Saturday, February 23, 2019

राडा

काल रातीला मोठा राडा झाला
धुतले गाढव त्याचा घोडा झाला

तसा शहाणा माणूस होता फार
शब्दामध्ये अडकला वेडा झाला

देवावरती भजन लिहाया बसलो
देव शिवाजी मग पोवाडा झाला

अतिशयोक्ती यास म्हणू की उपमा
हृदय चोरीता म्हणे दरोडा झाला

बाटली संपली दुःख शिगेला होते
शब्द दारू अश्रूंचा सोडा झाला

लक्ष्मीला विसरून सरस्वतीला पुजले
यशात माझ्या माझा खोडा झाला

हसली आणि म्हणाली थॅंक्यु दादा
स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला

- विशाल (२३/०२/२०१९)

Tuesday, February 12, 2019

कविता बिविता

तो दाटून ये घननीळ पाडून मनाला पीळ
दुरात शांतता मोठी पण भोवताल व्याकुळ
भरण्यास भावना सागर मी पानावर पाझरतो
म्हणतात उगाचच लोक मी कविता बिविता करतो

प्रश्नातच दडली घुसमट उत्तरी शक्यता धुरकट
जीव इतका हताशलेला की निव्वळ भरकट भरकट
शून्याच्या मागे पळतो लेखणीमधून ओघळतो
म्हणतात उगाचच लोक मी कविता बिविता करतो

तिज काही समजत नाही मग मौन पाळतो मीही
तिकडे कागद निस्तब्ध तर इकडे चौखूर स्याही
ही अबोल भरता ओंजळ एखादा शब्द निसटतो
म्हणतात उगाचच लोक मी कविता बिविता करतो

या सरळ साकड्या कविता या वेड्यावाकड्या कविता
माझ्याहून किती निराळ्या रांगड्या फाकड्या कविता
मी लिहितो कुजबुज केवळ लोकांस भाव सापडतो
म्हणतात उगाचच लोक मी कविता बिविता करतो

- विशाल (१२/०२/२०१९)

Sunday, February 10, 2019

अंगाई

घाव जेवढे दिले जगाने साऱ्यांची उतराई व्हावी
हृदय चिरून रक्ताचे ओघळ येता त्याची शाई व्हावी

गर्भातील नाळीशी आपले नाते दैवीच असते पण
टिळा धुळीचा भाळी लावत भूमीचीही आई व्हावी

काळ ठराविक साऱ्यांचा तरी इथे प्रवासी असे कसे
पोहचायाला वेळ असावा पण निघण्याची घाई व्हावी

देऊ न शकल्या गुलाबांचा रात्रीला गुलकंद करावा
गोडी टिकून रहावी थोडी पैशाची भरपाई व्हावी

कशास वेचू गंधपुष्प वेगळे तुझ्या गजऱ्यासाठी
तुझ्या कुंतली रानफुलांची गुलाब चाफा जाई व्हावी

प्रत्येकाला दुसऱ्यामध्ये दिसतो एक माळ उजाड
कुणा वाटते स्वताच्या मनी एखादी आमराई व्हावी ?

सुखदुःखाचे शेर लिहावे अवघे जीवन गाणे व्हावे
चिरनिद्रेची वेळ आल्यावर मरणाची अंगाई व्हावी

-विशाल (११/०२/२०१९)

Tuesday, February 5, 2019

रात्र एकटी अशी फुलात रोज जागते

ती न येतसे आता निरोप मात्र पोचतो
त्रास नाही फार तसा भास मात्र जाचतो
आठवण डोकावते नि झोप कुणा लागते
रात्र एकटी अशी फुलात रोज जागते

सांज सरे तळमळून वाट पाहण्यामध्ये
मोजतो मी रोज तुझे तुटलेले वायदे
मनात काळोख ढवळतो भवती अंधारते
रात्र एकटी अशी फुलात रोज जागते

आणतो मीही उगाच ओठी उसने हसू
अन मिठीतली उशीही लागते मुसमुसु
जाणते ती हृदय माझे.. तू अशी का वागते?
रात्र एकटी अशी फुलात रोज जागते

कुंद होऊनि हवा भरून येतो गारवा
तू न एकटा उदास साद देतो पारवा
चाहूलही मग पाचोळा चुरडूनिया झोंबते
रात्र एकटी अशी फुलात रोज जागते

समीप जशी ये पहाट वाढत जाई भीती
जागविण्या जीव खुळा सबब देऊ कोणती?
दिवस काढण्या उभी दुनिया कारण मागते
रात्र एकटी परी फुलात रोज जागते

- विशाल (०५/०२/२०१९)