Saturday, July 31, 2010

दिस एक जात नाही By समर्थ देर्देकर

हे गाणे माझा मित्र समर्थ देर्देकर याने आम्ही बी ई च्या शेवटच्या वर्षात असताना लिहिले होते  आणि तेच त्याच्या आवाजात त्याने बसविलेल्या चालीवर ऐकताना फार मजा यायची. त्याची आठवण सांगताना तो म्हणतो कि कुठल्याश्या घाटातून डोंगरावरून जात असताना पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग आणि उन्ह सावलीचा खेळ  पाहताना अचानक कुणाची तरी आठवण यावी आणि मन म्हणावे ---


समर्थ देर्देकर


दिस एक जात नाही आठवाविना तुझ्या गं 
अन तुझ्याबिगर न जाई पाणी आणि घास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास . . . 
.
.
भर उन्हातील तुझा शीतल सहवास सखे 
मऊ मातीतील तुझ्या पाउलखुणा 
सरी सरी मोजताना चिंब चिंब नेत्र तुझे 
हा भिजला क्षण न कधी येईल पुन्हा 
अजूनही दरवळतो मनी अंतरात सखे 
तुझ्या त्या बटांचा तो घमघम सुवास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास 
.
.
नाजूक नाजूक तुझ्या हातातील हात माझा 
आणिक तव गालांवरील रक्तिमा 
सांज सांज ढळताना सौम्य तुझ्या नेत्रातील 
अजूनही स्मरतो मज पूर्ण चंद्रमा 
अजूनही आठवतो तुझा धुंद श्वास सखे 
अशा क्षणी होई मग जिंदगी उदास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास  
.
.

आठवांचा वळीव असा कोसळे उन्हात
दिसे सप्तरंगी जादू दूर क्षितीजावरी
रंगुनी रंगात त्याच विसरुनी जातो स्वतास 
शोधतो दिशात तुझा गंध कस्तुरी
चाले किती दिवस मास ठाऊक ना या मनास 
हा असा अखंड आणि एकटा प्रवास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास 

----------- समर्थ देर्देकर 

शहादत

सुखात कोसळत होता, दु:खात निनादत आहे 
पाउस कुणाचा साथी.. रोजचीच आदत आहे 

हा शब्दखेळ का सोपा ? लागावे कोणी नादी
संधान क्षेत्रपार्थांना जेमतेम साधत आहे 

संपले जरी हे श्वास, संपली तरी ना आस 
जगण्यावरती आता या मी स्वतास लादत आहे

गडे जगापलीकडले हे असे आपुले नाते 
तू तिथे उमललीस आणि मी इथे आल्हादत आहे 

कोण कसे बलीदानी ज्याचे त्याने ठरवावे 
माझ्यासाठी हे माझे जगणेच शहादत आहे ..

-----विशाल 

एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

ते जातात शिवालयी 
मी मादिरालायी 
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

ते सदा नामजपात दंग 
मी नेहमी प्याल्यात धुंद 
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

ते स्वताला म्हणवून घेतात
भक्त , विरक्त , योगी , जोगी 
मी मात्र म्हणवतो 
आसक्त , आरक्त , अनुरक्त ,भोगी 
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

ते माळतात रुद्राक्ष कंठी 
मी त्याच कंठाखाली रिचवतो द्राक्षबेटी 
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

त्यांना त्यागायचा आहे संसार 
मिळवायला मुक्तता 
मी तर कधीच विसरलोय दुनिया ..
मग याहून वेगळी काय असते मुक्तता 

मग आता तुम्हीच सांगा काय फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .
----- विशाल 

त्या रात्री पाउस होता

त्या रात्री पाउस होता 
अन गात्रांमध्ये थरथर 
जवळजवळ सरलेले 
दोघांमधले अंतर 

त्या रात्री पाउस होता
ओलावा चिंब हवेतून
पण पेटत होती काया 
त्याच्या उबदार कवेतून

त्या रात्री पाउस होता
अन हरले होते भान
ओठ बंद ओठांनी
श्वासातून उमटे तान

त्या रात्री पाउस होता
जागच्याच जागी थिजला
थेंबात मिसळला घाम की
घामाने थेंबहि भिजला 

त्या रात्री पाउस होता
साचून बंद डोळ्यात 
वेदना असो वा हर्ष 
सारेच खोलवर आर्त 

त्या रात्री पाउस होता
तो खराच किंवा भास
दरवळला तो जाईचा 
की धुंद तुझाच सुवास 

त्या रात्री पाउस होता
---- विशाल