Showing posts with label गझल सहज कविता. Show all posts
Showing posts with label गझल सहज कविता. Show all posts

Sunday, August 7, 2022

अर्थ जगण्याचा कळाया लागला

सूर्य जेव्हा मावळाया लागला
अर्थ जगण्याचा कळाया लागला

फुंकले तू प्राण ओठांनी तुझ्या
जीव पुन्हा सळसळाया लागला

भेटीचे स्थळ फार नव्हते लांब पण
प्रश्न वाटांचा छळाया लागला

करणी म्हणू की ही म्हणू भानामती
जो तो तिच्या मागे पळाया लागला

माळला आहे तिने गजरा पुन्हा
भवताल सारा दरवळाया लागला

यमदूत हे खोळंबळे दारामध्ये
ठोका म्हणे पुन्हा मिळाया लागला

गणित चुकले पावसाचे कोणते
वेळी अवेळी कोसळाया लागला


- विशाल (10/02/2022)