Showing posts with label गद्य. Show all posts
Showing posts with label गद्य. Show all posts

Tuesday, August 4, 2020

भय इथले संपत नाही

       भय इथले संपत नाही

       मज तुझी आठवण येते

असे ऐकले आहे, की कवी ग्रेस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना त्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकरांना एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी या अजरामर ओळी लिहिल्या होत्या. "आज या हॉस्पिटलच्या एका छोट्या खोलीत मी एकटाच बसलो आहे, आजूबाजूला पांढऱ्या भिंती आणि मध्ये मध्ये सोडलेले हिरवे पडदे. इथे मला मी निसर्गाच्या फार जवळ असल्याचा भास होतोय. कधी ना कधी मृत्यू येणार हे अटळ सत्य मी मनात अगदी ठसवले आहे. त्यामुळे अशावेळी मला खरेतर फार शांत वाटायला हवे. असा एकांत.. अशी शांतता.. सगळे कमावून आयुष्याची उत्तरयात्रा चालू केलेल्या एखाद्या कवीला, एखाद्या लेखकाला अजून काय हवं ? खरेतर अशा जागी कसल्याही भीतीचा लवलेशही दूरदूरवर दिसत कामा नये. पण नाही. हे हवंहवंसं वातावरण असलं तरी मन स्वस्थ नाहीये. काहीतरी सलतंय.. आत.. खोल.. माहित नाही काय? माहित नाही का? पण भय इथले संपत नाही"

 खऱ्या अर्थाने शाश्वत सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ म्हणण्यासारख्या या ओळी - भय इथले संपत नाही. पाहायला गेले तर या चार शब्दात काही विशेष, छुपा, अगम्य अर्थ वगैरे असे काहीच नाही.  पण तरी या जगातील मन नावाचा दृगोचर अवयव असलेल्या प्रत्येक सजीवाला लागू होईल असे हे शाश्वत सत्य. भय इथले संपत नाही. केवळ भीती नाही, तर न संपणारी भीती. मनुष्य स्वभावानुसार अप्रिय गोष्टीपासून आपण नेहमीच दूर राहायचा प्रयत्न करतो. एकदा ती गोष्ट आपल्यापासून दूर झाली, नष्ट झाली, संपली कि आपण तणावमुक्त होऊनआपल्याला आनंद होईल, सुख मिळेल असे सतत वाटत असते. पण या सर्वांसोबत ती गोष्ट दूर गेलीच नाही, संपलीच नाही तर? याची अनामिक भीती मनात असतेच. मिळेल कि नाही? जमेल कि नाही? येईल कि नाही? जाईल कि नाही? अशा एक न अनेक भयांचं ओझं सतत पाठीवर घेऊन आपण वावरत असतो. एक गेले कि दुसरे, ते झाले कि तिसरे, हि भयाची शृंखला कधीच खंडित होत नाही. धनिकाला धन जाण्याचं भय, भिकाऱ्याला रात्रीच्या खाण्याचं भय, वांझेला पुत्र न होण्याचं भय आणि सपुत्रिकाला मुलानं सांभाळण्याचं भय, अपयशाचं भय, प्रेयसीच्या विरहाचं भय, तरुणाला वार्धक्याचं भय तर म्हाताऱ्याला मरणाचं भय. प्रत्येकाच्या मनात सतत ठाण मांडून कसले ना कसलेतरी भय. 

बहुरूपी बहुकल्पी अशा मूर्त भयांसाठी जगात उपाय आहे आणि उपाय नसेल तर दोष द्यायला नशिब आहेच. पण कवीने उल्लेख केलेलं भय ते हे नाही. ते अदृश्य आहे, अमूर्त आहे, अक्षय आहे, कधी न संपणारं आहे . अगदी जीवघेणं नसलं तरी जगूही न देणारं भय. सतत जाणवणारं पण स्वतःच स्वतःलाही ना कळणारं .  दिनरहाटीच्या कामात ज्याने त्याने जमेल तसा प्रयत्न करून त्याला कितीही खोल गाडले, तरी प्रत्येक एकाकी क्षणाला न चुकता उसळी मारून वर येणारं.   

आणि त्यासोबत समोर येणारा तो चेहरा - मज तुझी आठवण येते. भय तर न संपणारंच आहे पण ते टाळण्यासाठीच्या प्रयत्नात माहित नाही का पण तुझी आठवण  येते. तू कोण ? आई ? बायको ? मित्र ? प्रेयसी ? कि भगवंत ? ज्याचे त्यालाच माहीत. पण खरेच "तू कोण" याने फरक पडतो का? तू कोणीही असले, पण या भयाने, या भीतीने व्यापलेल्या माझ्या मनात, जिथे दुसऱ्या कशालाच यायला वाव नाही, तिथे अचानक तुझी आठवण येते. कशी? का? याचे उत्तर मिळत नाही. पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार तसे तुझ्या आठवणीला घेऊन मी धडपडण्याचा प्रयत्न करतो, अज्ञाताशी डाव मांडायची हिम्मत करतो. माझा एकाकीपणा हीच त्या भयाची ताकद आहे आणि तुझी आठवण आल्यावर ते आपोआप क्षीण व्हायला हवे. हो ना? पण नाही.. तुझी आठवण येताना पुन्हा नव्या भयाला सोबत आणते.  हि आठवण नेहमी अशीच येईल का? नाही आली तर ? आणि पुन्हा मी ह्या माझ्या न संपणाऱ्या भयाच्या आणि तुझ्या सतत येणाऱ्या आठवणींच्या चक्रात सापडतो . वर्तुळाला कधी आदी अंत असतो का?  

म्हणून 'निर्भय' हि केवळ नाममात्र संज्ञा उरते. जगात निर्भय असे कोणीच नाही. सगळ्या भयांना टाळून संपवून अगदी मोक्षप्रद जागी बसले आणि तुझी आठवण आली कि पुन्हा या भयडोहात ओढले जाणे निश्चित आहे. आणि म्हणून हे भय संपणार नाही कारण भय संपले तर तुझी आठवण येणार नाही याचे भय आहेच. मी म्हंटले ना, हे वर्तुळ आहे. भयात तुझी आठवण आली काय किंवा  तुझ्या न आलेल्या आठवणींचे भय काय ? त्यामुळे कवीच्या या दोन्ही ओळी, आपल्याला एका कधी न संपणाऱ्या, अगणिताच्या चकव्यात अडकवतात. यातून कोणालाच बाहेर येणे शक्य नाही आणि म्हणूनच हे शाश्वत सत्य आहे.

                                                                                 मज तुझी आठवण येते 

                                                                                 भय इथले संपत नाही  


-- विशाल (०४/०८/२०२०)  

Tuesday, December 10, 2019

भारत एक खोज

पंडित नेहरूंच्या The Discovery of India या कादंबरीवर आधारित श्याम बेनेगल निर्मित भारत एक खोज ही मालिका साधारण १९९० च्या दरम्यान दूरदर्शन वर प्रदर्शित झाली होती. टेलिव्हिजन चा भारतात नुकताच प्रसार विस्तार चालू झालेल्या या काळात जेमतेम ४-५ वर्षाच्या मला यातील काही ओ की ठो कळले नव्हते. नाही म्हणायला त्याच्या टायटल सोंगमधले संगीत आणि "छुपा था क्या कीसने ढका था ... अशा काही ओळी लक्षात राहिल्या होत्या.

यानंतर जवळपास ३० वर्षांनी यु ट्यूब वर काहीतरी शोधताना याचा एक विडिओ आला. उत्सुकता जागृत झाली आणि ऑफिसच्या बसमध्ये प्रवासात रोज जमेल तसे एक दीड भाग बघत आजच ही मालिका पूर्ण केली

अत्यंत सुंदर अशी मालिका आहे. अगदी आर्यपूर्व हडप्पा संस्कृतीपासून चालू होऊन भारताच्या स्वातंत्र्यपर्यंत चा इतिहास घडलेल्या, ऐकीव किंवा समकालीन साहित्याच्या प्रसंगातून ५३ भागात मांडला गेला आहे. त्याकाळी कुठल्याही VFX शिवाय खरे खुरे सेट लावून तो काळ जिवंत केला गेला आहे. त्यावेळचे राहणीमान जीवनपद्धती त्यात होत गेलेले बदल यांचा मेळ यात दिसून येतो. अगदी हडप्पाने सुरुवात करून आर्यांचे आगमन, रामायण महाभारत गौतम बुद्ध अभिजात शाकुंतल, मौर्य  साम्राज्य, विविध साम्राज्याचे उदय अस्त, राणा सांग, पृथ्वीराज चौहान, म्लेंच्छचे आक्रमण, विविध बादशहा, मुघल साम्राज्य, ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार, 1857 चे स्वातंत्र्य समर  त्यानंतर सामाजिक चळवळी आणि लोकमान्य पर्व आणि गांधीपर्व ते स्वातंत्र्य अशा टप्याटप्याने ही मालिका उलगडत जाते. प्रत्येक भाग वेगळ्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे.

त्यावेळच्या नावाजलेल्या टीव्ही तसेच सिनेमा कलाकारांनी यात विविध भूमिका केल्या आहेत. ओम पुरी सारखा दिग्गजाने रावण, दुर्योधन, औरंगजेब, राजा कृष्णदेवराय, सम्राट अशोक आणि इतर अनेक व्यक्तिरेखानसोबतच आपल्या खर्जातील आवाजात या मालिकेचे निवेदन ही केले आहे. याव्यतिरिक्त पल्लवी जोशी, इरफान खान, पियुष मिश्रा, इला अरुण, कुलभूषण खरबंदा (अकबर), अलोकनाथ(स्वामी विवेकानंद), मोहन गोखले (गोविंद रानडे), सदाशिव अमरापूरकर (ज्योतिबा फुले) शुभांगी गोखले (सावित्रीबाई फुले), शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शाह ( छत्रपती शिवाजी) हेही या मालिकेत दिसून येतात. अजित करकरे, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यासारख्या मराठी गायकांनी गाणी गायली आहेत

या मालिकेतील प्रसंगांच्या पुराव्याबाबत, खऱ्या इतिहासबाबत, पंडित नेहरूंच्या दृष्टिकोणाबाबत अनेक वादविवाद आहेत पण एक सुंदर मालिका म्हणून पाहण्यास हरकत नाही. IMDB वर 8.9 रेटिंग आहे आणि यु ट्यूबवर सर्व 53 भाग मोफत उपलब्ध आहेत.

-विशाल (१०/१२/२०१९)

Sunday, December 8, 2019

फसलेला पानिपत

फसलेला पानिपत

तसे मी फारसे चित्रपट थिएटरला जाऊन पाहण्याचा शौकीन नाही. आणि हिंदी तर नाहीच नाही. तरीही लग्नाचा वाढदिवस साधून आणि मुलाला हत्ती घोडे लढाई पाहायला मिळेल या हेतूने काल पानिपत पाहिलाच.
तसे आशुतोष गोवरीकरांचे चित्रपट मला आवडतात पण दुर्दैवाने हा तशी छाप सोडण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. अनेक गरज नसलेले प्रसंग रंगवून आणि इतिहासातील महत्वाचे प्रसंग वगळून तीन तासाची लांबी राखली गेली आहे.

सिनेमॅटिक फ्रीडम च्या नावाखाली पार्वतीबाई आणि सदाशिव भाऊंचा रोमान्स तसेच सिनेमातील गाणी आणि नृत्य यावर मी आवर्जून बोलणार नाहीये (बोलण्यासारखे काही नाहीच त्यात हो पण आपला गश्मीर अर्जुनपेक्षा छान नाचला आहे हे नक्की) पण गोपिकाबाई आणि पर्वतीबाईंमधील वितुष्ट फक्त फॅमिली ड्रामा टच साठी दाखवल्याचा फील येतो. त्याचा मुख्य कथेशी काही संबंध लागत नाही. दत्ताजी शिंदेंच्या मृत्यूचा प्रसंग अगदीच नाममात्र 30 सेकंडचा दाखवला आहे. याला अजून व्यापक आणि प्रभावी पद्धतीने दाखवत आले असते. पानिपतचे युद्ध मैदानावर फक्त अर्धा एक दिवस खेळले गेले पण युद्धपुर्व मैदानाच्या बाहेर घडलेल्या गोष्टींमुळे, भाऊ आणि अब्दालीमधील डावपेचांमुळे त्याला जास्त महत्व प्राप्त होते. अन्नपाण्यावाचून मराठा सैन्याची झालेली दैना आणि त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात मराठ्यांची काय परिस्थिती होती(माती खाण्याची वेळ आली होती), अब्दालीने बाटवलेले पाणी यावर काहीच भाष्य नाही. मोकळी भांडी आणि युद्धावर जाताना पार्वतीबाई भाऊसाहेबांना गुळाचे पाणी देतात आशा दोन वाक्यात हे प्रसंग संपवले आहेत.त्यादिवशी मराठ्यांचा संक्रांतीसारखा मोठा सण होता तेही कुठे येत नाही. भाऊंच्या मदतीसाठी पुण्याहून निघालेले नानासाहेब आणि त्यामुळे अब्दालीची झालेली गोची ह्याचा साधा उल्लेखही नाही. गोविंदपंतांच्या बलिदानाचाही उल्लेख येत नाही. असे अनेक प्रसंग वगळले गेले आहेत. याउलट अब्दाली आणि भाऊंची भेट हा प्रसंग ओढूनताणून केवळ "मिटटीके एक कण के लियेभी जान दे सकता हु" या एक संवादासाठी रचला आहे असे वाटते. त्यामुळे रवींद्र महाजनी (मल्हारराव होळकर), गश्मीर महाजनी(जनकोजी शिंदे) मिलिंद गुणाजी(दत्ताजी शिंदे) मोहनिश बहल (नानासाहेब पेशवे) ही पात्रे असून नसल्यासारखी वाटतात. भाऊ पार्वतीबाई आणि अब्दाली वर फोकस करायच्या नादात नजीबखानाचे महत्वाचे पात्र जवळपास आऊट ऑफ फोकस झाले आहे. अत्यंत कुटील आणि विखारी असलेले हे पात्र रंगवण्यासाठी मंत्रापेक्षा (मंत्रा हे त्या अभिनेत्याचे नाव आहे) कोणीतरी अजून ताकदीचा कलाकार हवा होता.

डायलॉग च्या बाबतीत चित्रपट पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. वरील उललेखलेल्या ऐतिहासिक घटनांच्या निमित्ताने खूप सुंदर लिहिता आले असते. पण भाऊ आणि पार्वतीबाई यांच्यातील प्रसंग सोडून इतरत्र डायलॉग जवळपास नसल्यातच जमा आहेत. (अर्जुन कपूर च्या अरोमॅंटिक डायलॉग डिलीवरीवर गोवरीकरांना शंका असावी बहुधा, पण खरे सांगतो पूर्ण चित्रपटात याच्या चेहऱ्यावरची एक रेष हलली असेल तर शप्पथ)."बचेंगे तो और भी लढेंगे" सारखे इतिहास प्रसिद्ध डायलॉगसुद्धा दुर्लक्षित आहेत.  चित्रपटात कुठेही अंगावर शहारा येत नाही, डोळे भरून येत नाही, आपण खिन्न होत नाही की देशभक्ती जागृत होत नाही. युद्धच्या तयारीच्यावेळी भाऊ दांडपट्ट्याबद्दल बोलताना दाखवला गेला आह.े युद्धातही दांडपट्टा खेळताना दिसला असता तर अजून मजा आली असती

जमेच्या बाजूंबद्दल बोलायचे झाले तर युद्धनीती छान दाखवली गेली आहे. सैन्याचे संचालन तोफांचा वापर याबाबत डिटेलिंग चांगले आहे (एक दोन सिन मध्ये टॉप अँगल शॉट एखाद्या गेम चा भाग असल्यासारखे वाटले)युद्धानंतरचे अब्दालीचे नानासाहेबांना पत्र हे माझ्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे कारण याबाबत लोकांना फारच कमी माहिती आहे.

कदाचित माझी रणांगण नाटकाची पारायणे झाली असल्याने माझ्या या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या असतील पण माझ्यामते कोणत्याही पात्राला संपूर्ण न्याय देण्यात चित्रपट फेल गेला आहे. हो पण ज्यांनी पानिपत युद्धावर काही वाचलेले नाही ज्यांनी रणांगण नाटक किंवा द ग्रेट मराठा मालिका पाहिली नाही त्यांनी पाहण्यास हरकत नाही.

- विशाल (९/१२/२०१९)

Wednesday, September 9, 2015

सारेगमप मपधनिसा


गणेशोत्सवात हल्ली गणपतीची सिनेमाच्या तालावरची फुटकळ गाणी ऐकली कि मला अजूनही तिच्या त्या गाण्याची आठवण येते. २५ वर्षे झाली तरी अज्जिबात पुसट न झालेल्या त्या सुरात काय जादू होती काय माहित. प्राथमिक शाळेचा वर्ग भरलेला असायचा. १० ते ५ ची शाळेची वेळ असायची. अभ्यासाचे विषय ४ पर्यंत संपवून एक तासात बाई अभ्यासेतर गोष्टी करून घ्यायच्या. (त्यावेळी madam म्हणायची पद्धत निदान मराठी शाळांमध्ये तरी चालू व्हायची होती.)  त्यात प्रामुख्याने अथर्वशीर्ष , रामरक्षा, मनाचे श्लोक असायचे. उरलेल्या वेळात गोष्टी, विनोद, कोडी, सामुहिक कविता, वक्तृत्व किंवा गाणी असायची. अर्धवट लक्ष त्याकडे आणि अर्धवट लक्ष बाहेरच्या घंटेकडे आणि न्यायला आलेल्या पालकांकडे असायचे आणि अशातच तिचे ते गाणे चालू व्हायचे -

"सारेगमप मपधनिसा,
मंत्रमुग्ध अवतार मंत्रमुग्ध अवतार …. "

त्यावेळी पडद्यावरचे गाणे जुही किंवा माधुरी म्हणते अशी आमची दाट समजूत होती आणि लता आणि आशा या शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका आहेत असा गैरसमजही होता. गाणे नाचणे संगीत हे मुलींचे कार्यक्षेत्र असे वाटायचे. त्यामुळे त्यात त्यावेळी जास्त रस घेत नसलो तरी वर्गातील एकमेव गायिका आणि शिवाय पुढे उभे राहून बिनधास्त गाणे म्हणते म्हणजे नक्की मोठेपणी सिनेमात हिरोइन होणार असेही मनात यायचे. असो पण तरी तिने सूर लावला कि आपोआप डोक्यात त्याचे संगीत सुरु व्हायचे

"कऱ्हा नदीच्या तीरावरती घे गजमुख अवतार" ह्या ओळीनंतर चे "घे गजमुख अवतार घे गजमुख अवतार" हा कोरस  ती स्वताच म्हणायची नि श्वासात जराही खंड न पडता पुढे "दुमदुमे ता था तै तत्कार नाचतो शिवनंदन सुकुमार… मयुरेश हा रणी प्रकटला मावळला अंधार" हे कडवे संपून पुन्हा "सारेगमप मपधनिसा" चालू व्हायचे तेव्हा तर अगदी मंत्रमुग्ध होऊन जायचो. आणि शेवटी "गोसावीसुत मोरयाचा झाला जयजयकार"  म्हणल्यानंतरचे त्या विशिष्ट लयीतले "मंगलमुर्ती मोरया" घरी पोचेपर्यंत ओठांवर रुळलेले असायचे

त्यावेळी या शब्दांचे अर्थ हि माहित नव्हते. लय ताल सप्तसूर आलाप  इतकेच काय तर या गाण्याची मूळ गायिका लता / उषा मंगेशकर आहे आणि अष्टविनायका मधील मयुरेश्वरावर हे गाणे लिहिले आहे हे कळायला पुढच्या दहा वर्षाचा काळ उलटावा लागला. नंतर शाळा बदलल्या संपर्क लोप पावले (असेही त्यावेळी तरी कुठे मुलींशी फार बोलायला जमायचे म्हणा ) पण अजूनही गणपती म्हणले कि पहिले गाणे आठवते ते हेच आणि कानात आवाज घुमतो तिचाच.

(गीताचे बोल लिहिताना काही चुकले असल्यास क्षमस्व.)

तिच्यापर्यंत हा लेख पोचेल तिला सगळे आठवेल इतर वर्गमित्रांना काही आठवेल याबाबत तशी शंकाच आहे. पण बालपणीच्या या सुंदर आठवणीसाठी तिला या लेखाद्वारे धन्यवाद म्हणावेत यासाठीच हा प्रपंच

--- विशाल

Tuesday, August 4, 2015

वेग (शतशब्दकथा)

"किती हळू चालवतोस रे. मागचे सगळे गेले पुढे"
"जाऊ दे गं. एकतर पावसामुळे रस्ता निसरडा झालाय"
"किती घाबरतोस रे जीवाला. लग्नाआधी किती बिनधास्त होतास"
"ती गोष्ट वेगळी होती. जबाबदारी नव्हती. आता तू आहेस. पिलू आहे. तुला सांगतो पिलू झाल्यापासून गाडी कधी ४०-५०च्या पुढे न्यावीशी वाटतच नाही. जरा वेग वाढला की ती येते डोळ्यासमोर आणि आपोआप ब्रेकवर पाय जातो"
"किती जपतो जीवाला. पण अंधार पडायच्या आत पोचायचे ना. पिलू वाट पहातीये. आता तर पाउस पण वाढायलाय. केवढा आवाज येतोय"
"हं.. पण हा पाउस नाही. कसलेतरी बारीक दगड आणि माती पडतीये काचेवर"
"गाडी थांबवून बघ जरा"
.
.
.

** काल घाटात चारचाकीवर दरड कोसळून दोनजण ठार**


--- विशाल 

Thursday, June 4, 2015

हाक

"आजच नेमके साहेबाला काम आठवले" सदा स्वत:शीच बोलत होता. "एक तर आज अमावास्या, त्यातच तो रोजचा रोड पालिकेने सकाळी खोदून ठेवलेला म्हणजे त्या आडवाटेने कच्च्या रस्त्याने स्मशानावरुन फिरून जावे लागणार म्हणून लवकर निघावे म्हणले तर ११ वाजवले xxxने" साहेबाला शिव्या घालीत गडबडीत सायकल ताणत असलेल्या सदाची तंद्री पत्र्याच्या खडखडाटाने मोडली.   पॅडल फिरेना म्हणून त्याने उतरून पाहिले. सायकलची चेन निसटलेली. आता सायकलच्या नावाने अजून दोन शिव्या तोंडातून बाहेर पडल्या. सदाने आजूबाजूला पाहिले. चिटपाखरुहि नव्हते. मागे पडलेला आणि पुढे असलेला दिव्याचा खांब दोन्ही मेणबत्ती एवढे दिसत होते. त्यामुळे तिथे थांबून चेन बसवायची सदाची हिम्मत होत नव्हती. सायकल तशीच ढकलत नेण्याचा निर्णय त्याने घेतला. अंधारामुळे घड्याळात किती वाजले तेही कळायला मार्ग नव्हता. दुरून नदीवरून सू सू वाहणारा बोचरा  वारा आणि सोबत आता सायकलच्या चेन चा लयबद्ध आवाज सदाच्या भीतीत अजूनच भर घालत होता. "एकतर आज अमावास्या, रात्रीची वेळ, त्यात आपला मनुष्यगण, अंधुक प्रकाशात काळीकुट्ट पिंपळाची एखादी दुसरी आकृती आणि आजूबाजूला टाकलेले उतारे म्हणजे स्मशानाचा भाग चालू झाला बहुतेक." थंडीपेक्षा असल्या एक ना अनेक विचारांनीच तो जास्त गारठला होता. हा स्मशानाचा भाग लवकरात लवकर कसा पार करता येईल आणि समोरच्या खांबावरील दिव्याच्या प्रकाशात सायकलची चेन लाऊन पटकन घर कसे गाठता येईल" म्हणून सदा 'राम राम' म्हणत झाप झाप पावले टाकू लागला. दूर स्मशान दिसायला लागले होते पण ‘तिकडे पहायचे नाही, पहायचे नाही’ असे स्वत:लाच बजावून देखीलहि एक नजर तिकडे गेलीच.
"अरे बापरे, यावेळेला चिता पेटलेली? अरे हो, संध्याकाळी उशीर होईल म्हणून केलेल्या फोन वर बायको म्हणाली होती कुलकर्ण्याचा म्हातारा दुपारी गेला. गेली सहा वर्षे अंथरुणावर काढली. अंगाची काडी झालेली पण तरी नव्वदी गाठली." त्याच्या चेहरा समोर येताच सदा थरारला. मनातले विचार झटकून त्याने नाइलाजाने दिव्याखाली सायकल थांबवली. खाली डोके करून लगबगीने चेन बसवायच्या प्रयत्नात असतानाच त्याला साद आली "सदा …" त्याने चमकून वर पाहिले. "आपल्याला भास झाला का? कि ….  ?"  . नाही नाही भासच असेल. दुर्लक्ष करु म्हणता म्हणता त्याची नजर स्मशानाकडे वळली  आणि सदा जागच्या जागी गोठला. चितेच्या प्रकाशात हातवारे करणारी आकृती पाहून त्याचा चेहरा पांढराफट्ट पडला. ओठातले रामनाम तर आधीच बंद झालेले. धुरात अधिकच विचित्र दिसणारा तो प्रकार आपल्याकडे सरकतोय असे त्याला वाटले. धडधड्णारे हृदय थरथरणाऱ्या हातांनी काबू करण्याचा प्रयत्न करीत सदा नकळत उभा राहिला. दुरून अस्पष्ट शब्द कानावर येत होते. '…… या …. खा …. माणसे …. " शेवटच्या शब्दाने मात्र सदाचा  धीर सुटला . सायकल तिथेच टाकून त्याने जी धूम ठोकली ते थेट घराच्या पायरीवरच येउन आदळला. धापा  टाकीत त्याने दार ठोठावले. हाक मारण्यासाठी तोंडातून आवाज फुटतच नव्हता. बायकोने दरवाजा उघडला कसाबसा आत येउन सदा तेथेच कोसळला. दरदरून घाम सुटला होता. अंग तापाने फणफणत होते. "नको… भूत … स्मशान …  खाणार… " तापात काहीतरी बरळत होता. त्याची हि अवस्था पाहून बायकोने डॉक्टरांना  फोन लावला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर रात्री उशिरा त्याची झोप लागली.
"सदानंद… अरे सदानंद… "सकाळी दिनकरच्या हाकेने सदाची झोपमोड झाली. बाहेर कसलातरी दंगा ऐकू येत होता
"बरे झाले आलात भाओजी" सदाची बायको दरवाजा उघडताच म्हणाली.
"हि सदाची सायकल ना? लाईटीच्या डांबाखाली पडलेली. कवरवर नाव बघून ओळखली. आणि घेऊन आलो. चेन पडल्या. बहुतेक चोर नेत असल पण चेन पडल्याने सोडून पळाला असल… बाकी बाहेर एवढा गलका चालू आहे आणि हा अजून झोपलाय ? … कुठे आहे सदानंद ?"
"अहो बघा ना.  कालपासून काय झालय यांना. कामावरून उशिरा आले. कसेतरीच करत होते. काहीबाही बरळत होते.  रात्रीपासून तापाने फणफणले आहेत नुसते."
"काय झाले सदानंद साहेब" खोलीच्या दारातून आत येत दिनकरने विचारले.
"सांगतो… " जरा त्रासलेल्या चेहऱ्यानेच सदा बोलला. "पण बाहेर हा गलका कसला चालू आहे सकाळपासून?"
"अरे नेहमीचेच रे. जाधवाचा विनू… त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय ना. सारखे चालूच असते.  त्याचीच काहीतरी गडबड आहे. सकाळी श्रीपती परसाकडे निघालेला. त्याला कुलकर्ण्याच्या चीतेपाशी हा विनू दिसला. काहीतरी भाजत होता. शेवटी वेडाच तो. काय करतोय विचारले तर म्हणला 'या …  रात्री नदीवरून मासे धरून आणलेत ताजे ताजे …भाजून ठेवलेत रात्रीच… खाणार का ?'. त्या कुलकर्ण्याच्या पोराला कळले तसा तराट धावत आला. आता पायतानाने पूजा चालू आहे त्याची… बर ते राहू दे …  तुला काय झाले ते सांग ""
दिनकरची शेवटची दोन वाक्ये सदाला ऐकूच गेली नाहीत. रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर पुन्हा यायला लागला … "…. या … खा … माणसे….  मासे…."
 
--- विशाल