"का कुणास
ठाऊक पण ऑफिसमधून
आज दुपारी ३
लाच बाहेर पडलो. कोणालाच
न सांगता . खाली
पार्किंग मध्ये पहातो तर
काय बाइक गायब.
अरे बाप रे
! डायरेक्ट पोलिस स्टेशनला जायला
हवे म्हणून निघालो तर गेटवरच
बस हजर. अगदी
पोलिस स्टेशन च्या
पाटीसहीत. याआधी अशा पाटीची
बस कधी पाहिली
नव्हती . बर बस
मध्ये बसलो तर
मी सोडून कोणीच
नव्हते. अगदी कंडक्टरसुद्धा
. बस सुरु झाली
आणि भरधाव वेगाने
निघाली कि खिडकीबाहेरचे
काहीच दिसत नव्हते.
ती थांबल्यावर उतरलो
नि पहातो तर
समोर आफ्रिकेचे जंगल
. तसाच जंगलातून चालू लागलो.
समोर कॅलेंडरवर दिवसामागून
दिवस उलटत होते
. शेवटी जंगल संपले
नि पुढे सहारा
वाळवंट पसरले होते. तिथे
बिल गेट्स उभा
होता हातात पुष्पगुच्छ
घेऊन. त्याने मला
मिठी मारली आणि
जंगल पार केल्याच्या
कष्टाचे फळ म्हणून
कंपनीचे पार्टनरशिप ऑफर केली.
आणि अचानक तिथे
शाहरुख खान प्रकट
होऊन बॅंडबाजा वाजू
लागला. पण हा
बॅंडचा आवाज वेगळा
का आहे? टिंग
टिंग टिंग … टिंग
टिंग टिंग … टिंग
टिंग टिंग”
काही
कळले काय झाले
? अहो याला म्हणतात
-
"द सक्सेशन्स
ऑफ इमेजेस, आइडियाज्,
इमोशन्स अँड सेन्सेशन्स
दॅट ऑकर इनवोलुन्टरीली
इन द माइंड
ड्युरिंग सर्टन स्टेजेस ऑफ
स्लीप, द कंटेंट
अँड पर्पज ऑफ
विच आर नॉट
डेफिनिटीवली अंडरस्टूड दो दे
हॅव बीन अ
टॉपिक ऑफ साइंटीफिक
स्पेक्यूलेशन, एज वेल
एज अ सब्जेक्ट
ऑफ फिलोसोफिकल अँड
रिलिजिअस इंटरेस्ट, थ्रूआउट रेकोर्डेड
हिस्टरी " (बाबा रान्चोदास
छांचड प्रसन्न )
सीधी
भाषामे बोले तो - दिमागका केमिकल लोचा
(इति श्री मुन्नाभाई
उवाच ) , इंग्लिशमे
ड्रिम, हिंदीमे ख्वाब, ग्रामीण
भाषेत सपान आणि शुद्ध मराठीत
स्वप्न.
स्वप्न
म्हणजे मनाचा आरसा असतो, मनी वसे ते स्वप्नी दिसे वगैरे आपण नेहमीच ऐकत आलोय. पण यात
कितपत तथ्य आहे याबद्दल शंकाच आहे. म्हणजे बऱ्याचवेळा आपल्या मनातील गोष्टींचा आणि
स्वप्नाचा काडीमात्र संबंध लागत नाहि. स्वप्न का पडते? कसे पडते? कोणत्या विषयी कोणते
स्वप्न कधी पडेल? वगैरे प्रश्नांची उत्तरे त्या क्षेत्रातील जाणकार शोधत आहेतच. पुराणापासून
आधुनिक विज्ञानापर्यंत आजपावतो अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. स्वप्नांना नियंत्रित
करून आपल्याला हवे तेव्हा हवे ते दाखवणारे यंत्र शोधण्याच्या मागे काही शास्त्रज्ञ
असल्याचे ऐकिवात आहे. पण आपल्याला त्यात रस वाटत नाही. अचानक पडणाऱ्या चित्रविचित्र
स्वप्नांनी होणारे मनोरंजन अनुभवण्यात जी मजा आहे ती ज्याची त्यानेच घ्यावी.
लहानपणी
कधीतरी कुठेतरी दोन शब्द ऐकले ‘स्वप्नाळू डोळे’, तेव्हा आरशात कितीतरी वेळ डोळे पहात
बसायचो. आदल्या रात्री पडलेले नि अर्धवट आठवणारे स्वप्न डोळ्यात आत कुठे दिसते का ते.
नंतर कळले कि अर्धवट बाहुल्या दिसणाऱ्या पेंगुळल्या डोळ्यांचेच गोड नाव स्वप्नाळू डोळे
असे आहे. पण स्वतःच्या स्वप्नाच्या पलीकडच्या स्वप्नाच्या जगाशी पहिला परिचय करून दिला
तो जंजीर मध्ये (स्वप्नाळू डोळ्यांच्या) अमिताभला पडत असलेल्या घोडा आणि साखळीच्या
स्वप्नाने. आणि तेव्हापासूनच असा स्वप्नातल्या गोष्टींचा भूतकाळाशी संबंध लाऊन आमच्या
भूतकाळातील एखादा खलनायकाची शोधमोहीम चालू झाली (त्याकाळी आम्हाला आमच्या शिक्षकांशिवाय
दुसरे कोणी दिसले नाही हि गोष्ट निराळी). अमिताभच्या 'देखा एक ख्वाब तो' म्हणत रेखासोबत
चालू झालेल्या सिल्सिल्यानेही त्याकाळी सगळ्यांना फार हलवले होते म्हणे. पण तो एकदमच
बच्चन होता राव. थोडे 'समजायला' लागल्यावर चोरून पाहिलेले 'लाइन ' चे स्माईल आणि त्यापुढे
होणाऱ्या सिल्सिल्यांचा, स्वप्नातही लवकरात लवकर भूतकाळ कसा होईल हि खबरदारी मात्र
आईने अंगावरचे पांघरून ओढून नक्कीच घेतली.
स्वप्नाबद्दलच्या
इतर अनेक गोष्टींमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे पहाटेची स्वप्न
खरी होणे. खरेच हो! म्हणजे बघा माधुरीचे लग्न झाले, ऐश्वर्याचे लग्न झाले, करीना पण
गेली आणि आता तर कॅट आणि दीपिकाची पण चर्चा आहे. नायिका बदलल्या पण त्यांच्याशी लग्नाचे
आमचे पहाटेचे गुलाबी स्वप्न खरे होण्याची वाट (आमचे स्वताचे लग्न झाले तरी) आम्ही खूप
आशेने अजूनही पहातो. पहाटे स्वप्न पडत नसले तरी बहुतेकांची ‘ही’ मनोकामना माझ्याहून
निराळी नसावी बहुतेक. "स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा" असे म्हणत
समस्त स्त्री वर्गाला यावर हरकत असेलही. पण मग अपूर्ण इच्छांचे ताण जर असेच स्वप्नात
विरून हलके होणार असतील तर त्या स्वप्नांना ‘दोष’ का द्या? साधू-संतांना पहाटेच्या
स्वप्नात प्रत्यक्ष भगवंतांनी दर्शन देऊन तळ्यात बुडालेली किंवा जमिनीत पुरलेली मूर्ती
दाखवल्याची स्वप्ने सकाळी उठल्यावर पूर्ण झाली आहेत मग आम्हा बापडांनी “आमच्या देव्यांचे
आम्हाला स्वप्नातही दर्शन होऊ नये” असा शाप मिळण्याएवढे काय पाप केले जरा कोणी सांगेल
का?
भयावह
स्वप्न हा तर एक वेगळाच विषय आहे. काही लोकांना म्हणे स्वप्नात भूत दिसते. आणि दिसते
ते दिसते वर प्रत्येकाला वेगळे वेगळे दिसते. लोक हे पाहून दचकून जागे होतात, दरदरून
घाम सुटतो वगैरे प्रकार होतात म्हणतात. दिवसभर असे भूताखेतांचे सिनेमे पहायचे, आम्ही
किती धाडसी आम्हाला भीती वाटत नाही असे म्हणत मिरवायचे नि रात्री असे झोपेचे खोब्रे
करून घ्यायचे. पण आपला तो पिंडच नाही ना. तसले
भयावह काही पहायला आवडतच नाही आणि त्यामुळे तसले ना विचार मनात येतात ना स्वप्ने. एकदा
स्वप्नात विक्रमराजा बनलो होतो. तेव्हा वेताळाचे प्रेत झाडावरून काढताच त्याची (आमच्या
वजन उचलण्याच्या क्षमतेनुसार) आलिया भट झाली आणि तिने २ स्टेट्स ची स्टोरी सांगून
"हे राजा विक्रमा आता जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या डोक्याची हजार शकले
होतील" म्हणल्यानंतर कोणाला जाग याविशी वाटेल हो.
स्वप्नाचे
मुख्य शत्रू गजराचे घड्याळ (गाजराचे किंवा गजऱ्याचे वाचू नये हि विनंती). बरोब्बर स्वप्न
मोडण्याची वेळ त्याला कशी कळते कुणास ठाऊक? किंवा ६ चा गजर लावला तर ३ तासाचे स्वप्न
३ वाजता चालू व्हायला हवे पण झोपेतही १०-१५ मिनिट उशिरा पोहोचायची आमची वाईट खोड काही
जात नाही बहुतेक. बरोब्बर "तो नादान भवरा त्या कळीच्या आजूबाजूस फिरताफिरता तिच्यावर
बसणार” … इतक्यात कानाजवळ “ओम गं गणपतये नमो नमः” चालू होते नि कोणीतरी अचानक कीटकनाशक
फवारल्यागत तो बिचारा उडत्या जागीच मरून पडतो. बरं अलार्म न लावावा किंवा गुपचूप ‘कोणाच्या’तरी
नकळत दोन तास पुढे करावा तर या अलार्म क्लॉक च्या खांद्याला खांदा लावून अंगावरून खस्सकन
ओढलेली चादर, सर्रकन उघडलेला पूर्वेकडच्या खिडकीचा पडदा, आणि कधी कधी अगदीच अटीतटीच्या
प्रसंगात पाण्याचा तांब्या सुद्धा आपापली कामगिरी नेहमीच चोख बजावताना दिसतात. त्यामुळे
अशा कितीतरी आघाड्यांवरती लढता लढता आता हल्ली स्वप्ने सुद्धा डेलीसोप सिरियल सारखी
रोज एपिसोड मध्ये ‘टू बी कंटीन्यूड’ ठेऊन मोडण्याचा सराव आम्ही लवकरच चालू करणार आहोत.
आता
तुम्ही किंवा काही लोक म्हणतात कि स्वप्ने पडणे म्हणजे झोप शांत न लागण्याची लक्षणे
आहेत. पण आम्हाला हे काही पटत नाहि. आईच्या गर्भातच मनुष्याचा स्वप्नप्रवास चालू होते
असे आम्ही वाचले आहे (कोठे विचारू नये). आणि स्वप्ने पडतातच त्यावेळी जेव्हा मनुष्य
त्याच्या झोपेच्या अत्त्युच्च क्षणात असतो. (हेही वाचलेलेच आहे). पण तुम्ही म्हणता
तसे हे सारे इथेच थांबते तर कदाचित आम्ही स्वप्न पहाणे सोडले असतेही पण. (हा ‘पण’च
नेहमी आमच्या बऱ्याच संकल्पांची सुरु होण्याआधीच काशी करतो) पण नाही ना. जरा कोणत्या
यशस्वी मनुष्याचे चरित्र उघडा
आणि प्रस्तावना वाचा
Reality Is Wrong, Dreams Are Real –
Tupac Shakur
Great Dreams of Great Dreamers Always
Come True – Dr A P J Abdul Kalam
Yesterday Is But Today’s Memory And
Tomorrow Is Today’s Dream – Khalil Gibran
To Accomplish Great Things We Must
Not Only Act, But Also Dream – Antole France
(जालाहून साभार)
हे
असले वाचले कि घोडे
अडते. कोणत्याही मध्यमवर्गीय सामान्य मराठी माणसासारखी आम्हालाही सुवर्ण भविष्यकाळ
घडवून इतिहासात नाव लिहिण्याची हौस आहेच कि. आमच्यातहि एखादा रतन टाटा किंवा धीरूभाई
लपलेला असून अशाच एखाद्या स्वप्नातून तो बाहेर येण्याची शक्यता आम्ही नाकारूच शकत नाही.
मग असे थोरामोठ्यांचे
म्हणणे टाळून स्वप्न पहाणे सोडून द्यायची
आमची काय बिशाद. बरोबर ना.
***The
End***
काय
म्हणालात ? माझ्या या लेखाला
साहित्याचे नोबेल भेटले ? खरेच?
पेपर
मध्ये फोटो आलाय
? बघू ...खरेचकि ? संध्याकाळी
नोबेल द्यायला ते
घरी येणार आहेत
? पोहे तयार आहेत
? बाहेर गल्लीत स्टेज बांधले
आहे ? बराक ओबामांच्या
हस्ते मी नोबेल
घेतोय? नोबेल पुरस्कारात गणपतीची
मूर्ती कधीपासून द्यायला लागले?
असो प्रचंड टाळ्या
… बॅंड …फटाके … डॉल्बी … डी
जे चालू… नाचो … कोणते
गाणे आहे ? ओम
गं गणपतये नमो
नमः श्री सिद्धिविनायक
नमो नमः …
--- विशाल
No comments:
Post a Comment