Monday, August 15, 2011

मनातल्या मनात मी

Suresh Bhat
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो 

अशीच रोज नाहुनी लपेट उन्ह कोवळे 
असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे 
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

अशीच रोज अंगणी लावून वेच तू फुले 
असेच सांग लाजुनी कल्यास गुज आपुले 
तुझ्या काळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो 
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

अजून तू अजाण या कुवार कर्दळीपरी 
गडे विचार जाणत्या जुईस एकदातरी 
'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो? ' 
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

तसा न राहिला आता उदास एकटेपणा 
तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे करी खुणा 
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

---- सुरेश भट

No comments:

Post a Comment