त्या रात्री पाउस होता
अन गात्रांमध्ये थरथर
जवळजवळ सरलेले
दोघांमधले अंतर
त्या रात्री पाउस होता
ओलावा चिंब हवेतून
पण पेटत होती काया
त्याच्या उबदार कवेतून
त्या रात्री पाउस होता
अन हरले होते भान
ओठ बंद ओठांनी
श्वासातून उमटे तान
त्या रात्री पाउस होता
जागच्याच जागी थिजला
थेंबात मिसळला घाम की
घामाने थेंबहि भिजला
त्या रात्री पाउस होता
साचून बंद डोळ्यात
वेदना असो वा हर्ष
सारेच खोलवर आर्त
त्या रात्री पाउस होता
तो खराच किंवा भास
दरवळला तो जाईचा
की धुंद तुझाच सुवास
त्या रात्री पाउस होता
---- विशाल
---- विशाल
No comments:
Post a Comment