Wednesday, October 11, 2017

थराला चालले आहे


थराला चालले आहे तुझे हे वेड स्मरणांचे 
कशाला पाहिजे ओझे तमाला चंद्रकिरणांचे 

शिकाऱ्यासारखे कोणी नये थांबूच पाणोठी 
उगा येतात रे काठी कळप व्याकुळ हरणांचे 

नदी ओंकार गाताना वृथा ही वाहिली शाई
अभंगाला पुरे होते किनारे दोन चरणांचे

क्षणाची पूर्तता थोटी मनाची सार्थता खोटी
अशाने काय उमगावे तुला कैवल्य मरणांचे

धरेचे त्या नभासंगे असे संधान आहे की
इथे ही भूक जन्माची तिथे ते राज्य कुरणांचे

अकाली षंढता येते अवेळी चेवही येतो
ठिबकते वीर्य अस्थानी करावे काय स्फुरणांचे

:- वैभव जोशी 

1 comment: