Thursday, January 17, 2019

देव्हारा

तिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा
पहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा

वाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी
नाही  म्हणता तिने खळकन तुटला ना तारा

उभा ठाकला जगापुढे लेखणी धरून हाती
पण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा

बांधा कडीकुलपात हृदय लावा खडा पहारा
मोहाच्या त्या क्षणी नेमके देते गुंगारा

कंटाळून जगण्याला झालो असतो संन्याशी
दोन चिमुकले पाहून डोळे फिरलो माघारा

पटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या
आजकालच्या मुली मागती आधीच सातबारा

मी कुठे सुरुवात केली सांगण्या कहाणी
डोळ्यात का तुझ्या गं आधीच अश्रुधारा

इतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते
सुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा

ढेकरसुद्धा गिळला जातो पचवूनिया चारा
त्याशिवाय का असला लालू येतो आकारा

प्रत्येकाची आपली आपली दृष्टी पाहण्याची
कुणास दिसते गुहा वा ढोली, कोणास निवारा

ना वाटते कधीही मिळणार तव इशारा
ना वाटते कधी हा सरणार खेळ सारा

पूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे
घरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा

- विशाल (१८/०१/२०१९)

No comments:

Post a Comment