सोडली लावायची मी जात आता
घ्या मला कोणीतरी कळपात आता
प्यायचो तेव्हा कुठे झाले दगे ? पण
ग्लास भरलेलाच करतो घात आता
हारण्याची ही खरोखर हद्द झाली
सावलीही देत आहे मात आता
उरातला बारुद गेला भिजून कधीचा
फुसफूसते निव्वळ जिव्हेची वात आता
आठवणही येत नसावी तिजला माझी
मीही झिडकारतोच की एकांत आता
पाहून पिझ्झा बर्गर घेते धाव तान्हुले
भात मऊ, चिऊकाऊही ना खात आता
पोसत होता बाप तोवरी ऐष होती
रोजचेच भागविण्याची भ्रांत आता
जितके हासू दाटून येते चेहऱ्यावरी
तितके रण रक्ताळत जाते आत आता
काळजी सोडा जगाची.. हात जोडा
समीप येऊन ठाकला कल्पांत आता
काढशी कसले गळे आता विशाला
ऐकणारे झोपले बघ शांत आता
- विशाल (११/०१/२०१९)
No comments:
Post a Comment