Tuesday, January 25, 2011

कधी तू...

कधी तू रिमझिम झरणारी  बरसात 
कधी तू चमचम करणारी चांदण्यात 
कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा 
बिजलीची नक्षी अंबरात 
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात 
कधी तू ....

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी 
रातराणी वेड्या जंगलात 
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू.....

जरी तू कळले तरी ना कळणारे 
दिसले तरी ना दिसणारे 
विरणारे मृगजळ एक क्षणात 
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू.....  
----- मुंबई पुणे मुंबई

Tuesday, January 18, 2011

अखेरचा श्वास

डोईवरी धरण्यास जरा आकाश ठेव
'नाही' म्हणाया आधी तू विश्वास ठेव

विसरशील मजला तू अथवा ...... सोड ते
मात्र तू डोळ्यात माझ्या भास ठेव

तुझ्या डोळ्यात आसवांचे काम काय ?
ठेवायची तर स्वप्नांची आरास ठेव

गेल्यानंतर कोण तुला ओळखेल येथे ?
आधीच घडवून एक नवा इतिहास ठेव

जरी भोवती रखरखणारा ग्रीष्म खडा
अंतरी सदा वासंतिक मधुमास ठेव

निघून जा पण जाता जाता हसून जा
हास्यामधुनी पुनर्भेटीचा ध्यास ठेव

समाधान माझेच कराया विचारेन मी
'नकार' दे तू कारण मात्र 'खास' ठेव

कोरले ज्याच्यावरी तव नाव मी
जपून तो माझा 'अखेरचा श्वास' ठेव

----- विशाल