Tuesday, August 4, 2015

वेग (शतशब्दकथा)

"किती हळू चालवतोस रे. मागचे सगळे गेले पुढे"
"जाऊ दे गं. एकतर पावसामुळे रस्ता निसरडा झालाय"
"किती घाबरतोस रे जीवाला. लग्नाआधी किती बिनधास्त होतास"
"ती गोष्ट वेगळी होती. जबाबदारी नव्हती. आता तू आहेस. पिलू आहे. तुला सांगतो पिलू झाल्यापासून गाडी कधी ४०-५०च्या पुढे न्यावीशी वाटतच नाही. जरा वेग वाढला की ती येते डोळ्यासमोर आणि आपोआप ब्रेकवर पाय जातो"
"किती जपतो जीवाला. पण अंधार पडायच्या आत पोचायचे ना. पिलू वाट पहातीये. आता तर पाउस पण वाढायलाय. केवढा आवाज येतोय"
"हं.. पण हा पाउस नाही. कसलेतरी बारीक दगड आणि माती पडतीये काचेवर"
"गाडी थांबवून बघ जरा"
.
.
.

** काल घाटात चारचाकीवर दरड कोसळून दोनजण ठार**


--- विशाल 

No comments:

Post a Comment