Wednesday, September 9, 2015

सारेगमप मपधनिसा


गणेशोत्सवात हल्ली गणपतीची सिनेमाच्या तालावरची फुटकळ गाणी ऐकली कि मला अजूनही तिच्या त्या गाण्याची आठवण येते. २५ वर्षे झाली तरी अज्जिबात पुसट झालेल्या त्या सुरात काय जादू होती काय माहित. प्राथमिक शाळेचा वर्ग भरलेला असायचा. १० ते ची शाळेची वेळ असायची. अभ्यासाचे विषय पर्यंत संपवून एक तासात बाई अभ्यासेतर गोष्टी करून घ्यायच्या. (त्यावेळी madam म्हणायची पद्धत निदान मराठी शाळांमध्ये तरी चालू व्हायची होती.)  त्यात प्रामुख्याने अथर्वशीर्ष , रामरक्षा, मनाचे श्लोक असायचे. उरलेल्या वेळात गोष्टी, विनोद, कोडी, सामुहिक कविता, वक्तृत्व किंवा गाणी असायची. अर्धवट लक्ष त्याकडे आणि अर्धवट लक्ष बाहेरच्या घंटेकडे आणि न्यायला आलेल्या पालकांकडे असायचे आणि अशातच तिचे ते गाणे चालू व्हायचे -

"सारेगमप मपधनिसा,
मंत्रमुग्ध अवतार मंत्रमुग्ध अवतार …. "

त्यावेळी पडद्यावरचे गाणे जुही किंवा माधुरी म्हणते अशी आमची दाट समजूत होती आणि लता आणि आशा या शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका आहेत असा गैरसमजही होता. गाणे नाचणे संगीत हे मुलींचे कार्यक्षेत्र असे वाटायचे. त्यामुळे त्यात त्यावेळी जास्त रस घेत नसलो तरी वर्गातील एकमेव गायिका आणि शिवाय पुढे उभे राहून बिनधास्त गाणे म्हणते म्हणजे नक्की मोठेपणी सिनेमात हिरोइन होणार असेही मनात यायचे. असो पण तरी तिने सूर लावला कि आपोआप डोक्यात त्याचे संगीत सुरु व्हायचे

"कऱ्हा नदीच्या तीरावरती घे गजमुख अवतार" ह्या ओळीनंतर चे "घे गजमुख अवतार घे गजमुख अवतार" हा कोरस  ती स्वताच म्हणायची नि श्वासात जराही खंड पडता पुढे "दुमदुमे ता था तै तत्कार नाचतो शिवनंदन सुकुमारमयुरेश हा रणी प्रकटला मावळला अंधार" हे कडवे संपून पुन्हा "सारेगमप मपधनिसा" चालू व्हायचे तेव्हा तर अगदी मंत्रमुग्ध होऊन जायचो. आणि शेवटी "गोसावीसुत मोरयाचा झाला जयजयकारम्हणल्यानंतरचे त्या विशिष्ट लयीतले "मंगलमुर्ती मोरया" घरी पोचेपर्यंत ओठांवर रुळलेले असायचे

त्यावेळी या शब्दांचे अर्थ हि माहित नव्हते. लय ताल सप्तसूर आलाप  इतकेच काय तर या गाण्याची मूळ गायिका लता / उषा मंगेशकर आहे आणि अष्टविनायका मधील मयुरेश्वरावर हे गाणे लिहिले आहे हे कळायला पुढच्या दहा वर्षाचा काळ उलटावा लागला. नंतर शाळा बदलल्या संपर्क लोप पावले (असेही त्यावेळी तरी कुठे मुलींशी फार बोलायला जमायचे म्हणा ) पण अजूनही गणपती म्हणले कि पहिले गाणे आठवते ते हेच आणि कानात आवाज घुमतो तिचाच.

(गीताचे बोल लिहिताना काही चुकले असल्यास क्षमस्व.)

तिच्यापर्यंत हा लेख पोचेल तिला सगळे आठवेल इतर वर्गमित्रांना काही आठवेल याबाबत तशी शंकाच आहे. पण बालपणीच्या या सुंदर आठवणीसाठी तिला या लेखाद्वारे धन्यवाद म्हणावेत यासाठीच हा प्रपंच

--- विशाल

Tuesday, August 4, 2015

वेग (शतशब्दकथा)

"किती हळू चालवतोस रे. मागचे सगळे गेले पुढे"
"जाऊ दे गं. एकतर पावसामुळे रस्ता निसरडा झालाय"
"किती घाबरतोस रे जीवाला. लग्नाआधी किती बिनधास्त होतास"
"ती गोष्ट वेगळी होती. जबाबदारी नव्हती. आता तू आहेस. पिलू आहे. तुला सांगतो पिलू झाल्यापासून गाडी कधी ४०-५०च्या पुढे न्यावीशी वाटतच नाही. जरा वेग वाढला की ती येते डोळ्यासमोर आणि आपोआप ब्रेकवर पाय जातो"
"किती जपतो जीवाला. पण अंधार पडायच्या आत पोचायचे ना. पिलू वाट पहातीये. आता तर पाउस पण वाढायलाय. केवढा आवाज येतोय"
"हं.. पण हा पाउस नाही. कसलेतरी बारीक दगड आणि माती पडतीये काचेवर"
"गाडी थांबवून बघ जरा"
.
.
.

** काल घाटात चारचाकीवर दरड कोसळून दोनजण ठार**


--- विशाल 

Monday, June 29, 2015

एक काम करण्याची परवानगी दे फक्त

रागाने झिडकारशील
स्वतःपासून दूर करशील
पण एक काम करण्याची परवानगी दे फक्त

मी बांधलेल्या मंगळसूत्राची वाटी
तुझ्या नकळत गळ्यात होईल पलटी
ती सरळ करण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

केसांच्या बटांची ती रेशीमडोर
लटक्याने  येईल डोळ्यांसमोर
ती मागे सारण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

घाईत कधी हळूवार
फसेल कुठेसा पदर
तो सोडवण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

रात्री एकांती कधी चमकेल वीज
दचकून अचानक तुटेल नीज
कुशीत घेऊन थोपटण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

तुजवीन सखे काय ठाव
कधी अर्ध्यावर मोडेल डाव
आठवणीत येण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त

--- विशाल

(भावानुवाद / प्रेरणा : गुलजार - मुझको_इतने_से_काम_पे_रख_लो)
Thursday, June 4, 2015

हाक

"आजच नेमके साहेबाला काम आठवले" सदा स्वत:शीच बोलत होता. "एक तर आज अमावास्या, त्यातच तो रोजचा रोड पालिकेने सकाळी खोदून ठेवलेला म्हणजे त्या आडवाटेने कच्च्या रस्त्याने स्मशानावरुन फिरून जावे लागणार म्हणून लवकर निघावे म्हणले तर ११ वाजवले xxxने" साहेबाला शिव्या घालीत गडबडीत सायकल ताणत असलेल्या सदाची तंद्री पत्र्याच्या खडखडाटाने मोडली.   पॅडल फिरेना म्हणून त्याने उतरून पाहिले. सायकलची चेन निसटलेली. आता सायकलच्या नावाने अजून दोन शिव्या तोंडातून बाहेर पडल्या. सदाने आजूबाजूला पाहिले. चिटपाखरुहि नव्हते. मागे पडलेला आणि पुढे असलेला दिव्याचा खांब दोन्ही मेणबत्ती एवढे दिसत होते. त्यामुळे तिथे थांबून चेन बसवायची सदाची हिम्मत होत नव्हती. सायकल तशीच ढकलत नेण्याचा निर्णय त्याने घेतला. अंधारामुळे घड्याळात किती वाजले तेही कळायला मार्ग नव्हता. दुरून नदीवरून सू सू वाहणारा बोचरा  वारा आणि सोबत आता सायकलच्या चेन चा लयबद्ध आवाज सदाच्या भीतीत अजूनच भर घालत होता. "एकतर आज अमावास्या, रात्रीची वेळ, त्यात आपला मनुष्यगण, अंधुक प्रकाशात काळीकुट्ट पिंपळाची एखादी दुसरी आकृती आणि आजूबाजूला टाकलेले उतारे म्हणजे स्मशानाचा भाग चालू झाला बहुतेक." थंडीपेक्षा असल्या एक ना अनेक विचारांनीच तो जास्त गारठला होता. हा स्मशानाचा भाग लवकरात लवकर कसा पार करता येईल आणि समोरच्या खांबावरील दिव्याच्या प्रकाशात सायकलची चेन लाऊन पटकन घर कसे गाठता येईल" म्हणून सदा 'राम राम' म्हणत झाप झाप पावले टाकू लागला. दूर स्मशान दिसायला लागले होते पण ‘तिकडे पहायचे नाही, पहायचे नाही’ असे स्वत:लाच बजावून देखीलहि एक नजर तिकडे गेलीच.
"अरे बापरे, यावेळेला चिता पेटलेली? अरे हो, संध्याकाळी उशीर होईल म्हणून केलेल्या फोन वर बायको म्हणाली होती कुलकर्ण्याचा म्हातारा दुपारी गेला. गेली सहा वर्षे अंथरुणावर काढली. अंगाची काडी झालेली पण तरी नव्वदी गाठली." त्याच्या चेहरा समोर येताच सदा थरारला. मनातले विचार झटकून त्याने नाइलाजाने दिव्याखाली सायकल थांबवली. खाली डोके करून लगबगीने चेन बसवायच्या प्रयत्नात असतानाच त्याला साद आली "सदा …" त्याने चमकून वर पाहिले. "आपल्याला भास झाला का? कि ….  ?"  . नाही नाही भासच असेल. दुर्लक्ष करु म्हणता म्हणता त्याची नजर स्मशानाकडे वळली  आणि सदा जागच्या जागी गोठला. चितेच्या प्रकाशात हातवारे करणारी आकृती पाहून त्याचा चेहरा पांढराफट्ट पडला. ओठातले रामनाम तर आधीच बंद झालेले. धुरात अधिकच विचित्र दिसणारा तो प्रकार आपल्याकडे सरकतोय असे त्याला वाटले. धडधड्णारे हृदय थरथरणाऱ्या हातांनी काबू करण्याचा प्रयत्न करीत सदा नकळत उभा राहिला. दुरून अस्पष्ट शब्द कानावर येत होते. '…… या …. खा …. माणसे …. " शेवटच्या शब्दाने मात्र सदाचा  धीर सुटला . सायकल तिथेच टाकून त्याने जी धूम ठोकली ते थेट घराच्या पायरीवरच येउन आदळला. धापा  टाकीत त्याने दार ठोठावले. हाक मारण्यासाठी तोंडातून आवाज फुटतच नव्हता. बायकोने दरवाजा उघडला कसाबसा आत येउन सदा तेथेच कोसळला. दरदरून घाम सुटला होता. अंग तापाने फणफणत होते. "नको… भूत … स्मशान …  खाणार… " तापात काहीतरी बरळत होता. त्याची हि अवस्था पाहून बायकोने डॉक्टरांना  फोन लावला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर रात्री उशिरा त्याची झोप लागली.
"सदानंद… अरे सदानंद… "सकाळी दिनकरच्या हाकेने सदाची झोपमोड झाली. बाहेर कसलातरी दंगा ऐकू येत होता
"बरे झाले आलात भाओजी" सदाची बायको दरवाजा उघडताच म्हणाली.
"हि सदाची सायकल ना? लाईटीच्या डांबाखाली पडलेली. कवरवर नाव बघून ओळखली. आणि घेऊन आलो. चेन पडल्या. बहुतेक चोर नेत असल पण चेन पडल्याने सोडून पळाला असल… बाकी बाहेर एवढा गलका चालू आहे आणि हा अजून झोपलाय ? … कुठे आहे सदानंद ?"
"अहो बघा ना.  कालपासून काय झालय यांना. कामावरून उशिरा आले. कसेतरीच करत होते. काहीबाही बरळत होते.  रात्रीपासून तापाने फणफणले आहेत नुसते."
"काय झाले सदानंद साहेब" खोलीच्या दारातून आत येत दिनकरने विचारले.
"सांगतो… " जरा त्रासलेल्या चेहऱ्यानेच सदा बोलला. "पण बाहेर हा गलका कसला चालू आहे सकाळपासून?"
"अरे नेहमीचेच रे. जाधवाचा विनू… त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय ना. सारखे चालूच असते.  त्याचीच काहीतरी गडबड आहे. सकाळी श्रीपती परसाकडे निघालेला. त्याला कुलकर्ण्याच्या चीतेपाशी हा विनू दिसला. काहीतरी भाजत होता. शेवटी वेडाच तो. काय करतोय विचारले तर म्हणला 'या …  रात्री नदीवरून मासे धरून आणलेत ताजे ताजे …भाजून ठेवलेत रात्रीच… खाणार का ?'. त्या कुलकर्ण्याच्या पोराला कळले तसा तराट धावत आला. आता पायतानाने पूजा चालू आहे त्याची… बर ते राहू दे …  तुला काय झाले ते सांग ""
दिनकरची शेवटची दोन वाक्ये सदाला ऐकूच गेली नाहीत. रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर पुन्हा यायला लागला … "…. या … खा … माणसे….  मासे…."
 
--- विशाल

Wednesday, May 27, 2015

निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर

पुरंदर मोहिम शनिवारी (२३.०५. २०१५) फत्ते झाली.

किल्ल्याबद्दल म्हणाल तर -
" निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर" याहून दुसरे शब्द सुचत नाही.

रस्ता माहित नसल्याने आणि रस्ता चुकायची जुनी सवय असल्याने जरा लवकरच म्हणजे सकाळी ६.३० ला घरातून निघालो, सौंसोबत दुचाकीवरून हडपसर-दिवे घाट-सासवड-पुरंदर (गाव) करत किल्ल्याच्या माचीपर्यंत पोचायला ८:३० झाले. उन्ह फारसे नसल्याने प्रवास मस्त झाला. किल्ल्यावर प्रवेश ९ वाजता होतो असे तिथे समजले (ओळखपत्र आणि दुचाकीवर हेल्मेट अनिवार्य ). मग तोपर्यंत तिथेच TP केल. शनिवार असून फारसे पर्यटक दिसले नाहित. ९ ला फाटकातून gate entry करून आत सोडले.

मुरारबाजींचा पुतळा, चर्च आणि काही पडीक घरे ओलांडल्यानंतर पार्किंग आहे तेथे पुन्हा in-time entry केली. तिथे आमचे mobile जमा करून घेतले (Camera मित्राने मधुचंद्रासाठी उसना नेल्याने सोबत नव्हता. नाहीतर उगाच ओझे वाहून तेथे फोटो काढताच आले नस्ते. जे होते चांगल्यासाठी होते ) तेवढ्यात तेथे प्रतिष्ठान चा बोर्ड लावलेल्या गाडीतून ७-८ मुले आली. कदाचित नेहमीचे कार्यकर्ते असावेत. गडावर बांधकाम आणि पाईपिंग चे काम चालू असल्याने अनेक ठिकाणी खोदून ठेवले होते. आर्मीच्या जवानाने दाखवलेल्या रस्त्याने आम्ही गड दर्शन चालू केले. ५-१० मिनिटात गडाच्या बुरुजांशी भेट झाली. पहिलीच भेट असल्याने स्वराज्याच्या त्या शिलेदारांना मिठी मारून आणि त्यायोगे सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना नमन करण्याचा मोह आवरला नाही. सौना कळलेच नाही मी दगडांना का मिठी मारतोय. पण सर दरवाज्यातून आत गेल्यावर पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे एक नवीन लावलेला भगवा जरीपटका काठी मोडून बुरुजावर बाहेरच्या बाजूस उलटा झालेला (आमच्या पुढे गेलेल्या प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना तो कसा दिसला नाही याचे आश्चर्य वाटले). तो तसा ठेऊन गड बघायला जाण्यासाठी पाउल उचलेना. तसाच वर चढून जिथे त्या ध्वजाचा स्तंभ मोडलेला तेथून फिरवून काढून ध्वज सरळ करून आणि बाजूला चालू असलेल्या बांधकामातून तार आणून तेथे सौंच्या मदतीने पुन्हा उभारला ( प्रचंड वाऱ्यामुळे आणि सौंना प्रयत्न करूनही बुरुजावर येता न आल्याने ध्वजाला हव्या त्या उंचीवर उभारू शकलो नाही हि खंत मनात कायम राहील )

त्यानंतर पुढे इमारतींचे पडलेले अवशेष पहात केदारेश्वर पर्यंत पोचायला १०:३०-११:०० वाजले. तिथल्या शेवटच्या बांधीव पायऱ्या सौंशी रेस लाऊन चढल्याने लागलेला श्वास काबूत आल्यानंतर केदारेश्वराचे दर्शन घेतले. शिवतांडवाचे (हे शिव शंकराचे एकच स्तोत्र येते ) पठन करून नंतर मंदिराबाहेर वाऱ्यात बसून सोबत आणलेल्या पराठे सॉस आणि हापूस आंब्यांचा नाश्ता करून पुन्हा परतीचा मार्ग धरला. सोबत कॅमेरा नसल्याने फोटो साठी थांबण्याचा प्रश्नच नव्हता.

उतरताना समोर आता डौलाने फडकणारा जरीपटका दिसत होता. वज्रगड समोर दिसत होता. परंतु तिकडचा प्रवेश तारांचे कुंपण टाकून बंद केला असल्याने जाउन पाहू शकलो नाही. येताना सौन्ना पुरंदरचा (माहित असलेला तसेच मिपा वरून समजलेला) इतिहास सांगत उतरलो. पुरंदरचा अर्थ, त्याचे इंद्रनील नाव, फत्तेखानचा आणि त्यारुपाने आदिलशाहीचा स्वराज्यातील पहिला मोठा पराभव, नेताजी पालकरांची किल्लेदारी, शंभू राजांचा जन्म, कापूरहोळ वरून येणारी त्यांची दुधाई. मिर्झा राजा जयसिंगांची स्वारी, पुरंदराचा वेढा, ४० मावळ्यांनी वेढ्यात शिरून निष्क्रिय केलेल्या तोफा, वज्र गडाचा पाडाव, पुरंदरची झुंज, उडालेला बुरुज , शत्रूने सुलतानढवा करण्याआधीच मराठ्यांचा अतितटीचा हल्ला , मुरारबाजींचे शौर्य, दिलेरखानाला दिलेले प्रत्युत्तर आणि बलिदान, किल्लेदार पडल्यानंतरहि बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी चालू ठेवलेला प्रतिकार, आणि अखेर पर्यंतचे पुरंदरचे अजिंक्यत्व (माझ्या माहितीप्रमाणे झुंज चालू असतानाच पुरंदर तहात मोगलांकडे गेला, त्याचा पराभव झाला नाही कि त्याने शरणागतीहि पत्करली नाही) अशी जेवढी असेल नसेल तेवढी माहिती सौंना दिल्यानंतर मी बुरुजाला मिठी मारून नमस्कार केल्याचे कारण तिला समजले. येताना छान करवंदे (रानमेवा) जमा करीत उतरलो. खाली हॉटेल मधून पाणी घेताना जवळ पुरन्दरेश्वराचे मंदिर दिसले (थोडे आतल्या बाजूला असल्याने रस्त्यावरून सहजासहजी दिसत नाही) तेथेही बांधकाम चालू होते. पुरंदरेश्वरच्या दर्शना नंतर येताना चर्च आणि बिनी दरवाजा पाहिला. जवळ उभ्या असलेल्या जवानाला विचारून आठवण म्हणून थोडे फोटो काढले. आणि गडावरून उतरते झालो. (संभाजी राजांचे जन्मस्थान पाहू शकलो नाही. तिथे कोठेही मार्गदर्शक फलक वगैरे नसल्याने आणि केदारेश्वराच्या मुख्य रस्त्यावर ते नसल्याने त्याचे ठिकाण कळले नाही. हॉटेल मध्ये विचारणा केल्यानंतर ते वरच असल्याचे कळाले पण पुन्हा वर जाणे शक्य नसल्याने खास ते ठिकाण पहायला पुन्हा येण्याचे ठरवून आम्ही साधारण १:०० च्या सुमारास माचीवरून दुचाकी घेऊन खाली प्रस्थान केले )

परतीच्या रस्त्यावरून पुन्हा गडाच्या बुरुजाकडे नजर टाकली. येताना तेथे नसलेला जरीपटका आता डौलाने फडकताना दिसत होता. पुरंदरची ती हवा अभिमानाने उरात भरून घेतली आणि खाली उतरलो.
येताना  नारायणगावचे एकमुखी दत्त आणि केतकावळ्याचे प्रतीबालाजी यांचे दर्शन घेऊन हायवेने पुण्याकडे निघालो
खाली काही छायाचित्र देत आहे. परंतु मोबाइल चा कॅमेरा आणि भर दुपारच्या उन्हामुळे खास फोटोग्राफी करावीशी वाटली नाही आणि करूही शकलो नाही
वज्रगड, चर्च आणि बिनी दरवाजा

पुरंदरेश्वर

चर्च

बिनी दरवाजा


मुरारबाजीं
 इतिहास


परतीच्या रस्त्यावरून
 

--- विशाल 

Monday, April 6, 2015

सये भांडतेस कशा

(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात )

सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा..
काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या
 
सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची
तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची
 
येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय
आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय
 
मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली
भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली 
 
या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून
मीठ उतरून टाक.. वारे पहाते वाकून
 
वारे पहाते वाकून, आहे गर्द तुझी खोली
माळ केसात मोगरा, वाट पहा गंधाळली
 
वाट गंधाळली सरे वीज कडाडे नभात
दार उघडण्याआधी जरा बघ आरशात

 
घ दिसे आरशात, तुझा साजन बरवा
डोळ्या भिडताच डोळा, होई पदर हिरवा
 
--- विशाल
 
 
 

Thursday, March 19, 2015

देखा एक ख्वाब तो

"का कुणास ठाऊक पण ऑफिसमधून आज दुपारी लाच बाहेर पडलो.  कोणालाच सांगता . खाली पार्किंग मध्ये पहातो तर काय बाइक गायब. अरे बाप रे ! डायरेक्ट पोलिस स्टेशनला जायला हवे म्हणून  निघालो तर गेटवरच बस हजर. अगदी पोलिस स्टेशन च्या पाटीसहीत. याआधी अशा पाटीची बस कधी पाहिली नव्हती . बर बस मध्ये बसलो तर मी सोडून कोणीच नव्हते. अगदी कंडक्टरसुद्धा . बस सुरु झाली आणि भरधाव वेगाने निघाली कि खिडकीबाहेरचे काहीच दिसत नव्हते. ती थांबल्यावर उतरलो नि पहातो तर समोर आफ्रिकेचे जंगल . तसाच जंगलातून चालू लागलो. समोर कॅलेंडरवर दिवसामागून दिवस उलटत होते . शेवटी जंगल संपले नि पुढे सहारा वाळवंट पसरले होते. तिथे बिल गेट्स उभा होता हातात पुष्पगुच्छ घेऊन. त्याने मला मिठी मारली आणि जंगल पार केल्याच्या कष्टाचे फळ म्हणून कंपनीचे पार्टनरशिप ऑफर केली. आणि अचानक तिथे शाहरुख खान प्रकट होऊन बॅंडबाजा वाजू लागला. पण हा बॅंडचा आवाज वेगळा का आहे? टिंग टिंग टिंगटिंग टिंग टिंगटिंग टिंग टिंग
काही कळले काय झाले ? अहो याला म्हणतात -
" सक्सेशन्स ऑफ इमेजेस, आइडियाज्, इमोशन्स अँड सेन्सेशन्स दॅट ऑकर इनवोलुन्टरीली इन माइंड ड्युरिंग सर्टन स्टेजेस ऑफ स्लीप, कंटेंट अँड पर्पज ऑफ विच आर नॉट डेफिनिटीवली अंडरस्टूड दो दे हॅव बीन टॉपिक ऑफ साइंटीफिक स्पेक्यूलेशन, एज वेल एज सब्जेक्ट ऑफ फिलोसोफिकल अँड रिलिजिअस इंटरेस्ट, थ्रूआउट रेकोर्डेड हिस्टरी " (बाबा रान्चोदास छांचड प्रसन्न )
 
सीधी भाषामे बोले तो - दिमागका केमिकल लोचा (इति श्री मुन्नाभाई उवाच )  , इंग्लिशमे ड्रिम, हिंदीमे ख्वाब, ग्रामीण भाषेत सपान आणि शुद्ध मराठीत स्वप्न.
 
स्वप्न म्हणजे मनाचा आरसा असतो, मनी वसे ते स्वप्नी दिसे वगैरे आपण नेहमीच ऐकत आलोय. पण यात कितपत तथ्य आहे याबद्दल शंकाच आहे. म्हणजे बऱ्याचवेळा आपल्या मनातील गोष्टींचा आणि स्वप्नाचा काडीमात्र संबंध लागत नाहि. स्वप्न का पडते? कसे पडते? कोणत्या विषयी कोणते स्वप्न कधी पडेल? वगैरे प्रश्नांची उत्तरे त्या क्षेत्रातील जाणकार शोधत आहेतच. पुराणापासून आधुनिक विज्ञानापर्यंत आजपावतो अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. स्वप्नांना नियंत्रित करून आपल्याला हवे तेव्हा हवे ते दाखवणारे यंत्र शोधण्याच्या मागे काही शास्त्रज्ञ असल्याचे ऐकिवात आहे. पण आपल्याला त्यात रस वाटत नाही. अचानक पडणाऱ्या चित्रविचित्र स्वप्नांनी होणारे मनोरंजन अनुभवण्यात जी मजा आहे ती ज्याची त्यानेच घ्यावी.
 
लहानपणी कधीतरी कुठेतरी दोन शब्द ऐकले ‘स्वप्नाळू डोळे’, तेव्हा आरशात कितीतरी वेळ डोळे पहात बसायचो. आदल्या रात्री पडलेले नि अर्धवट आठवणारे स्वप्न डोळ्यात आत कुठे दिसते का ते. नंतर कळले कि अर्धवट बाहुल्या दिसणाऱ्या पेंगुळल्या डोळ्यांचेच गोड नाव स्वप्नाळू डोळे असे आहे. पण स्वतःच्या स्वप्नाच्या पलीकडच्या स्वप्नाच्या जगाशी पहिला परिचय करून दिला तो जंजीर मध्ये (स्वप्नाळू डोळ्यांच्या) अमिताभला पडत असलेल्या घोडा आणि साखळीच्या स्वप्नाने. आणि तेव्हापासूनच असा स्वप्नातल्या गोष्टींचा भूतकाळाशी संबंध लाऊन आमच्या भूतकाळातील एखादा खलनायकाची शोधमोहीम चालू झाली (त्याकाळी आम्हाला आमच्या शिक्षकांशिवाय दुसरे कोणी दिसले नाही हि गोष्ट निराळी). अमिताभच्या 'देखा एक ख्वाब तो' म्हणत रेखासोबत चालू झालेल्या सिल्सिल्यानेही त्याकाळी सगळ्यांना फार हलवले होते म्हणे. पण तो एकदमच बच्चन होता राव. थोडे 'समजायला' लागल्यावर चोरून पाहिलेले 'लाइन ' चे स्माईल आणि त्यापुढे होणाऱ्या सिल्सिल्यांचा, स्वप्नातही लवकरात लवकर भूतकाळ कसा होईल हि खबरदारी मात्र आईने अंगावरचे पांघरून ओढून नक्कीच घेतली.
 
स्वप्नाबद्दलच्या इतर अनेक गोष्टींमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे पहाटेची स्वप्न खरी होणे. खरेच हो! म्हणजे बघा माधुरीचे लग्न झाले, ऐश्वर्याचे लग्न झाले, करीना पण गेली आणि आता तर कॅट आणि दीपिकाची पण चर्चा आहे. नायिका बदलल्या पण त्यांच्याशी लग्नाचे आमचे पहाटेचे गुलाबी स्वप्न खरे होण्याची वाट (आमचे स्वताचे लग्न झाले तरी) आम्ही खूप आशेने अजूनही पहातो. पहाटे स्वप्न पडत नसले तरी बहुतेकांची ‘ही’ मनोकामना माझ्याहून निराळी नसावी बहुतेक. "स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा" असे म्हणत समस्त स्त्री वर्गाला यावर हरकत असेलही. पण मग अपूर्ण इच्छांचे ताण जर असेच स्वप्नात विरून हलके होणार असतील तर त्या स्वप्नांना ‘दोष’ का द्या? साधू-संतांना पहाटेच्या स्वप्नात प्रत्यक्ष भगवंतांनी दर्शन देऊन तळ्यात बुडालेली किंवा जमिनीत पुरलेली मूर्ती दाखवल्याची स्वप्ने सकाळी उठल्यावर पूर्ण झाली आहेत मग आम्हा बापडांनी “आमच्या देव्यांचे आम्हाला स्वप्नातही दर्शन होऊ नये” असा शाप मिळण्याएवढे काय पाप केले जरा कोणी सांगेल का?
भयावह स्वप्न हा तर एक वेगळाच विषय आहे. काही लोकांना म्हणे स्वप्नात भूत दिसते. आणि दिसते ते दिसते वर प्रत्येकाला वेगळे वेगळे दिसते. लोक हे पाहून दचकून जागे होतात, दरदरून घाम सुटतो वगैरे प्रकार होतात म्हणतात. दिवसभर असे भूताखेतांचे सिनेमे पहायचे, आम्ही किती धाडसी आम्हाला भीती वाटत नाही असे म्हणत मिरवायचे नि रात्री असे झोपेचे खोब्रे करून घ्यायचे. पण आपला तो पिंडच नाही ना. तसले भयावह काही पहायला आवडतच नाही आणि त्यामुळे तसले ना विचार मनात येतात ना स्वप्ने. एकदा स्वप्नात विक्रमराजा बनलो होतो. तेव्हा वेताळाचे प्रेत झाडावरून काढताच त्याची (आमच्या वजन उचलण्याच्या क्षमतेनुसार) आलिया भट झाली आणि तिने २ स्टेट्स ची स्टोरी सांगून "हे राजा विक्रमा आता जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या डोक्याची हजार शकले होतील" म्हणल्यानंतर कोणाला जाग याविशी वाटेल हो.
स्वप्नाचे मुख्य शत्रू गजराचे घड्याळ (गाजराचे किंवा गजऱ्याचे वाचू नये हि विनंती). बरोब्बर स्वप्न मोडण्याची वेळ त्याला कशी कळते कुणास ठाऊक? किंवा ६ चा गजर लावला तर ३ तासाचे स्वप्न ३ वाजता चालू व्हायला हवे पण झोपेतही १०-१५ मिनिट उशिरा पोहोचायची आमची वाईट खोड काही जात नाही बहुतेक. बरोब्बर "तो नादान भवरा त्या कळीच्या आजूबाजूस फिरताफिरता तिच्यावर बसणार” … इतक्यात कानाजवळ “ओम गं गणपतये नमो नमः” चालू होते नि कोणीतरी अचानक कीटकनाशक फवारल्यागत तो बिचारा उडत्या जागीच मरून पडतो. बरं अलार्म न लावावा किंवा गुपचूप ‘कोणाच्या’तरी नकळत दोन तास पुढे करावा तर या अलार्म क्लॉक च्या खांद्याला खांदा लावून अंगावरून खस्सकन ओढलेली चादर, सर्रकन उघडलेला पूर्वेकडच्या खिडकीचा पडदा, आणि कधी कधी अगदीच अटीतटीच्या प्रसंगात पाण्याचा तांब्या सुद्धा आपापली कामगिरी नेहमीच चोख बजावताना दिसतात. त्यामुळे अशा कितीतरी आघाड्यांवरती लढता लढता आता हल्ली स्वप्ने सुद्धा डेलीसोप सिरियल सारखी रोज एपिसोड मध्ये ‘टू बी कंटीन्यूड’ ठेऊन मोडण्याचा सराव आम्ही लवकरच चालू करणार आहोत.
आता तुम्ही किंवा काही लोक म्हणतात कि स्वप्ने पडणे म्हणजे झोप शांत न लागण्याची लक्षणे आहेत. पण आम्हाला हे काही पटत नाहि. आईच्या गर्भातच मनुष्याचा स्वप्नप्रवास चालू होते असे आम्ही वाचले आहे (कोठे विचारू नये). आणि स्वप्ने पडतातच त्यावेळी जेव्हा मनुष्य त्याच्या झोपेच्या अत्त्युच्च क्षणात असतो. (हेही वाचलेलेच आहे). पण तुम्ही म्हणता तसे हे सारे इथेच थांबते तर कदाचित आम्ही स्वप्न पहाणे सोडले असतेही पण. (हा ‘पण’च नेहमी आमच्या बऱ्याच संकल्पांची सुरु होण्याआधीच काशी करतो) पण नाही ना. जरा कोणत्या यशस्वी मनुष्याचे चरित्र उघडा आणि प्रस्तावना वाचा 
Reality Is Wrong, Dreams Are Real – Tupac Shakur
Great Dreams of Great Dreamers Always Come True – Dr A P J Abdul Kalam
Yesterday Is But Today’s Memory And Tomorrow Is Today’s Dream – Khalil Gibran
To Accomplish Great Things We Must Not Only Act, But Also Dream – Antole France
(जालाहून साभार)
हे असले वाचले कि घोडे अडते. कोणत्याही मध्यमवर्गीय सामान्य मराठी माणसासारखी आम्हालाही सुवर्ण भविष्यकाळ घडवून इतिहासात नाव लिहिण्याची हौस आहेच कि. आमच्यातहि एखादा रतन टाटा किंवा धीरूभाई लपलेला असून अशाच एखाद्या स्वप्नातून तो बाहेर येण्याची शक्यता आम्ही नाकारूच शकत नाही. मग असे थोरामोठ्यांचे म्हणणे टाळून स्वप्न पहाणे सोडून द्यायची आमची काय बिशाद. बरोबर ना.
***The End***
काय म्हणालात ? माझ्या या लेखाला साहित्याचे नोबेल भेटले ? खरेच?  पेपर मध्ये फोटो आलाय ? बघू ...खरेचकि ? संध्याकाळी नोबेल द्यायला ते घरी येणार आहेत ? पोहे तयार आहेत ? बाहेर गल्लीत स्टेज बांधले आहे ? बराक ओबामांच्या हस्ते मी नोबेल घेतोय? नोबेल पुरस्कारात गणपतीची मूर्ती कधीपासून द्यायला लागले? असो प्रचंड टाळ्याबॅंडफटाकेडॉल्बीडी जे चालूनाचोकोणते गाणे आहे ? ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः
--- विशाल