Saturday, November 23, 2024
वरदान माँगूँगा नहीं
Sunday, August 7, 2022
अर्थ जगण्याचा कळाया लागला
Monday, November 23, 2020
तुला अंदाज आला ना - माधुरी चव्हाण जोशी
Tuesday, August 4, 2020
भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
असे ऐकले आहे, की कवी ग्रेस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना त्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकरांना एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी या अजरामर ओळी लिहिल्या होत्या. "आज या हॉस्पिटलच्या एका छोट्या खोलीत मी एकटाच बसलो आहे, आजूबाजूला पांढऱ्या भिंती आणि मध्ये मध्ये सोडलेले हिरवे पडदे. इथे मला मी निसर्गाच्या फार जवळ असल्याचा भास होतोय. कधी ना कधी मृत्यू येणार हे अटळ सत्य मी मनात अगदी ठसवले आहे. त्यामुळे अशावेळी मला खरेतर फार शांत वाटायला हवे. असा एकांत.. अशी शांतता.. सगळे कमावून आयुष्याची उत्तरयात्रा चालू केलेल्या एखाद्या कवीला, एखाद्या लेखकाला अजून काय हवं ? खरेतर अशा जागी कसल्याही भीतीचा लवलेशही दूरदूरवर दिसत कामा नये. पण नाही. हे हवंहवंसं वातावरण असलं तरी मन स्वस्थ नाहीये. काहीतरी सलतंय.. आत.. खोल.. माहित नाही काय? माहित नाही का? पण भय इथले संपत नाही"
बहुरूपी बहुकल्पी अशा मूर्त भयांसाठी जगात उपाय आहे आणि उपाय नसेल तर दोष द्यायला नशिब आहेच. पण कवीने उल्लेख केलेलं भय ते हे नाही. ते अदृश्य आहे, अमूर्त आहे, अक्षय आहे, कधी न संपणारं आहे . अगदी जीवघेणं नसलं तरी जगूही न देणारं भय. सतत जाणवणारं पण स्वतःच स्वतःलाही ना कळणारं . दिनरहाटीच्या कामात ज्याने त्याने जमेल तसा प्रयत्न करून त्याला कितीही खोल गाडले, तरी प्रत्येक एकाकी क्षणाला न चुकता उसळी मारून वर येणारं.
आणि त्यासोबत समोर येणारा तो चेहरा - मज तुझी आठवण येते. भय तर न संपणारंच आहे पण ते टाळण्यासाठीच्या प्रयत्नात माहित नाही का पण तुझी आठवण येते. तू कोण ? आई ? बायको ? मित्र ? प्रेयसी ? कि भगवंत ? ज्याचे त्यालाच माहीत. पण खरेच "तू कोण" याने फरक पडतो का? तू कोणीही असले, पण या भयाने, या भीतीने व्यापलेल्या माझ्या मनात, जिथे दुसऱ्या कशालाच यायला वाव नाही, तिथे अचानक तुझी आठवण येते. कशी? का? याचे उत्तर मिळत नाही. पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार तसे तुझ्या आठवणीला घेऊन मी धडपडण्याचा प्रयत्न करतो, अज्ञाताशी डाव मांडायची हिम्मत करतो. माझा एकाकीपणा हीच त्या भयाची ताकद आहे आणि तुझी आठवण आल्यावर ते आपोआप क्षीण व्हायला हवे. हो ना? पण नाही.. तुझी आठवण येताना पुन्हा नव्या भयाला सोबत आणते. हि आठवण नेहमी अशीच येईल का? नाही आली तर ? आणि पुन्हा मी ह्या माझ्या न संपणाऱ्या भयाच्या आणि तुझ्या सतत येणाऱ्या आठवणींच्या चक्रात सापडतो . वर्तुळाला कधी आदी अंत असतो का?
म्हणून 'निर्भय' हि केवळ नाममात्र संज्ञा उरते. जगात निर्भय असे कोणीच नाही. सगळ्या भयांना टाळून संपवून अगदी मोक्षप्रद जागी बसले आणि तुझी आठवण आली कि पुन्हा या भयडोहात ओढले जाणे निश्चित आहे. आणि म्हणून हे भय संपणार नाही कारण भय संपले तर तुझी आठवण येणार नाही याचे भय आहेच. मी म्हंटले ना, हे वर्तुळ आहे. भयात तुझी आठवण आली काय किंवा तुझ्या न आलेल्या आठवणींचे भय काय ? त्यामुळे कवीच्या या दोन्ही ओळी, आपल्याला एका कधी न संपणाऱ्या, अगणिताच्या चकव्यात अडकवतात. यातून कोणालाच बाहेर येणे शक्य नाही आणि म्हणूनच हे शाश्वत सत्य आहे.
मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही
-- विशाल (०४/०८/२०२०)
Wednesday, July 29, 2020
प्रेम केल्याची निशाणी फक्त नावाला - स्वप्निल शेवडे
Saturday, March 21, 2020
पाहिली नाहीत कोणी आत तुटलेली मने - गोविंद नाईक
पाहिली नाहीत कोणी आत तुटलेली मने
गाजती बाहेर केवळ बेगडी आलिंगने
आणते अवसान उसने झिंगणारी लेखणी
चालती गुत्त्यात ज्यांची खाजगी संमेलने
मारता आली न साधी फुंकही ज्यांना कधी
ते म्हणे देतात हल्ली वादळावर प्रवचने
त्याच त्या पूजेस आता देवही कंटाळला
तेच भटजी , त्याच पोथ्या , तीच ती आवर्तने
धर्म , जाती , प्रांत यातच आग भडकत राहिली
माणसांसाठी न केव्हा पेटली आंदोलने
प्राण भीष्मासारखा त्यागेन मी शरपंजरी
आंधळ्यांनी धन्य व्हावे भोगुनी सिंहासने
- गोविंद नाईक
Saturday, January 4, 2020
पाऊस असा आला की - विजय आव्हाड
पाऊस असा आला की.. मन राहिले न था-याला..
रिमझिमत्या आठवणींची लागली ओढ वा-याला...
पाऊस असा आला की.. तळमळतो दिवस कधीचा..
हे गाव बुडाल्यापासून हा सुटतो धीर नदीचा...
पाऊस असा आला की.. कळ गर्भाची वनवासी..
पाण्यात वांझ खडकाच्या बाळुते धुतो संन्यासी...
पाऊस असा आला की.. सार्थकात भिजले व्यर्थ..
भांगेच्या देहावरही आभाळ घालते तीर्थ...
पाऊस असा आला की.. घर डोळ्यांसंगे गळते..
अभिमानी दारिद्र्याला गगनाची दौलत मिळते...
पाऊस असा आला की.. मी लिहिले असते गाणे..
पण झाडासंगे भिजली सगळीच वहीची पाने...
विजय आव्हाड...
Tuesday, December 10, 2019
भारत एक खोज
पंडित नेहरूंच्या The Discovery of India या कादंबरीवर आधारित श्याम बेनेगल निर्मित भारत एक खोज ही मालिका साधारण १९९० च्या दरम्यान दूरदर्शन वर प्रदर्शित झाली होती. टेलिव्हिजन चा भारतात नुकताच प्रसार विस्तार चालू झालेल्या या काळात जेमतेम ४-५ वर्षाच्या मला यातील काही ओ की ठो कळले नव्हते. नाही म्हणायला त्याच्या टायटल सोंगमधले संगीत आणि "छुपा था क्या कीसने ढका था ... अशा काही ओळी लक्षात राहिल्या होत्या.
यानंतर जवळपास ३० वर्षांनी यु ट्यूब वर काहीतरी शोधताना याचा एक विडिओ आला. उत्सुकता जागृत झाली आणि ऑफिसच्या बसमध्ये प्रवासात रोज जमेल तसे एक दीड भाग बघत आजच ही मालिका पूर्ण केली
अत्यंत सुंदर अशी मालिका आहे. अगदी आर्यपूर्व हडप्पा संस्कृतीपासून चालू होऊन भारताच्या स्वातंत्र्यपर्यंत चा इतिहास घडलेल्या, ऐकीव किंवा समकालीन साहित्याच्या प्रसंगातून ५३ भागात मांडला गेला आहे. त्याकाळी कुठल्याही VFX शिवाय खरे खुरे सेट लावून तो काळ जिवंत केला गेला आहे. त्यावेळचे राहणीमान जीवनपद्धती त्यात होत गेलेले बदल यांचा मेळ यात दिसून येतो. अगदी हडप्पाने सुरुवात करून आर्यांचे आगमन, रामायण महाभारत गौतम बुद्ध अभिजात शाकुंतल, मौर्य साम्राज्य, विविध साम्राज्याचे उदय अस्त, राणा सांग, पृथ्वीराज चौहान, म्लेंच्छचे आक्रमण, विविध बादशहा, मुघल साम्राज्य, ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार, 1857 चे स्वातंत्र्य समर त्यानंतर सामाजिक चळवळी आणि लोकमान्य पर्व आणि गांधीपर्व ते स्वातंत्र्य अशा टप्याटप्याने ही मालिका उलगडत जाते. प्रत्येक भाग वेगळ्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे.
त्यावेळच्या नावाजलेल्या टीव्ही तसेच सिनेमा कलाकारांनी यात विविध भूमिका केल्या आहेत. ओम पुरी सारखा दिग्गजाने रावण, दुर्योधन, औरंगजेब, राजा कृष्णदेवराय, सम्राट अशोक आणि इतर अनेक व्यक्तिरेखानसोबतच आपल्या खर्जातील आवाजात या मालिकेचे निवेदन ही केले आहे. याव्यतिरिक्त पल्लवी जोशी, इरफान खान, पियुष मिश्रा, इला अरुण, कुलभूषण खरबंदा (अकबर), अलोकनाथ(स्वामी विवेकानंद), मोहन गोखले (गोविंद रानडे), सदाशिव अमरापूरकर (ज्योतिबा फुले) शुभांगी गोखले (सावित्रीबाई फुले), शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शाह ( छत्रपती शिवाजी) हेही या मालिकेत दिसून येतात. अजित करकरे, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यासारख्या मराठी गायकांनी गाणी गायली आहेत
या मालिकेतील प्रसंगांच्या पुराव्याबाबत, खऱ्या इतिहासबाबत, पंडित नेहरूंच्या दृष्टिकोणाबाबत अनेक वादविवाद आहेत पण एक सुंदर मालिका म्हणून पाहण्यास हरकत नाही. IMDB वर 8.9 रेटिंग आहे आणि यु ट्यूबवर सर्व 53 भाग मोफत उपलब्ध आहेत.
-विशाल (१०/१२/२०१९)
Sunday, December 8, 2019
फसलेला पानिपत
फसलेला पानिपत
तसे मी फारसे चित्रपट थिएटरला जाऊन पाहण्याचा शौकीन नाही. आणि हिंदी तर नाहीच नाही. तरीही लग्नाचा वाढदिवस साधून आणि मुलाला हत्ती घोडे लढाई पाहायला मिळेल या हेतूने काल पानिपत पाहिलाच.
तसे आशुतोष गोवरीकरांचे चित्रपट मला आवडतात पण दुर्दैवाने हा तशी छाप सोडण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. अनेक गरज नसलेले प्रसंग रंगवून आणि इतिहासातील महत्वाचे प्रसंग वगळून तीन तासाची लांबी राखली गेली आहे.
सिनेमॅटिक फ्रीडम च्या नावाखाली पार्वतीबाई आणि सदाशिव भाऊंचा रोमान्स तसेच सिनेमातील गाणी आणि नृत्य यावर मी आवर्जून बोलणार नाहीये (बोलण्यासारखे काही नाहीच त्यात हो पण आपला गश्मीर अर्जुनपेक्षा छान नाचला आहे हे नक्की) पण गोपिकाबाई आणि पर्वतीबाईंमधील वितुष्ट फक्त फॅमिली ड्रामा टच साठी दाखवल्याचा फील येतो. त्याचा मुख्य कथेशी काही संबंध लागत नाही. दत्ताजी शिंदेंच्या मृत्यूचा प्रसंग अगदीच नाममात्र 30 सेकंडचा दाखवला आहे. याला अजून व्यापक आणि प्रभावी पद्धतीने दाखवत आले असते. पानिपतचे युद्ध मैदानावर फक्त अर्धा एक दिवस खेळले गेले पण युद्धपुर्व मैदानाच्या बाहेर घडलेल्या गोष्टींमुळे, भाऊ आणि अब्दालीमधील डावपेचांमुळे त्याला जास्त महत्व प्राप्त होते. अन्नपाण्यावाचून मराठा सैन्याची झालेली दैना आणि त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात मराठ्यांची काय परिस्थिती होती(माती खाण्याची वेळ आली होती), अब्दालीने बाटवलेले पाणी यावर काहीच भाष्य नाही. मोकळी भांडी आणि युद्धावर जाताना पार्वतीबाई भाऊसाहेबांना गुळाचे पाणी देतात आशा दोन वाक्यात हे प्रसंग संपवले आहेत.त्यादिवशी मराठ्यांचा संक्रांतीसारखा मोठा सण होता तेही कुठे येत नाही. भाऊंच्या मदतीसाठी पुण्याहून निघालेले नानासाहेब आणि त्यामुळे अब्दालीची झालेली गोची ह्याचा साधा उल्लेखही नाही. गोविंदपंतांच्या बलिदानाचाही उल्लेख येत नाही. असे अनेक प्रसंग वगळले गेले आहेत. याउलट अब्दाली आणि भाऊंची भेट हा प्रसंग ओढूनताणून केवळ "मिटटीके एक कण के लियेभी जान दे सकता हु" या एक संवादासाठी रचला आहे असे वाटते. त्यामुळे रवींद्र महाजनी (मल्हारराव होळकर), गश्मीर महाजनी(जनकोजी शिंदे) मिलिंद गुणाजी(दत्ताजी शिंदे) मोहनिश बहल (नानासाहेब पेशवे) ही पात्रे असून नसल्यासारखी वाटतात. भाऊ पार्वतीबाई आणि अब्दाली वर फोकस करायच्या नादात नजीबखानाचे महत्वाचे पात्र जवळपास आऊट ऑफ फोकस झाले आहे. अत्यंत कुटील आणि विखारी असलेले हे पात्र रंगवण्यासाठी मंत्रापेक्षा (मंत्रा हे त्या अभिनेत्याचे नाव आहे) कोणीतरी अजून ताकदीचा कलाकार हवा होता.
डायलॉग च्या बाबतीत चित्रपट पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. वरील उललेखलेल्या ऐतिहासिक घटनांच्या निमित्ताने खूप सुंदर लिहिता आले असते. पण भाऊ आणि पार्वतीबाई यांच्यातील प्रसंग सोडून इतरत्र डायलॉग जवळपास नसल्यातच जमा आहेत. (अर्जुन कपूर च्या अरोमॅंटिक डायलॉग डिलीवरीवर गोवरीकरांना शंका असावी बहुधा, पण खरे सांगतो पूर्ण चित्रपटात याच्या चेहऱ्यावरची एक रेष हलली असेल तर शप्पथ)."बचेंगे तो और भी लढेंगे" सारखे इतिहास प्रसिद्ध डायलॉगसुद्धा दुर्लक्षित आहेत. चित्रपटात कुठेही अंगावर शहारा येत नाही, डोळे भरून येत नाही, आपण खिन्न होत नाही की देशभक्ती जागृत होत नाही. युद्धच्या तयारीच्यावेळी भाऊ दांडपट्ट्याबद्दल बोलताना दाखवला गेला आह.े युद्धातही दांडपट्टा खेळताना दिसला असता तर अजून मजा आली असती
जमेच्या बाजूंबद्दल बोलायचे झाले तर युद्धनीती छान दाखवली गेली आहे. सैन्याचे संचालन तोफांचा वापर याबाबत डिटेलिंग चांगले आहे (एक दोन सिन मध्ये टॉप अँगल शॉट एखाद्या गेम चा भाग असल्यासारखे वाटले)युद्धानंतरचे अब्दालीचे नानासाहेबांना पत्र हे माझ्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे कारण याबाबत लोकांना फारच कमी माहिती आहे.
कदाचित माझी रणांगण नाटकाची पारायणे झाली असल्याने माझ्या या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या असतील पण माझ्यामते कोणत्याही पात्राला संपूर्ण न्याय देण्यात चित्रपट फेल गेला आहे. हो पण ज्यांनी पानिपत युद्धावर काही वाचलेले नाही ज्यांनी रणांगण नाटक किंवा द ग्रेट मराठा मालिका पाहिली नाही त्यांनी पाहण्यास हरकत नाही.
- विशाल (९/१२/२०१९)
Tuesday, December 3, 2019
अडगळीला नवी जाग यावी पुन्हा - गोविंद नाईक
अडगळीला नवी जाग यावी पुन्हा
एक चिठ्ठी तुझी सापडावी पुन्हा
रंग आता नको कोणताही मधे
थेट स्पर्शातली भेट व्हावी पुन्हा
एवढे चांदणे पसर शेजेवरी
की घडीने घडी विस्कटावी पुन्हा
आजही घर तुझे सापडेना मला
पावलांची नजर घुटमळावी पुन्हा
अंतरंगातला भोवरा थांबला
एक गिरकी तिने आज घ्यावी पुन्हा
गोविंद नाईक
Thursday, November 21, 2019
तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला -– विंदा करंदीकर
तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला ।।
तो झाला सोहळा। दुकानात.
जाहली दोघांची । उराउरी भेट
उरातलें थेट । उरामध्ये
तुका म्हणे “विल्या। तुझे कर्म थोर;
अवघाचि संसार । उभा केला।।”
शेक्सपीअर म्हणे । एक ते राहिले; ।
तुका जे पाहिले विटेवरी.”
तुका म्हणे, “बाबा ते त्वां बरे केले,
त्याने तडे गेले। संसाराला;
विठठ्ल अट्टल, । त्याची रीत न्यारी
माझी पाटी कोरी । लिहोनिया.”
शेक्सपीअर म्हणे । तुझ्या शब्दामुळे
मातीत खेळले । शब्दातीत
तुका म्हणे गड्या । वृथा शब्दपीट
प्रत्येकाची वाट । वेगळाली
वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच.
ऐक ऐक वाजे । घंटा ही मंदिरी।
कजागीण घरी । वाट पाहे.”
दोघे निघोनिया गेले दोन दिशां
कवतिक आकाशा आवरेना ।
Thursday, November 14, 2019
ढळताच एक अश्रू, बोलेल राख माझी - आनंद पेंढारकर
ढळताच एक अश्रू, बोलेल राख माझी
सरलो कसा कसा मी, सांगेल राख माझी
हातात हात माझ्या होता कधी तुझाही
इतकीच फक्त कबुली मागेल राख माझी
संपून जन्म गेला जे मांडता न आले
ते विषय जीवघेणे टाळेल राख माझी
फिर्याद थांबलेली ओठी असेल सुद्धा
पण आब गुंतल्याची राखेल राख माझी
जाता निघून सारे कर स्पर्श एक हलका
बघ ओलसर जराशी वाटेल राख माझी
निःश्वास टाकल्यावर, वळशील तू निघाया
पायास त्या क्षणाला माखेल राख माझी
नजरेपल्याड जेव्हा होशील सावरूनी
हलकेच शेर हळवा मांडेल राख माझी
आनंद पेंढारकर
Thursday, November 7, 2019
तुझी आठवण सहज निघाली - चिंतामणी जोगळेकर
तुझी आठवण सहज निघाली
कुठे दूर चुकचुकल्या पाली
कुणी म्हणाले रडू नको रे
डोळ्यामध्ये धूळ उडाली
वाट पाहुनी थकवा आला
समई मधली ज्योत निमाली
सांग जरा तू लपून कोठे
विस्तव थोडा राखेखाली
थकले आता पायच माझे
बसून एका झाडाखाली
भेट घडावी वाटत असते
साद न कोणी कोणा घाली
दूर कुठेशी थंडी पडली
इथे उगा घुसमटल्या शाली
©चिंतामणी जोगळेकर
Friday, November 1, 2019
लळा-जिव्हाळा, रुसवा-फुगवा, राग वगैरे - अनिल आठलेकर
लळा-जिव्हाळा, रुसवा-फुगवा, राग वगैरे
तुझ्या नि माझ्या आयुष्याचा भाग वगैरे
कुणी वेडसर बनवत जातो नवीन वाटा,
काढत बसते दुनिया नंतर माग वगैरे
एक शहारा अलगद येतो तुझा पहाटे,
म्हणून होते सकाळ... येते जाग वगैरे
काय गाडले आहे नक्की मौनाखाली?
फुत्कारत आहेत विचारी नाग वगैरे
जंगल-बिंगल मधे फालतू हवे कशाला?
तोडू, कापू शिसम, बाभळी, साग वगैरे
तसा खरा आनंदी आहे स्वभाव माझा
दृष्ट न लागो म्हणून हा.. वैताग वगैरे
पायाखालिल जमीन सरकत आहे माझ्या
काय करू घेऊन तुझा भूभाग वगैरे ..
~ अनिल विद्याधर आठलेकर
Thursday, October 31, 2019
जरा तडजोड करणारेच - सदानंद बेंद्रे
जरा तडजोड करणारेच रस्ते शोधले असते
मला तू जीवना अन् मी तुलाही सोसले असते
पगारी कारकूनाचे मला काळीज असते तर
उमाळे बिनपगारी वेदनांचे खोडले असते
नवी खानेसुमारी भावनांची मांडली असती
किती अस्सल किती खोट्या, बरोबर मोजले असते
असूदे मोगरा किंवा असेना शेण मेजावर
सुखाने कोरडे छापील शेरे ठोकले असते
टपालावर कशाला मारला तू खाजगी शिक्का
जगाने वाचण्याआधी मला ते पोचले असते
कशाला पाहिजे तो भिल्ल अन् तो बाणही त्याचा
फुकटच्या टाचणीवर काळजाला खोचले असते
मनाला मारताना फार काही वाटले नसते
कदाचित घास गिळताना जरासे टोचले असते
दिला असता तुला तो चंद्र मी मोठ्या मनाने अन्
तुझ्या नावेच बिनबोभाट तारे तोडले असते
- सदानंद बेंद्रे 'मुसाफिर'
Sunday, October 27, 2019
जे करायचे ते कर जा
शिंकलो, जा जे करायचे ते कर जा
जिंकलो, जा जे करायचे ते कर जा
सांडलो, होऊनि रक्त मातीच्यासाठी,
भांडलो, जा जे करायचे ते कर जा
भंगलो, घाव घेऊन प्रीतीचे रक्तीम,
रंगलो, जा जे करायचे ते कर जा
तरसलो, जरी एकाच कटाक्षातूनी,
बरसलो, जा जे करायचे ते कर जा
पोळलो, जीवाचा यत्न करून विश्वाशी,
खेळलो, जा जे करायचे ते कर जा
टोचलो, त्यास नडला जो ध्येयप्राप्तीला,
पोचलो, जा जे करायचे ते कर जा
साचलो, कुठेही नाही जिथेही गेलो,
नाचलो, जा जे करायचे ते कर जा
खेटलो, थेट जाऊन सुबकता पाहता,
पेटलो, जा जे करायचे ते कर जा
झोपलो, शांत निर्धास्त वेळ आल्यावर,
लोपलो, जा जे करायचे ते कर जा
- विशाल (२७/१०/२०१९)
Wednesday, October 23, 2019
मी अनौरस यातनांचे मानले अर्भक तुला- स्नेहल कुलकर्णी
मी अनौरस यातनांचे मानले अर्भक तुला
पण दयाळू काळजाने ..घेतले दत्तक तुला
जानकी नाही जरी मी वाल्मिकींच्या काळची
एकपत्नी राघवाचे मानते द्योतक तुला
पाळली नाहीस आज्ञा रोज बिलगुन जायची
लागला घालून दयावा मग तसा दंडक तुला
वाटतो संदेह भक्ती व्यक्त करताना जरा
पान बेलाचे शिवा पण वाहते बेशक तुला
ताठ केली आदराने मान झुकलेली तरी
लीन आपोआप होते पाहुनी मस्तक तुला
सोवळी अद्याप प्रतिमा राहिली होती तुझी
वाटते चुंबून केले भ्रष्ट मी नाहक तुला
एकदा वाचून गाथा.. बघ तुक्याची आजही
शेवटी येईल सुद्धा ..न्यायला पुष्पक तुला
डॉ .स्नेहल कुलकर्णी
Saturday, October 19, 2019
राधा-मोहन
बावरली राधा दिसतेे ना दिसतो मोहन
फांदीवरुनी गंमत बघतो हसतो मोहन
उधळीत वाळू फिरते राधा किनाऱ्यावरी
वाळूच्या कणकणात भरुनी असतो मोहन
मिलन ना तरी मनात केवळ राधा राधा
असती सोळा सहस्त्र तरीही नसतो मोहन
घन दाटून येतात अचानक पाऊस येतो
झुरते तिकडे राधा इकडे झुरतो मोहन
तिथे रुक्मिणी भामा झगडे प्राजक्तावर
इथे राधेच्या रोमरोमात फुलतो मोहन
तिन्ही लोक भरूनी त्याची माया जरीही
राधेला वगळून कितीसा उरतो मोहन
- विशाल (०५/०३/२०१९)
Wednesday, October 16, 2019
प्रारब्ध
माठाला जातो तडा, बाप बापुडा, काळजीत पडतो
माळ्यावर एकच घडा, तोही कोरडा, तान्हुला रडतो
अश्रूंचा सुटतो वेग, टाचेची भेग, सणाने कळ
नशिबाची पुसतो रेघ, भिजवतो मेघ, पाठीचा वळ
दाबून उरी हुंदका, राहुनी मुका, पाहिली दुनिया
जो उभा जीवाचा सखा, तोही पारखा, पाठ फिरवुनिया
मिणमिणतो नंदादीप, जाता समीप, वात थरथरते
इतके हे वारेमाप, जाहले पाप, रांजणी भरते
का झाड असे निस्तब्ध, फुटे ना शब्द, गळ्यातून काही
ते हवे तसे प्रारब्ध, कुठे उपलब्ध ? सांग ना आई
- विशाल (१७/१०/२०१९)
Friday, July 19, 2019
तरळले लोचनी आसू तिला हसवून जाताना
तरळले लोचनी आसू तिला हसवून जाताना
उरली वीण थोडी जन्म हा उसवून जाताना
न झाला हात कातर क्षणभरी थरथर सुद्धा नाही
न काही वाटले, खंजीर उरी धसवून जाताना ?
निघाली भेट कपटी जी सुगंधी वाटली तेव्हा
विषारी माळली होती फुले .. फसवून जाताना
तुटतो जीव, पाऊल रोज अडते उंबऱ्यामध्ये
पिलांना एकटे घरट्यामध्ये बसवून जाताना
देणे मातीचे आतातरी फिटले असेल बहुधा
रित्या हातीच गेला गाव तो वसवून जाताना
विना जाणीव घडलेले असे गारुड होते ते
पुंगीत गुंगले सारे ...साप डसवून जाताना
कुणी माळी महार कुणी इथे झाले तुका वाणी
मनावर भाव विठ्ठलमय असा ठसवून जाताना
- विशाल (१९/०७/२०१९)