Tuesday, August 2, 2016

हल्ली मी एकटा नसतोच बहुधा

हल्ली मी एकटा नसतोच बहुधा ...
अगदी तिची आठवण नसली तरी सोबत असतेच कोणी ना कोणी ... भटसाहेब ग्रेस गुलजार आदी
कधी भटसाहेब गुणगुणत असतात सरणावर जाताना कळलेली गझल ...
कधी ग्रेस सांगत असतात न संपणाऱ्या भयाचा अर्थ किंवा ती गेली तेव्हाची गोष्ट ..
कधी गुलजार आसुसलेले असतात मराठीत येण्यासाठी ...
कधी शैलेंद्र गीत लिहितात मुकेश ते म्हणून दाखवतात तर कधी रफीसाहेबांच्या आवाजावर मी आणि शम्मी मान डोलावतो...
बऱ्याचवेळा असेही होते कि एखादा न आठवलेला किंवा माहीतच नसलेला अनामिक आवाज पूर्ण प्रवासात साथ देतो.. एकच गाणे पुन्हा पुन्हा म्हणून दाखवतो जणू काही आयुष्य त्या सुरवात आणि शेवटात थांबलंय...
.
.
हल्ली मी एकटा नसतोच बहुधा ... सोबत असतेच कोणी ना कोणी..

--- विशाल (०३.०८.२०१६)

त्यादिवशी सापशिडीच्या खेळात

आठवतं.. त्यादिवशी सापशिडीच्या खेळात २ चे दान पडून, ९८व्या घरातल्या सापाने मला खाल्ले होते. आणि ६७व्या घरावर घसरलो होतो मी ...
किती  खळखळून हसली होतीस. आणि पुढे खेळण्याऐवजी दिलीस एक मोठी जांभई. म्हणालीस झोप आलीये रे खूप, शिल्लक डाव नंतर खेळू. ...
.
.
.
अजूनही तो डाव अर्ध्यावरच आहे....
तो बोर्ड, ते फासे.. सापडत नाहीयेत आता ...
आणि तूही ...
डाव अर्ध्यावर आहे ... अजूनही ..

-- विशाल (०२.०८.२०१६)