Showing posts with label सहज कविता. Show all posts
Showing posts with label सहज कविता. Show all posts

Sunday, October 27, 2019

जे करायचे ते कर जा

शिंकलो, जा जे करायचे ते कर जा
जिंकलो, जा जे करायचे ते कर जा

सांडलो, होऊनि रक्त मातीच्यासाठी,
भांडलो, जा जे करायचे ते कर जा

भंगलो, घाव घेऊन प्रीतीचे रक्तीम,
रंगलो, जा जे करायचे ते कर जा

तरसलो, जरी एकाच कटाक्षातूनी,
बरसलो, जा जे करायचे ते कर जा

पोळलो, जीवाचा यत्न करून विश्वाशी,
खेळलो, जा जे करायचे ते कर जा

टोचलो, त्यास नडला जो ध्येयप्राप्तीला,
पोचलो, जा जे करायचे ते कर जा

साचलो, कुठेही नाही जिथेही गेलो,
नाचलो, जा जे करायचे ते कर जा

खेटलो, थेट जाऊन सुबकता पाहता,
पेटलो, जा जे करायचे ते कर जा

झोपलो, शांत निर्धास्त वेळ आल्यावर,
लोपलो, जा जे करायचे ते कर जा

- विशाल (२७/१०/२०१९)

Saturday, October 19, 2019

राधा-मोहन

बावरली राधा दिसतेे ना दिसतो मोहन
फांदीवरुनी गंमत  बघतो हसतो मोहन

उधळीत वाळू फिरते राधा किनाऱ्यावरी
वाळूच्या कणकणात भरुनी असतो मोहन

मिलन ना तरी मनात केवळ राधा राधा
असती सोळा सहस्त्र  तरीही नसतो मोहन

घन दाटून येतात अचानक पाऊस येतो
झुरते तिकडे राधा इकडे झुरतो मोहन

तिथे रुक्मिणी भामा झगडे प्राजक्तावर
इथे राधेच्या रोमरोमात फुलतो  मोहन

तिन्ही लोक भरूनी त्याची माया जरीही
राधेला वगळून कितीसा उरतो मोहन

- विशाल (०५/०३/२०१९)

Wednesday, October 16, 2019

प्रारब्ध

माठाला जातो तडा, बाप बापुडा, काळजीत पडतो
माळ्यावर एकच घडा, तोही कोरडा, तान्हुला रडतो

अश्रूंचा सुटतो वेग, टाचेची भेग, सणाने कळ
नशिबाची पुसतो रेघ, भिजवतो मेघ, पाठीचा वळ

दाबून उरी हुंदका, राहुनी मुका, पाहिली दुनिया
जो उभा जीवाचा सखा, तोही पारखा, पाठ फिरवुनिया

मिणमिणतो नंदादीप, जाता समीप, वात थरथरते
इतके हे वारेमाप, जाहले पाप, रांजणी भरते

का झाड असे निस्तब्ध, फुटे ना शब्द, गळ्यातून काही
ते हवे तसे प्रारब्ध, कुठे उपलब्ध ? सांग ना आई

- विशाल (१७/१०/२०१९)

Friday, July 19, 2019

तरळले लोचनी आसू तिला हसवून जाताना

तरळले लोचनी आसू तिला हसवून जाताना
उरली वीण थोडी जन्म हा उसवून जाताना

न झाला हात कातर क्षणभरी थरथर सुद्धा नाही
न काही वाटले, खंजीर उरी धसवून जाताना ?

निघाली भेट कपटी जी सुगंधी वाटली तेव्हा
विषारी माळली होती फुले .. फसवून जाताना

तुटतो जीव, पाऊल रोज अडते उंबऱ्यामध्ये
पिलांना एकटे घरट्यामध्ये बसवून जाताना

देणे मातीचे आतातरी फिटले असेल बहुधा
रित्या हातीच गेला गाव तो वसवून जाताना

विना जाणीव घडलेले असे गारुड होते ते
पुंगीत गुंगले सारे ...साप डसवून जाताना

कुणी माळी महार कुणी इथे झाले तुका वाणी
मनावर भाव विठ्ठलमय असा ठसवून जाताना

- विशाल (१९/०७/२०१९)

Wednesday, June 19, 2019

फुलांचा बेत

देणे सुगंध, जोवर निर्माल्य होत नाही
बाकी तसा फुलांचा विशेष बेत नाही

तिची कट्यार आहे छातीत रुतून किंचित
जी आत जात नाही बाहेर येत नाही

तोडून बंध कुठल्या चकव्यात पाडले तू
रस्ता तुझ्याकडे मज कुठलाच नेत नाही

मीही कधी न त्यांच्या गर्दीत झालो सामील
त्यांनी कधीच मजला धरले जमेत नाही

कुठला धरू पुरावा तोडू कसा भरवसा
तुकडेच हे चितेवर अखंड प्रेत नाही

कर्जात शेत आमुचे लाटालही परंतु
रक्तातूनी मरेतो जाणार शेत नाही

आता जगास देऊ कुठला नवा बहाणा
तीही कवेत नाही... मीही नशेत नाही..

- विशाल (१९/०६/२०१९)

Saturday, June 8, 2019

धुळीची गोष्ट

सोसाट्याचा वारा आला
धूळ उडाली हवेत
पण येणे ठरलेले
याच भूमीच्या कवेत

धूळ आसमानी गेली
ढगासोबत मिळाली
झाला जोराचा पाऊस
सारी बंधने गळाली

वीज कडाडली मोठी
आला काळोख दाटून
जड होऊन आताशा
गेला ढगही फाटून

ढगा धूळ पेलवेना
दिले सोडून धुळीला
दंभ ढोंग त्या ढगाचे
आता कळले धुळीला

धूळ धरेवर आली
आसवांचा पूर झाला
मातीनेच दिला आसरा
ढग जेव्हा दूर पळाला

- विशाल (१९/०५/२००५)

एक आणखी प्याला

खाली झाला प्याला साकी
भर पुन्हा एकवार जाम
धुंदीत याच्या बुडल्यानंतर
होतील दुःखे सारी तमाम

विसरू दे आता जगाला
बुडवू दे मदिरेत त्याला
विसरतो मीही स्वतःला
पिऊन आणखी एक प्याला

जाणिवांच्या अक्षरावर
पसरू दे स्याही नशेची
रात्र सरो प्याल्यात अशी की
नको ती जुनी याद कशाची

आजच्याच या रात्रीसाठी
उठू दे सारी दारूबंदी
तुझ्या नशिल्या नयनामधुनी
वाढू दे प्याल्यातील धुंदी

जड जाहले नेत्र तरीही
आहे तुझीच मूर्ती समोर
ये जवळ ये पुन्हा आणिक
अखेरचा हा प्याला भर

- विशाल (०२/१२/२००५)

Tuesday, May 28, 2019

लागलो आता कुठे बोलायला

लागलो आता कुठे बोलायला
गारदी आले गळा कापायला

स्वप्न होते ते तुझे की पाश होता
प्राण फिरुनी लागला गुंतायला

सय तिची जेव्हा नभाच्या पार गेली
लागलो मी तारका मोजायला

खरडुनी केली आधी काया रीती
धावले मग सावली चोरायला

पावसाची फक्त फसवी हूल होती
मोर वेडे लागले नाचायला

अर्थ नाही अन्नपूर्णेचा असा की
आयुष्य जावे हे उभे रांधायला

- विशाल (२३/०५/२०१९)

सय तुझी

सय तुझी केव्हातरी जाते थराला
लागते अन बोचरी घरघर घराला

सागराने काय जादू सांग केली
भेटताना का नदी आली भराला

दान पेटीतील द्यावे त्या करांना
घडवती जे देव.. कोरून फत्तराला

जोडले नाते गुलाबाशी असे की
टोचती काटे सुगंधी अंतराला

या तीरावरल्या सुखांचा वीट आला
जीवना ने ना मला तू त्या तीराला

- विशाल (२७/०५/२०१९)

दिली साद त्यांनी

तिच्यावरील कवितेला दिली दाद त्यांनी
जुन्या वेदनेस फिरून दिली साद त्यांनी

शब्दांची जडली व्यसने अशी भयानक
जिंदगानी केली सारी बरबाद त्यांनी

चुकून सागरांना या समजलो मी शांत
वादळातून दाखविली अवकाद त्यांनी

भासले जे बंड ती वळवळ निघाली
चिरडले भीतीत जीव निष्पाद त्यांनी

कधी ना कधी तोल जाणार होता
दडपुन जपलेले मनी उन्माद त्यांनी

"मला वाटते.." एवढेच बोललो मी
विषय सोडुनी घातला वाद त्यांनी

जाताच दांभिकांच्या हातून दानपेटी
मोलभाव करुनी विकला प्रसाद त्यांनी

(ज्यांनी कधी न धरली बाजू विषयसुखाची
निलचित्र पाहताना केला प्रमाद त्यांनी )

- विशाल (२८/०५/२०१९)

Thursday, May 23, 2019

भय इथले संपत नाही

गर्द निबिड रात्रीत
साथीला केवळ शब्द
ओठात गोठले गाणे
भोवती सर्व निस्तब्ध
मी लयीत चालतो तरीही
पायात वाट भरकटते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

एकांती विरतो देह
अलवार धुक्यात तमाच्या
नावास निळाई उरते
काठावर दग्ध मनाच्या
गाथेतील अभंग ओळ
अस्तित्व दुभंगत जाते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

स्तोत्रात झिंगले पाप
मरणांत छंद पेशींना
रक्तातील खुळे आलाप
गात्रात छेडती वीणा
दिसते ते नसते बहुधा
नसते ते फिरुनी दिसते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

- विशाल (२४/०५/२०१९)

Sunday, April 21, 2019

अंतराय

शल्य कैवल्याचे बाई
दुःख रानोमाळ जळे
रक्त गोठून गोठून
नसानसात साखळे

नाद कांचनमृगाचा
ओलांडते बाई रेघ
वेणी सोडून मोकळी
बोलावते काळा मेघ

कोरी साखर साखर
दुधामधे विरघळे
बाई नाचते रानात
घाम चोळीत निथळे

उभी रात घाली डोळा
ओल्या दवाचा उखाणा
श्वास रोखून थांबला
आहे झाडाशी पाहुणा

धावे दाराकडे बाई
फाटे पळताना ऊर
गाठ गाठीला असू दे
पुढे जायचंय दूर

नभ झरू दे कितीही
किती हंबरु दे गाई
काटा रुतेल पायात
मागे वळू नको बाई

नाद लागता खुळाचा
काय बाप कोण माय
बाण सुटल्यावरी गे
पुढे ठेव अंतराय

- विशाल (२२/०४/२०१९)

Saturday, April 13, 2019

प्रचिती

आयुष्यामधे या
केले असे कांड
जाहलो प्रकांड
पंडित मी

अनुभव सारे
बांधले गाठीशी
टाकली पाठीशी
सुखदुःखे

पूजा आरत्यांचे
आंधळे इशारे
खाजगी गाभारे
देवळात

खाजवली दाढी
शमविले कंड
असे थोर बंड
जोगीयाचे

तूच सांग आता
कोणती प्रचिती
वाट पाहू किती
माऊली गे

- विशाल (१३/०४/२०१९)

Thursday, April 4, 2019

सुबकता

घाल जरा मोकळेपणाला आवर
वाढला इथे चोरांचा आता वावर
टाळ विहरणे तंग घालुनी कपडे
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

म्यान कर त्या नजरेच्या तलवारी
थांबव मंद स्मितातील गोळाबारी
मिटुनी अधर कमान रोख ते बाण
भाळावर रुळता पाश धाड माघारी
निशस्त्र कशी तू ? देशी घाव मनावर
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

नाकात मोरणी ती रेखीव कशाला
झुलविशी फुलातून कानी जीव कशाला
ओठांचा रक्तीम घोर कमी का त्यात
हा चवथीचंद्र माथी कोरीव कशाला
सालंकृत चढते कर्ज अलंकारावर
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

भरली मादकता ठासुनिया अंगात
मग म्हणू कसे तव आहे भोळी जात
हर उभार ताशीव असा घडवला यत्ने
ना चित्र बने ना हो वर्णन शब्दात
स्वर्गस्थ सुंदरी जणू तू भूमीतलावर
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

- विशाल (०४/०४/२०१९)

Monday, April 1, 2019

घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुला आठवता कागदावरी उतरून आली ओळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
स्पर्शता तुला विसरून गेलो करायची अंघोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुझ्या सयीने हृदयाच्या छिद्राचे झाले बोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुझ्या अदा टोमणे बहाणे मिसळून झाला कोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
झोप नाही रात्रीला सोबत घुबड नि वटवाघोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
पाहताच तू दुजाकडे उठतात आगीचे लोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
कोरेगाव तू पार्क पुण्यातील अन मी कापूरहोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
किती मारल्या उड्या तवपुढे जैसे बेडूक टोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तू पाहून मज हसता उठला केवढा गदारोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
लागून मागे तुझ्या जाहला पुरता बट्ट्याबोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुला पटविण्या चालू सारा कवितेचा हा झोळ
सखे गं घोळ झाला घोळ

-विशाल (०२/०४/२०१९)

भग्न राऊळाची व्यथा

जिथे राहिले भग्न अवशेष बाकी, वदे  कोण त्या राउळाची कथा
पुजारी म्हणे ओळखीचे पुरावे, न जाणे परी देवतेची व्यथा

शैवाळलेल्या चिरा काही अजुनी, दिसे ओल अश्रूच वा पाझरे
पताका विच्छिन्न उडे वारियात की वृद्ध वयाने भरे कापरे

सरलीत वर्षे किती आठवेना, येऊन कानी तो घंटाध्वनी
तसे भासही काही होती आताशा, पूजापात्र घेऊन येते कुणी

सभोवती इथे कुंद आरण्यरुदन, तयालाच धुपारती मानतो
कधी मूषकाच्या बिळातील उष्टाच, पाहून नैवेद्य पानावतो

दैवत्व विरले कधीचेच इथले, म्हणतात जागा बाधित आहे
कबंधा करे कोण वंदन शिळेच्या, की कर आशिषाचाच खंडित आहे

- विशाल (०१/०४/२०१९)

Saturday, March 30, 2019

एक वाट

प्रत्येकाच्या नशिबात मळलेली एक वाट
स्वतःची स्वतःसही न कळलेली एक वाट

क्षितीजाच्या पार जाते आकाशाला कवे घेते
पायाखाली धूळ खात पडलेली एक वाट

अजूनही शोधतो मी त्याच जागी पुन्हा पुन्हा
जाताना तू तुझ्यासवे वळलेली एक  वाट

दोन घास कसेबसे आणि दोन घोट पाणी
पोटातल्या भुकेपुढे हरलेली एक वाट

चढ-उताराची लय जपताना गेले वय
वाट पाहताना तळमळलेली एक वाट

अपघात जखमा नि आसवे आक्रोश टाहो
जागोजागी रक्त भळभळलेली एक वाट

दिसोदिस मासोमास सालोसाल युगे युगे
मातीत नि माणसात रुजलेली एक वाट

नादी कोणाच्या लागून खुळ्यासारखी वागून
रस्ता सोडून स्वतःचा ढळलेली एक वाट

पोर चालली सासरी सोडुनी बापाच्या उरी
वाळ्या-पैंजनात खुळखुळलेली एक वाट

प्रसवाच्या वेदनेत सृजनाच्या चाहुलीत
एका शब्दासाठी पानी अडलेली एक वाट

- विशाल (२८/०३/२०१९)

Wednesday, March 20, 2019

पदरावरचे चांदणे

गाली खुलते तुझ्या हे द्वाड चांदणे
भुरळ पाडते मना लबाड चांदणे

उठले रोमांच कसे यौवनावरी
रुजले देहात का उफाड चांदणे

झोपडीत चंद्रमौळी काय मागणे
कवडश्यात थाटू दे बिऱ्हाड चांदणे

छळते मजला तवभवती लपेटुनी
बांधू काय यत्ने उनाड चांदणे

कोरड्या या भाकरीत चंद्र कोरडा
मिसळून चटणीत जरा वाढ चांदणे

जरी न देई भाव कुणी फारसा तया
कवीस मात्र भासते घबाड चांदणे

दे जागा दावूनी निशापतीस त्याची
ये अशी खुल्या उन्हात पाड चांदणे

कासावीस जीव चकोरापरी पिसा
थोडे पदरावरुन तू झाड चांदणे

कारण अवसेचे सांगू नको बापाला
बाळ निजे माझे तू धाड चांदणे

(निशब्द पाहते नि सोसते गुन्हे किती
भ्याड चांदणे किती मुर्दाड चांदणे

कुठे जरा आसक्त चंद्र टाकता नजर
खुळे तिथेच थाटते बिऱ्हाड चांदणे

जो तो घेतोय रे जमतोय तसा वाटा
तुही जमल्यास ओरबाड चांदणे )

- विशाल (२०/०३/२०१९)

Saturday, February 23, 2019

राडा

काल रातीला मोठा राडा झाला
धुतले गाढव त्याचा घोडा झाला

तसा शहाणा माणूस होता फार
शब्दामध्ये अडकला वेडा झाला

देवावरती भजन लिहाया बसलो
देव शिवाजी मग पोवाडा झाला

अतिशयोक्ती यास म्हणू की उपमा
हृदय चोरीता म्हणे दरोडा झाला

बाटली संपली दुःख शिगेला होते
शब्द दारू अश्रूंचा सोडा झाला

लक्ष्मीला विसरून सरस्वतीला पुजले
यशात माझ्या माझा खोडा झाला

हसली आणि म्हणाली थॅंक्यु दादा
स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला

- विशाल (२३/०२/२०१९)

Tuesday, February 12, 2019

कविता बिविता

तो दाटून ये घननीळ पाडून मनाला पीळ
दुरात शांतता मोठी पण भोवताल व्याकुळ
भरण्यास भावना सागर मी पानावर पाझरतो
म्हणतात उगाचच लोक मी कविता बिविता करतो

प्रश्नातच दडली घुसमट उत्तरी शक्यता धुरकट
जीव इतका हताशलेला की निव्वळ भरकट भरकट
शून्याच्या मागे पळतो लेखणीमधून ओघळतो
म्हणतात उगाचच लोक मी कविता बिविता करतो

तिज काही समजत नाही मग मौन पाळतो मीही
तिकडे कागद निस्तब्ध तर इकडे चौखूर स्याही
ही अबोल भरता ओंजळ एखादा शब्द निसटतो
म्हणतात उगाचच लोक मी कविता बिविता करतो

या सरळ साकड्या कविता या वेड्यावाकड्या कविता
माझ्याहून किती निराळ्या रांगड्या फाकड्या कविता
मी लिहितो कुजबुज केवळ लोकांस भाव सापडतो
म्हणतात उगाचच लोक मी कविता बिविता करतो

- विशाल (१२/०२/२०१९)