरघळे
बाई नाचते रानात
घाम चोळीत निथळे

उभी रात घाली डोळा
ओल्या दवाचा उखाणा
श्वास रोखून थांबला
आहे झाडाशी पाहुणा

धावे दाराकडे बाई
फाटे पळताना ऊर
गाठ गाठीला असू दे
पुढे जायचंय दूर

नभ झरू दे कितीही
किती हंबरु दे गाई
काटा रुतेल पायात
मागे वळू नको बाई

नाद लागता खुळाचा
काय बाप कोण माय
बाण सुटल्यावरी गे
पुढे ठेव अंतराय

- विशाल (२२/०४/२०१९)

Saturday, April 13, 2019

प्रचिती

आयुष्यामधे या
केले असे कांड
जाहलो प्रकांड
पंडित मी

अनुभव सारे
बांधले गाठीशी
टाकली पाठीशी
सुखदुःखे

पूजा आरत्यांचे
आंधळे इशारे
खाजगी गाभारे
देवळात

खाजवली दाढी
शमविले कंड
असे थोर बंड
जोगीयाचे

तूच सांग आता
कोणती प्रचिती
वाट पाहू किती
माऊली गे

- विशाल (१३/०४/२०१९)

Thursday, April 4, 2019

सुबकता

घाल जरा मोकळेपणाला आवर
वाढला इथे चोरांचा आता वावर
टाळ विहरणे तंग घालुनी कपडे
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

म्यान कर त्या नजरेच्या तलवारी
थांबव मंद स्मितातील गोळाबारी
मिटुनी अधर कमान रोख ते बाण
भाळावर रुळता पाश धाड माघारी
निशस्त्र कशी तू ? देशी घाव मनावर
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

नाकात मोरणी ती रेखीव कशाला
झुलविशी फुलातून कानी जीव कशाला
ओठांचा रक्तीम घोर कमी का त्यात
हा चवथीचंद्र माथी कोरीव कशाला
सालंकृत चढते कर्ज अलंकारावर
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

भरली मादकता ठासुनिया अंगात
मग म्हणू कसे तव आहे भोळी जात
हर उभार ताशीव असा घडवला यत्ने
ना चित्र बने ना हो वर्णन शब्दात
स्वर्गस्थ सुंदरी जणू तू भूमीतलावर
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

- विशाल (०४/०४/२०१९)