Monday, June 29, 2015

एक काम करण्याची परवानगी दे फक्त

रागाने झिडकारशील
स्वतःपासून दूर करशील
पण एक काम करण्याची परवानगी दे फक्त

मी बांधलेल्या मंगळसूत्राची वाटी
तुझ्या नकळत गळ्यात होईल पलटी
ती सरळ करण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

केसांच्या बटांची ती रेशीमडोर
लटक्याने  येईल डोळ्यांसमोर
ती मागे सारण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

घाईत कधी हळूवार
फसेल कुठेसा पदर
तो सोडवण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

रात्री एकांती कधी चमकेल वीज
दचकून अचानक तुटेल नीज
कुशीत घेऊन थोपटण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

तुजवीन सखे काय ठाव
कधी अर्ध्यावर मोडेल डाव
आठवणीत येण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त

--- विशाल

(भावानुवाद / प्रेरणा : गुलजार - मुझको_इतने_से_काम_पे_रख_लो)




Thursday, June 4, 2015

हाक

"आजच नेमके साहेबाला काम आठवले" सदा स्वत:शीच बोलत होता. "एक तर आज अमावास्या, त्यातच तो रोजचा रोड पालिकेने सकाळी खोदून ठेवलेला म्हणजे त्या आडवाटेने कच्च्या रस्त्याने स्मशानावरुन फिरून जावे लागणार म्हणून लवकर निघावे म्हणले तर ११ वाजवले xxxने" साहेबाला शिव्या घालीत गडबडीत सायकल ताणत असलेल्या सदाची तंद्री पत्र्याच्या खडखडाटाने मोडली.   पॅडल फिरेना म्हणून त्याने उतरून पाहिले. सायकलची चेन निसटलेली. आता सायकलच्या नावाने अजून दोन शिव्या तोंडातून बाहेर पडल्या. सदाने आजूबाजूला पाहिले. चिटपाखरुहि नव्हते. मागे पडलेला आणि पुढे असलेला दिव्याचा खांब दोन्ही मेणबत्ती एवढे दिसत होते. त्यामुळे तिथे थांबून चेन बसवायची सदाची हिम्मत होत नव्हती. सायकल तशीच ढकलत नेण्याचा निर्णय त्याने घेतला. अंधारामुळे घड्याळात किती वाजले तेही कळायला मार्ग नव्हता. दुरून नदीवरून सू सू वाहणारा बोचरा  वारा आणि सोबत आता सायकलच्या चेन चा लयबद्ध आवाज सदाच्या भीतीत अजूनच भर घालत होता. "एकतर आज अमावास्या, रात्रीची वेळ, त्यात आपला मनुष्यगण, अंधुक प्रकाशात काळीकुट्ट पिंपळाची एखादी दुसरी आकृती आणि आजूबाजूला टाकलेले उतारे म्हणजे स्मशानाचा भाग चालू झाला बहुतेक." थंडीपेक्षा असल्या एक ना अनेक विचारांनीच तो जास्त गारठला होता. हा स्मशानाचा भाग लवकरात लवकर कसा पार करता येईल आणि समोरच्या खांबावरील दिव्याच्या प्रकाशात सायकलची चेन लाऊन पटकन घर कसे गाठता येईल" म्हणून सदा 'राम राम' म्हणत झाप झाप पावले टाकू लागला. दूर स्मशान दिसायला लागले होते पण ‘तिकडे पहायचे नाही, पहायचे नाही’ असे स्वत:लाच बजावून देखीलहि एक नजर तिकडे गेलीच.
"अरे बापरे, यावेळेला चिता पेटलेली? अरे हो, संध्याकाळी उशीर होईल म्हणून केलेल्या फोन वर बायको म्हणाली होती कुलकर्ण्याचा म्हातारा दुपारी गेला. गेली सहा वर्षे अंथरुणावर काढली. अंगाची काडी झालेली पण तरी नव्वदी गाठली." त्याच्या चेहरा समोर येताच सदा थरारला. मनातले विचार झटकून त्याने नाइलाजाने दिव्याखाली सायकल थांबवली. खाली डोके करून लगबगीने चेन बसवायच्या प्रयत्नात असतानाच त्याला साद आली "सदा …" त्याने चमकून वर पाहिले. "आपल्याला भास झाला का? कि ….  ?"  . नाही नाही भासच असेल. दुर्लक्ष करु म्हणता म्हणता त्याची नजर स्मशानाकडे वळली  आणि सदा जागच्या जागी गोठला. चितेच्या प्रकाशात हातवारे करणारी आकृती पाहून त्याचा चेहरा पांढराफट्ट पडला. ओठातले रामनाम तर आधीच बंद झालेले. धुरात अधिकच विचित्र दिसणारा तो प्रकार आपल्याकडे सरकतोय असे त्याला वाटले. धडधड्णारे हृदय थरथरणाऱ्या हातांनी काबू करण्याचा प्रयत्न करीत सदा नकळत उभा राहिला. दुरून अस्पष्ट शब्द कानावर येत होते. '…… या …. खा …. माणसे …. " शेवटच्या शब्दाने मात्र सदाचा  धीर सुटला . सायकल तिथेच टाकून त्याने जी धूम ठोकली ते थेट घराच्या पायरीवरच येउन आदळला. धापा  टाकीत त्याने दार ठोठावले. हाक मारण्यासाठी तोंडातून आवाज फुटतच नव्हता. बायकोने दरवाजा उघडला कसाबसा आत येउन सदा तेथेच कोसळला. दरदरून घाम सुटला होता. अंग तापाने फणफणत होते. "नको… भूत … स्मशान …  खाणार… " तापात काहीतरी बरळत होता. त्याची हि अवस्था पाहून बायकोने डॉक्टरांना  फोन लावला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर रात्री उशिरा त्याची झोप लागली.
"सदानंद… अरे सदानंद… "सकाळी दिनकरच्या हाकेने सदाची झोपमोड झाली. बाहेर कसलातरी दंगा ऐकू येत होता
"बरे झाले आलात भाओजी" सदाची बायको दरवाजा उघडताच म्हणाली.
"हि सदाची सायकल ना? लाईटीच्या डांबाखाली पडलेली. कवरवर नाव बघून ओळखली. आणि घेऊन आलो. चेन पडल्या. बहुतेक चोर नेत असल पण चेन पडल्याने सोडून पळाला असल… बाकी बाहेर एवढा गलका चालू आहे आणि हा अजून झोपलाय ? … कुठे आहे सदानंद ?"
"अहो बघा ना.  कालपासून काय झालय यांना. कामावरून उशिरा आले. कसेतरीच करत होते. काहीबाही बरळत होते.  रात्रीपासून तापाने फणफणले आहेत नुसते."
"काय झाले सदानंद साहेब" खोलीच्या दारातून आत येत दिनकरने विचारले.
"सांगतो… " जरा त्रासलेल्या चेहऱ्यानेच सदा बोलला. "पण बाहेर हा गलका कसला चालू आहे सकाळपासून?"
"अरे नेहमीचेच रे. जाधवाचा विनू… त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय ना. सारखे चालूच असते.  त्याचीच काहीतरी गडबड आहे. सकाळी श्रीपती परसाकडे निघालेला. त्याला कुलकर्ण्याच्या चीतेपाशी हा विनू दिसला. काहीतरी भाजत होता. शेवटी वेडाच तो. काय करतोय विचारले तर म्हणला 'या …  रात्री नदीवरून मासे धरून आणलेत ताजे ताजे …भाजून ठेवलेत रात्रीच… खाणार का ?'. त्या कुलकर्ण्याच्या पोराला कळले तसा तराट धावत आला. आता पायतानाने पूजा चालू आहे त्याची… बर ते राहू दे …  तुला काय झाले ते सांग ""
दिनकरची शेवटची दोन वाक्ये सदाला ऐकूच गेली नाहीत. रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर पुन्हा यायला लागला … "…. या … खा … माणसे….  मासे…."
 
--- विशाल

Wednesday, May 27, 2015

निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर

पुरंदर मोहिम शनिवारी (२३.०५. २०१५) फत्ते झाली.

किल्ल्याबद्दल म्हणाल तर -
" निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर" याहून दुसरे शब्द सुचत नाही.

रस्ता माहित नसल्याने आणि रस्ता चुकायची जुनी सवय असल्याने जरा लवकरच म्हणजे सकाळी ६.३० ला घरातून निघालो, सौंसोबत दुचाकीवरून हडपसर-दिवे घाट-सासवड-पुरंदर (गाव) करत किल्ल्याच्या माचीपर्यंत पोचायला ८:३० झाले. उन्ह फारसे नसल्याने प्रवास मस्त झाला. किल्ल्यावर प्रवेश ९ वाजता होतो असे तिथे समजले (ओळखपत्र आणि दुचाकीवर हेल्मेट अनिवार्य ). मग तोपर्यंत तिथेच TP केल. शनिवार असून फारसे पर्यटक दिसले नाहित. ९ ला फाटकातून gate entry करून आत सोडले.

मुरारबाजींचा पुतळा, चर्च आणि काही पडीक घरे ओलांडल्यानंतर पार्किंग आहे तेथे पुन्हा in-time entry केली. तिथे आमचे mobile जमा करून घेतले (Camera मित्राने मधुचंद्रासाठी उसना नेल्याने सोबत नव्हता. नाहीतर उगाच ओझे वाहून तेथे फोटो काढताच आले नस्ते. जे होते चांगल्यासाठी होते ) तेवढ्यात तेथे प्रतिष्ठान चा बोर्ड लावलेल्या गाडीतून ७-८ मुले आली. कदाचित नेहमीचे कार्यकर्ते असावेत. गडावर बांधकाम आणि पाईपिंग चे काम चालू असल्याने अनेक ठिकाणी खोदून ठेवले होते. आर्मीच्या जवानाने दाखवलेल्या रस्त्याने आम्ही गड दर्शन चालू केले. ५-१० मिनिटात गडाच्या बुरुजांशी भेट झाली. पहिलीच भेट असल्याने स्वराज्याच्या त्या शिलेदारांना मिठी मारून आणि त्यायोगे सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना नमन करण्याचा मोह आवरला नाही. सौना कळलेच नाही मी दगडांना का मिठी मारतोय. पण सर दरवाज्यातून आत गेल्यावर पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे एक नवीन लावलेला भगवा जरीपटका काठी मोडून बुरुजावर बाहेरच्या बाजूस उलटा झालेला (आमच्या पुढे गेलेल्या प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना तो कसा दिसला नाही याचे आश्चर्य वाटले). तो तसा ठेऊन गड बघायला जाण्यासाठी पाउल उचलेना. तसाच वर चढून जिथे त्या ध्वजाचा स्तंभ मोडलेला तेथून फिरवून काढून ध्वज सरळ करून आणि बाजूला चालू असलेल्या बांधकामातून तार आणून तेथे सौंच्या मदतीने पुन्हा उभारला ( प्रचंड वाऱ्यामुळे आणि सौंना प्रयत्न करूनही बुरुजावर येता न आल्याने ध्वजाला हव्या त्या उंचीवर उभारू शकलो नाही हि खंत मनात कायम राहील )

त्यानंतर पुढे इमारतींचे पडलेले अवशेष पहात केदारेश्वर पर्यंत पोचायला १०:३०-११:०० वाजले. तिथल्या शेवटच्या बांधीव पायऱ्या सौंशी रेस लाऊन चढल्याने लागलेला श्वास काबूत आल्यानंतर केदारेश्वराचे दर्शन घेतले. शिवतांडवाचे (हे शिव शंकराचे एकच स्तोत्र येते ) पठन करून नंतर मंदिराबाहेर वाऱ्यात बसून सोबत आणलेल्या पराठे सॉस आणि हापूस आंब्यांचा नाश्ता करून पुन्हा परतीचा मार्ग धरला. सोबत कॅमेरा नसल्याने फोटो साठी थांबण्याचा प्रश्नच नव्हता.

उतरताना समोर आता डौलाने फडकणारा जरीपटका दिसत होता. वज्रगड समोर दिसत होता. परंतु तिकडचा प्रवेश तारांचे कुंपण टाकून बंद केला असल्याने जाउन पाहू शकलो नाही. येताना सौन्ना पुरंदरचा (माहित असलेला तसेच मिपा वरून समजलेला) इतिहास सांगत उतरलो. पुरंदरचा अर्थ, त्याचे इंद्रनील नाव, फत्तेखानचा आणि त्यारुपाने आदिलशाहीचा स्वराज्यातील पहिला मोठा पराभव, नेताजी पालकरांची किल्लेदारी, शंभू राजांचा जन्म, कापूरहोळ वरून येणारी त्यांची दुधाई. मिर्झा राजा जयसिंगांची स्वारी, पुरंदराचा वेढा, ४० मावळ्यांनी वेढ्यात शिरून निष्क्रिय केलेल्या तोफा, वज्र गडाचा पाडाव, पुरंदरची झुंज, उडालेला बुरुज , शत्रूने सुलतानढवा करण्याआधीच मराठ्यांचा अतितटीचा हल्ला , मुरारबाजींचे शौर्य, दिलेरखानाला दिलेले प्रत्युत्तर आणि बलिदान, किल्लेदार पडल्यानंतरहि बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी चालू ठेवलेला प्रतिकार, आणि अखेर पर्यंतचे पुरंदरचे अजिंक्यत्व (माझ्या माहितीप्रमाणे झुंज चालू असतानाच पुरंदर तहात मोगलांकडे गेला, त्याचा पराभव झाला नाही कि त्याने शरणागतीहि पत्करली नाही) अशी जेवढी असेल नसेल तेवढी माहिती सौंना दिल्यानंतर मी बुरुजाला मिठी मारून नमस्कार केल्याचे कारण तिला समजले. येताना छान करवंदे (रानमेवा) जमा करीत उतरलो. खाली हॉटेल मधून पाणी घेताना जवळ पुरन्दरेश्वराचे मंदिर दिसले (थोडे आतल्या बाजूला असल्याने रस्त्यावरून सहजासहजी दिसत नाही) तेथेही बांधकाम चालू होते. पुरंदरेश्वरच्या दर्शना नंतर येताना चर्च आणि बिनी दरवाजा पाहिला. जवळ उभ्या असलेल्या जवानाला विचारून आठवण म्हणून थोडे फोटो काढले. आणि गडावरून उतरते झालो. (संभाजी राजांचे जन्मस्थान पाहू शकलो नाही. तिथे कोठेही मार्गदर्शक फलक वगैरे नसल्याने आणि केदारेश्वराच्या मुख्य रस्त्यावर ते नसल्याने त्याचे ठिकाण कळले नाही. हॉटेल मध्ये विचारणा केल्यानंतर ते वरच असल्याचे कळाले पण पुन्हा वर जाणे शक्य नसल्याने खास ते ठिकाण पहायला पुन्हा येण्याचे ठरवून आम्ही साधारण १:०० च्या सुमारास माचीवरून दुचाकी घेऊन खाली प्रस्थान केले )

परतीच्या रस्त्यावरून पुन्हा गडाच्या बुरुजाकडे नजर टाकली. येताना तेथे नसलेला जरीपटका आता डौलाने फडकताना दिसत होता. पुरंदरची ती हवा अभिमानाने उरात भरून घेतली आणि खाली उतरलो.
येताना  नारायणगावचे एकमुखी दत्त आणि केतकावळ्याचे प्रतीबालाजी यांचे दर्शन घेऊन हायवेने पुण्याकडे निघालो
खाली काही छायाचित्र देत आहे. परंतु मोबाइल चा कॅमेरा आणि भर दुपारच्या उन्हामुळे खास फोटोग्राफी करावीशी वाटली नाही आणि करूही शकलो नाही
वज्रगड, चर्च आणि बिनी दरवाजा

पुरंदरेश्वर

चर्च

बिनी दरवाजा


मुरारबाजीं
 इतिहास


परतीच्या रस्त्यावरून
 

--- विशाल 

Monday, April 6, 2015

सये भांडतेस कशा

(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात )

सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा..
काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या
 
सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची
तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची
 
येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय
आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय
 
मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली
भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली 
 
या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून
मीठ उतरून टाक.. वारे पहाते वाकून
 
वारे पहाते वाकून, आहे गर्द तुझी खोली
माळ केसात मोगरा, वाट पहा गंधाळली
 
वाट गंधाळली सरे वीज कडाडे नभात
दार उघडण्याआधी जरा बघ आरशात

 
बघ दिसे आरशात, तुझा साजन बरवा
डोळ्या भिडताच डोळा, होई पदर हिरवा
 
--- विशाल