कधी म्हणतो मी मनाला
एकटेच राहू चल
अन तेव्हा मनात माझ्या
होते रे चलबिचल
मन उनाड माझे वेडे
पसरते चंदनी सडे
विश्वास भारुनी अवघ्या
हे उरते फारच थोडे
कधी शून्य कि कधी अनंत
उठते मनी प्रश्नपटल
अन तेव्हा मनात माझ्या
होते रे चलबिचल
मन धावे पोरीच्या मागे
बांधते रेशमी धागे
मी समजवयास गेलो
तर मलाच भरते रागे
मन होते असे मजनू का ?
लैला जर नाही जवळ
अन तेव्हा मनात माझ्या
होते रे चलबिचल
मन माझे मोठे शहाणे
स्वच्छंदी त्याचे रहाणे
सारे हवे ते करुनी
वर देते लाख बहाणे
होऊन स्वार वा-यावर
गगनावर लिही गझल
अन तेव्हा मनात माझ्या
होते रे चलबिचल
मन कधी कोठे नि कोण ?
मन मानसीत हरवून
एकांती जाऊन थोडे
घेते हळूच रडून
कधी पर्वत विशाल होते
कधी फुलांपरी कोमल
अन तेव्हा मनात माझ्या
होते रे चलबिचल
------ विशाल
No comments:
Post a Comment