Monday, November 23, 2020

तुला अंदाज आला ना - माधुरी चव्हाण जोशी

तुझे अंदाज चुकल्याचा तुला अंदाज आला ना?
तुझे कोणीच नसल्याचा तुला अंदाज आला ना?

तिची ना सावली दिसली,तिचे ना वाजले पैंजण,
तिने रस्ता बदलल्याचा तुला अंदाज आला ना?

तुझ्या गुलजार शब्दांनी विव्हळले पाखरू कोणी,
जिव्हारी घाव बसल्याचा तुला अंदाज आला ना?

तिच्यापाशी स्वतःचे मन कुणीसे मोकळे केले,
नदीचे काठ भिजल्याचा तुला अंदाज आला ना?

शिकारी फास तुटलेला,ठशांचे माग पुसलेले,
तुझे सावज निसटल्याचा तुला अंदाज आला ना?

जरासुद्धा भिती नव्हती तुझ्या डोळ्यात मरताना,
सुरी नकळत फिरवल्याचा तुला अंदाज आला ना?

तिच्या गाण्यामधे साधा तुझा उल्लेखही नव्हता,
तुझे संदर्भ पुसल्याचा तुला अंदाज आला ना?

- माधुरी चव्हाण जोशी

Tuesday, August 4, 2020

भय इथले संपत नाही

       भय इथले संपत नाही

       मज तुझी आठवण येते

असे ऐकले आहे, की कवी ग्रेस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना त्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकरांना एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी या अजरामर ओळी लिहिल्या होत्या. "आज या हॉस्पिटलच्या एका छोट्या खोलीत मी एकटाच बसलो आहे, आजूबाजूला पांढऱ्या भिंती आणि मध्ये मध्ये सोडलेले हिरवे पडदे. इथे मला मी निसर्गाच्या फार जवळ असल्याचा भास होतोय. कधी ना कधी मृत्यू येणार हे अटळ सत्य मी मनात अगदी ठसवले आहे. त्यामुळे अशावेळी मला खरेतर फार शांत वाटायला हवे. असा एकांत.. अशी शांतता.. सगळे कमावून आयुष्याची उत्तरयात्रा चालू केलेल्या एखाद्या कवीला, एखाद्या लेखकाला अजून काय हवं ? खरेतर अशा जागी कसल्याही भीतीचा लवलेशही दूरदूरवर दिसत कामा नये. पण नाही. हे हवंहवंसं वातावरण असलं तरी मन स्वस्थ नाहीये. काहीतरी सलतंय.. आत.. खोल.. माहित नाही काय? माहित नाही का? पण भय इथले संपत नाही"

 खऱ्या अर्थाने शाश्वत सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ म्हणण्यासारख्या या ओळी - भय इथले संपत नाही. पाहायला गेले तर या चार शब्दात काही विशेष, छुपा, अगम्य अर्थ वगैरे असे काहीच नाहीपण तरी या जगातील मन नावाचा दृगोचर अवयव असलेल्या प्रत्येक सजीवाला लागू होईल असे हे शाश्वत सत्य. भय इथले संपत नाही. केवळ भीती नाही, तर संपणारी भीती. मनुष्य स्वभावानुसार अप्रिय गोष्टीपासून आपण नेहमीच दूर राहायचा प्रयत्न करतो. एकदा ती गोष्ट आपल्यापासून दूर झाली, नष्ट झाली, संपली कि आपण तणावमुक्त होऊआपल्याला आनंद होईल, सुख मिळेल असे सतत वाटत असते. पण या सर्वांसोबत ती गोष्ट दूर गेलीच नाही, संपलीच नाही तर? याची अनामिक भीती मनात असतेच. मिळेल कि नाही? जमेल कि नाही? येईल कि नाही? जाईल कि नाही? अशा एक अनेक भयांचं ओझं सतत पाठीवर घेऊन आपण वावरत असतो. एक गेले कि दुसरे, ते झाले कि तिसरे, हि भयाची शृंखला कधीच खंडित होत नाही. धनिकाला धन जाण्याचं भय, भिकाऱ्याला रात्रीच्या खाण्याचं भय, वांझेला पुत्र न होण्याचं भय आणि सपुत्रिकाला मुलानं सांभाळण्याचं भय, अपयशाचं भय, प्रेयसीच्या विरहाचं भय, तरुणाला वार्धक्याचं भय तर म्हाताऱ्याला मरणाचं भय. प्रत्येकाच्या मनात सतत ठाण मांडून कसले ना कसलेतरी भय. 

बहुरूपी बहुकल्पी अशा मूर्त भयांसाठी जगात उपाय आहे आणि उपाय नसेल तर दोष द्यायला नशिब आहेच. पण कवीने उल्लेख केलेलं भय ते हे नाही. ते अदृश्य आहे, अमूर्त आहे, अक्षय आहे, कधी न संपणारं आहे . अगदी जीवघेणं नसलं तरी जगूही न देणारं भय. सतत जाणवणारं पण स्वतःच स्वतःलाही ना कळणारं .  दिनरहाटीच्या कामात ज्याने त्याने जमेल तसा प्रयत्न करून त्याला कितीही खोल गाडले, तरी प्रत्येक एकाकी क्षणाला न चुकता उसळी मारून वर येणारं.   

आणि त्यासोबत समोर येणारा तो चेहरा - मज तुझी आठवण येते. भय तर न संपणारं आहे पण ते टाळण्यासाठीच्या प्रयत्नात माहित नाही का पण तुझी आठवण  येते. तू कोण ? आई ? बायको ? मित्र ? प्रेयसी ? कि भगवंत ? ज्याचे त्यालाच माहीत. पण खरेच "तू कोण" याने फरक पडतो का? तू कोणीही असले, पण या भयाने, या भीतीने व्यापलेल्या माझ्या मनात, जिथे दुसऱ्या कशालाच यायला वाव नाही, तिथे अचानक तुझी आठवण येते. कशी? का? याचे उत्तर मिळत नाही. पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार तसे तुझ्या आठवणीला घेऊन मी धडपडण्याचा प्रयत्न करतो, अज्ञाताशी डाव मांडायची हिम्मत करतो. माझा एकाकीपणा हीच त्या भयाची ताकद आहे आणि तुझी आठवण आल्यावर ते आपोआप क्षीण व्हायला हवे. हो ना? पण नाही.. तुझी आठवण येताना पुन्हा नव्या भयाला सोबत आणते.  हि आठवण नेहमी अशीच येईल का? नाही आली तर ? आणि पुन्हा मी ह्या माझ्या न संपणाऱ्या भयाच्या आणि तुझ्या सतत येणाऱ्या आठवणींच्या चक्रात सापडतो . वर्तुळाला कधी आदी अंत असतो का?  

म्हणून 'निर्भय' हि केवळ नाममात्र संज्ञा उरते. जगात निर्भय असे कोणीच नाही. सगळ्या भयांना टाळून संपवून अगदी मोक्षप्रद जागी बसले आणि तुझी आठवण आली कि पुन्हा या भयडोहात ओढले जाणे निश्चित आहे. आणि म्हणून हे भय संपणार नाही कारण भय संपले तर तुझी आठवण येणार नाही याचे भय आहेच. मी म्हंटले ना, हे वर्तुळ आहे. भयात तुझी आठवण आली काय किंवा  तुझ्या न आलेल्या आठवणींचे भय काय ? त्यामुळे कवीच्या या दोन्ही ओळी, आपल्याला एका कधी न संपणाऱ्या, अगणिताच्या चकव्यात अडकवतात. यातून कोणालाच बाहेर येणे शक्य नाही आणि म्हणूनच हे शाश्वत सत्य आहे.

                                                                                 मज तुझी आठवण येते 

                                                                                 भय इथले संपत नाही  


-- विशाल (०४/०८/२०२०)  

Wednesday, July 29, 2020

प्रेम केल्याची निशाणी फक्त नावाला - स्वप्निल शेवडे

प्रेम केल्याची निशाणी फक्त नावाला
राहिले डोळ्यात पाणी फक्त नावाला

आपल्या श्वासांवरी ना आपला ताबा
आपल्या हाती पिपाणी फक्त नावाला

केवढा आहेस तू वेडा तिच्यासाठी
ती तुझी दुनिया शहाणी फक्त नावाला

केवढे पोकळ निघाले हे बडे वासे
मोठमोठाली घराणी फक्त नावाला

काळजी घ्या बोलताना, भोवती गर्दी
शांत पडलेली उताणी फक्त नावाला

मी स्वतःशी बोलतो आहे तुझ्याबद्दल
लावली आहेत गाणी फक्त नावाला

पान नाही राहिले हुकमी...बदामाचे
राहिली हातात राणी फक्त नावाला

आपल्या गोष्टीत होती गोष्ट लोकांची
ही तुझी माझी कहाणी फक्त नावाला

तू तुझ्या काठावरी आहेस आनंदी
आणि माझीही विराणी फक्त नावाला

देत का नाहीस जर का द्यायचे आहे
वाजवत आहेस नाणी फक्त नावाला

- स्वप्निल शेवडे

Saturday, March 21, 2020

पाहिली नाहीत कोणी आत तुटलेली मने - गोविंद नाईक

पाहिली नाहीत कोणी आत तुटलेली मने
गाजती बाहेर केवळ बेगडी आलिंगने

आणते अवसान उसने झिंगणारी लेखणी
चालती गुत्त्यात ज्यांची खाजगी संमेलने

मारता आली न साधी फुंकही ज्यांना कधी
ते म्हणे देतात हल्ली वादळावर प्रवचने

त्याच त्या पूजेस आता देवही कंटाळला
तेच भटजी , त्याच पोथ्या , तीच ती आवर्तने

धर्म , जाती , प्रांत यातच आग भडकत राहिली
माणसांसाठी न केव्हा पेटली आंदोलने

प्राण भीष्मासारखा त्यागेन मी शरपंजरी
आंधळ्यांनी धन्य व्हावे भोगुनी सिंहासने

- गोविंद नाईक

Saturday, January 4, 2020

पाऊस असा आला की - विजय आव्हाड

पाऊस असा आला की.. मन राहिले न था-याला..
रिमझिमत्या आठवणींची लागली ओढ वा-याला...

   पाऊस असा आला की.. तळमळतो दिवस कधीचा..
   हे गाव बुडाल्यापासून हा सुटतो धीर नदीचा...

पाऊस असा आला की.. कळ गर्भाची वनवासी..
पाण्यात वांझ खडकाच्या बाळुते धुतो संन्यासी...

   पाऊस असा आला की.. सार्थकात भिजले व्यर्थ..
   भांगेच्या देहावरही आभाळ घालते तीर्थ...

पाऊस असा आला की.. घर डोळ्यांसंगे गळते..
अभिमानी दारिद्र्याला गगनाची दौलत मिळते...

   पाऊस असा आला की.. मी लिहिले असते गाणे..
   पण झाडासंगे भिजली सगळीच वहीची पाने...

विजय आव्हाड...