Friday, May 25, 2012

मरीन ड्राईव

दिवसभर मर मर राबल्यानंतर... यावे थोडा वेळ शांत समुद्रावर .. जमलेच तर .. लागलेली थोडीशी भूक दाबून .. बसावे एकटेच काहीवेळ .. भरून घ्यावा श्वास ऊर फाटेस्तोवर .. आणि लगेच सोडावा एक नि:श्वास .. आणि सोबतच सगळ्या चिंता,तक्रारी, कटकटी , मत्सर , द्वेष .. उगीच लावावा कोणालातरी फोन नि बोलावे निरर्थक काहीही.. अगदी त्याची इच्छा नसतानाही .. गुणगुणावे एखादे जुने गीत ओठातल्या ओठात .. पहावे शुन्यपणे सागर क्षितिजावर .. अगदी नजर पोहोचते तिथपर्यंत .. आणि त्याच नजरेने मागे फिरून धावत यावे.. लाटांसोबत किना-याकडे .. पहाव्या किना-याजवळच  उभ्या दोन होड्या .. पाण्यावर वाऱ्याने डूलणा-या .. आणि मग कोण काय म्हणेल याची पर्वा न करता स्वत:शीच हसावे.. आयुष्यावर.. नशिबाच्या पुंगीवर  डूलणा-या ..
लिहाव्यात दोन ओळी.. रस्त्यावरील दिव्याच्या किना-यापर्यंत पसरलेल्या अंधुकशा प्रकाशात .. वाट्टेल त्या वाट्टेल तशा ..
स्वत:लाच समजून घेण्यासाठी .. कधीतरी .. दिवसभर मर मर राबल्यानंतर .. नक्की .. यावे थोडा वेळ काढून .. स्वतासाठी ..
--- विशाल (मरीन ड्राईव २५/५/२०१२,संध्या ८.०० )

No comments:

Post a Comment