पंडित नेहरूंच्या The Discovery of India या कादंबरीवर आधारित श्याम बेनेगल निर्मित भारत एक खोज ही मालिका साधारण १९९० च्या दरम्यान दूरदर्शन वर प्रदर्शित झाली होती. टेलिव्हिजन चा भारतात नुकताच प्रसार विस्तार चालू झालेल्या या काळात जेमतेम ४-५ वर्षाच्या मला यातील काही ओ की ठो कळले नव्हते. नाही म्हणायला त्याच्या टायटल सोंगमधले संगीत आणि "छुपा था क्या कीसने ढका था ... अशा काही ओळी लक्षात राहिल्या होत्या.
यानंतर जवळपास ३० वर्षांनी यु ट्यूब वर काहीतरी शोधताना याचा एक विडिओ आला. उत्सुकता जागृत झाली आणि ऑफिसच्या बसमध्ये प्रवासात रोज जमेल तसे एक दीड भाग बघत आजच ही मालिका पूर्ण केली
अत्यंत सुंदर अशी मालिका आहे. अगदी आर्यपूर्व हडप्पा संस्कृतीपासून चालू होऊन भारताच्या स्वातंत्र्यपर्यंत चा इतिहास घडलेल्या, ऐकीव किंवा समकालीन साहित्याच्या प्रसंगातून ५३ भागात मांडला गेला आहे. त्याकाळी कुठल्याही VFX शिवाय खरे खुरे सेट लावून तो काळ जिवंत केला गेला आहे. त्यावेळचे राहणीमान जीवनपद्धती त्यात होत गेलेले बदल यांचा मेळ यात दिसून येतो. अगदी हडप्पाने सुरुवात करून आर्यांचे आगमन, रामायण महाभारत गौतम बुद्ध अभिजात शाकुंतल, मौर्य साम्राज्य, विविध साम्राज्याचे उदय अस्त, राणा सांग, पृथ्वीराज चौहान, म्लेंच्छचे आक्रमण, विविध बादशहा, मुघल साम्राज्य, ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार, 1857 चे स्वातंत्र्य समर त्यानंतर सामाजिक चळवळी आणि लोकमान्य पर्व आणि गांधीपर्व ते स्वातंत्र्य अशा टप्याटप्याने ही मालिका उलगडत जाते. प्रत्येक भाग वेगळ्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे.
त्यावेळच्या नावाजलेल्या टीव्ही तसेच सिनेमा कलाकारांनी यात विविध भूमिका केल्या आहेत. ओम पुरी सारखा दिग्गजाने रावण, दुर्योधन, औरंगजेब, राजा कृष्णदेवराय, सम्राट अशोक आणि इतर अनेक व्यक्तिरेखानसोबतच आपल्या खर्जातील आवाजात या मालिकेचे निवेदन ही केले आहे. याव्यतिरिक्त पल्लवी जोशी, इरफान खान, पियुष मिश्रा, इला अरुण, कुलभूषण खरबंदा (अकबर), अलोकनाथ(स्वामी विवेकानंद), मोहन गोखले (गोविंद रानडे), सदाशिव अमरापूरकर (ज्योतिबा फुले) शुभांगी गोखले (सावित्रीबाई फुले), शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शाह ( छत्रपती शिवाजी) हेही या मालिकेत दिसून येतात. अजित करकरे, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यासारख्या मराठी गायकांनी गाणी गायली आहेत
या मालिकेतील प्रसंगांच्या पुराव्याबाबत, खऱ्या इतिहासबाबत, पंडित नेहरूंच्या दृष्टिकोणाबाबत अनेक वादविवाद आहेत पण एक सुंदर मालिका म्हणून पाहण्यास हरकत नाही. IMDB वर 8.9 रेटिंग आहे आणि यु ट्यूबवर सर्व 53 भाग मोफत उपलब्ध आहेत.
-विशाल (१०/१२/२०१९)
No comments:
Post a Comment