कशाला पाहिजे ओझे तमाला चंद्रकिरणांचे
शिकाऱ्यासारखे कोणी नये थांबूच पाणोठी
उगा येतात रे काठी कळप व्याकुळ हरणांचे
नदी ओंकार गाताना वृथा ही वाहिली शाई
भासांना सहवास म्हणू कि दुसरे काही ...
आठवणींना त्रास म्हणू कि दुसरे काही
क्षणा क्षणाला मरण झेलूनी जिवंत आहे
ही जगण्याची फूस म्हणू की दुसरे काही
पुंडलिकासम दारावरती उभा विठोबा
वीट फेकुनी बैस म्हणू की दुसरे काही
कितीजणी सांगतात या जागेवर ताबा
ऐसपैस हृदयास म्हणू की दुसरे काही
नीतीच्या कुंपणात बंदी लाख श्वापदे
स्वतःस मी माणूस म्हणू की दुसरे काही
सुबक मांडणी शब्द बांधणी छंदामध्ये
कवितेला आरास म्हणू की दुसरे काही
कवी थोर पण कविता काही कळली नाही
खास म्हणू बकवास म्हणू की दुसरे काही
समुद्र मिळुनी घोटभराची तृषा ना शमली
याला नक्की विकास म्हणू की दुसरे काही
बलिदानाने दाटून आल्या आकाशाच्या
रंगाला तांबूस म्हणू की दुसरे काही
इथे तिथे अन तिथे असेल का दुसरे काही
आयुष्यभर हव्यास म्हणू की दुसरे काही
खिचडी केळी बर्फी आणि भगर संपली
एकादशीस उपवास म्हणू की दुसरे काही
दुसरे काही म्हणू कशाला मी कोणाला
दुसरे मीच स्वतःस म्हणू की दुसरे काही
--- विशाल (१७/०७/२०१७)