Tuesday, December 10, 2019

भारत एक खोज

पंडित नेहरूंच्या The Discovery of India या कादंबरीवर आधारित श्याम बेनेगल निर्मित भारत एक खोज ही मालिका साधारण १९९० च्या दरम्यान दूरदर्शन वर प्रदर्शित झाली होती. टेलिव्हिजन चा भारतात नुकताच प्रसार विस्तार चालू झालेल्या या काळात जेमतेम ४-५ वर्षाच्या मला यातील काही ओ की ठो कळले नव्हते. नाही म्हणायला त्याच्या टायटल सोंगमधले संगीत आणि "छुपा था क्या कीसने ढका था ... अशा काही ओळी लक्षात राहिल्या होत्या.

यानंतर जवळपास ३० वर्षांनी यु ट्यूब वर काहीतरी शोधताना याचा एक विडिओ आला. उत्सुकता जागृत झाली आणि ऑफिसच्या बसमध्ये प्रवासात रोज जमेल तसे एक दीड भाग बघत आजच ही मालिका पूर्ण केली

अत्यंत सुंदर अशी मालिका आहे. अगदी आर्यपूर्व हडप्पा संस्कृतीपासून चालू होऊन भारताच्या स्वातंत्र्यपर्यंत चा इतिहास घडलेल्या, ऐकीव किंवा समकालीन साहित्याच्या प्रसंगातून ५३ भागात मांडला गेला आहे. त्याकाळी कुठल्याही VFX शिवाय खरे खुरे सेट लावून तो काळ जिवंत केला गेला आहे. त्यावेळचे राहणीमान जीवनपद्धती त्यात होत गेलेले बदल यांचा मेळ यात दिसून येतो. अगदी हडप्पाने सुरुवात करून आर्यांचे आगमन, रामायण महाभारत गौतम बुद्ध अभिजात शाकुंतल, मौर्य  साम्राज्य, विविध साम्राज्याचे उदय अस्त, राणा सांग, पृथ्वीराज चौहान, म्लेंच्छचे आक्रमण, विविध बादशहा, मुघल साम्राज्य, ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार, 1857 चे स्वातंत्र्य समर  त्यानंतर सामाजिक चळवळी आणि लोकमान्य पर्व आणि गांधीपर्व ते स्वातंत्र्य अशा टप्याटप्याने ही मालिका उलगडत जाते. प्रत्येक भाग वेगळ्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे.

त्यावेळच्या नावाजलेल्या टीव्ही तसेच सिनेमा कलाकारांनी यात विविध भूमिका केल्या आहेत. ओम पुरी सारखा दिग्गजाने रावण, दुर्योधन, औरंगजेब, राजा कृष्णदेवराय, सम्राट अशोक आणि इतर अनेक व्यक्तिरेखानसोबतच आपल्या खर्जातील आवाजात या मालिकेचे निवेदन ही केले आहे. याव्यतिरिक्त पल्लवी जोशी, इरफान खान, पियुष मिश्रा, इला अरुण, कुलभूषण खरबंदा (अकबर), अलोकनाथ(स्वामी विवेकानंद), मोहन गोखले (गोविंद रानडे), सदाशिव अमरापूरकर (ज्योतिबा फुले) शुभांगी गोखले (सावित्रीबाई फुले), शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शाह ( छत्रपती शिवाजी) हेही या मालिकेत दिसून येतात. अजित करकरे, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यासारख्या मराठी गायकांनी गाणी गायली आहेत

या मालिकेतील प्रसंगांच्या पुराव्याबाबत, खऱ्या इतिहासबाबत, पंडित नेहरूंच्या दृष्टिकोणाबाबत अनेक वादविवाद आहेत पण एक सुंदर मालिका म्हणून पाहण्यास हरकत नाही. IMDB वर 8.9 रेटिंग आहे आणि यु ट्यूबवर सर्व 53 भाग मोफत उपलब्ध आहेत.

-विशाल (१०/१२/२०१९)

Sunday, December 8, 2019

फसलेला पानिपत

फसलेला पानिपत

तसे मी फारसे चित्रपट थिएटरला जाऊन पाहण्याचा शौकीन नाही. आणि हिंदी तर नाहीच नाही. तरीही लग्नाचा वाढदिवस साधून आणि मुलाला हत्ती घोडे लढाई पाहायला मिळेल या हेतूने काल पानिपत पाहिलाच.
तसे आशुतोष गोवरीकरांचे चित्रपट मला आवडतात पण दुर्दैवाने हा तशी छाप सोडण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. अनेक गरज नसलेले प्रसंग रंगवून आणि इतिहासातील महत्वाचे प्रसंग वगळून तीन तासाची लांबी राखली गेली आहे.

सिनेमॅटिक फ्रीडम च्या नावाखाली पार्वतीबाई आणि सदाशिव भाऊंचा रोमान्स तसेच सिनेमातील गाणी आणि नृत्य यावर मी आवर्जून बोलणार नाहीये (बोलण्यासारखे काही नाहीच त्यात हो पण आपला गश्मीर अर्जुनपेक्षा छान नाचला आहे हे नक्की) पण गोपिकाबाई आणि पर्वतीबाईंमधील वितुष्ट फक्त फॅमिली ड्रामा टच साठी दाखवल्याचा फील येतो. त्याचा मुख्य कथेशी काही संबंध लागत नाही. दत्ताजी शिंदेंच्या मृत्यूचा प्रसंग अगदीच नाममात्र 30 सेकंडचा दाखवला आहे. याला अजून व्यापक आणि प्रभावी पद्धतीने दाखवत आले असते. पानिपतचे युद्ध मैदानावर फक्त अर्धा एक दिवस खेळले गेले पण युद्धपुर्व मैदानाच्या बाहेर घडलेल्या गोष्टींमुळे, भाऊ आणि अब्दालीमधील डावपेचांमुळे त्याला जास्त महत्व प्राप्त होते. अन्नपाण्यावाचून मराठा सैन्याची झालेली दैना आणि त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात मराठ्यांची काय परिस्थिती होती(माती खाण्याची वेळ आली होती), अब्दालीने बाटवलेले पाणी यावर काहीच भाष्य नाही. मोकळी भांडी आणि युद्धावर जाताना पार्वतीबाई भाऊसाहेबांना गुळाचे पाणी देतात आशा दोन वाक्यात हे प्रसंग संपवले आहेत.त्यादिवशी मराठ्यांचा संक्रांतीसारखा मोठा सण होता तेही कुठे येत नाही. भाऊंच्या मदतीसाठी पुण्याहून निघालेले नानासाहेब आणि त्यामुळे अब्दालीची झालेली गोची ह्याचा साधा उल्लेखही नाही. गोविंदपंतांच्या बलिदानाचाही उल्लेख येत नाही. असे अनेक प्रसंग वगळले गेले आहेत. याउलट अब्दाली आणि भाऊंची भेट हा प्रसंग ओढूनताणून केवळ "मिटटीके एक कण के लियेभी जान दे सकता हु" या एक संवादासाठी रचला आहे असे वाटते. त्यामुळे रवींद्र महाजनी (मल्हारराव होळकर), गश्मीर महाजनी(जनकोजी शिंदे) मिलिंद गुणाजी(दत्ताजी शिंदे) मोहनिश बहल (नानासाहेब पेशवे) ही पात्रे असून नसल्यासारखी वाटतात. भाऊ पार्वतीबाई आणि अब्दाली वर फोकस करायच्या नादात नजीबखानाचे महत्वाचे पात्र जवळपास आऊट ऑफ फोकस झाले आहे. अत्यंत कुटील आणि विखारी असलेले हे पात्र रंगवण्यासाठी मंत्रापेक्षा (मंत्रा हे त्या अभिनेत्याचे नाव आहे) कोणीतरी अजून ताकदीचा कलाकार हवा होता.

डायलॉग च्या बाबतीत चित्रपट पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. वरील उललेखलेल्या ऐतिहासिक घटनांच्या निमित्ताने खूप सुंदर लिहिता आले असते. पण भाऊ आणि पार्वतीबाई यांच्यातील प्रसंग सोडून इतरत्र डायलॉग जवळपास नसल्यातच जमा आहेत. (अर्जुन कपूर च्या अरोमॅंटिक डायलॉग डिलीवरीवर गोवरीकरांना शंका असावी बहुधा, पण खरे सांगतो पूर्ण चित्रपटात याच्या चेहऱ्यावरची एक रेष हलली असेल तर शप्पथ)."बचेंगे तो और भी लढेंगे" सारखे इतिहास प्रसिद्ध डायलॉगसुद्धा दुर्लक्षित आहेत.  चित्रपटात कुठेही अंगावर शहारा येत नाही, डोळे भरून येत नाही, आपण खिन्न होत नाही की देशभक्ती जागृत होत नाही. युद्धच्या तयारीच्यावेळी भाऊ दांडपट्ट्याबद्दल बोलताना दाखवला गेला आह.े युद्धातही दांडपट्टा खेळताना दिसला असता तर अजून मजा आली असती

जमेच्या बाजूंबद्दल बोलायचे झाले तर युद्धनीती छान दाखवली गेली आहे. सैन्याचे संचालन तोफांचा वापर याबाबत डिटेलिंग चांगले आहे (एक दोन सिन मध्ये टॉप अँगल शॉट एखाद्या गेम चा भाग असल्यासारखे वाटले)युद्धानंतरचे अब्दालीचे नानासाहेबांना पत्र हे माझ्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे कारण याबाबत लोकांना फारच कमी माहिती आहे.

कदाचित माझी रणांगण नाटकाची पारायणे झाली असल्याने माझ्या या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या असतील पण माझ्यामते कोणत्याही पात्राला संपूर्ण न्याय देण्यात चित्रपट फेल गेला आहे. हो पण ज्यांनी पानिपत युद्धावर काही वाचलेले नाही ज्यांनी रणांगण नाटक किंवा द ग्रेट मराठा मालिका पाहिली नाही त्यांनी पाहण्यास हरकत नाही.

- विशाल (९/१२/२०१९)

Tuesday, December 3, 2019

अडगळीला नवी जाग यावी पुन्हा - गोविंद नाईक

अडगळीला नवी जाग यावी पुन्हा
एक चिठ्ठी तुझी सापडावी पुन्हा

रंग आता नको कोणताही मधे
थेट स्पर्शातली भेट व्हावी पुन्हा

एवढे चांदणे पसर शेजेवरी
की घडीने घडी विस्कटावी पुन्हा

आजही घर तुझे सापडेना मला
पावलांची नजर घुटमळावी पुन्हा

अंतरंगातला भोवरा थांबला
एक गिरकी तिने आज घ्यावी पुन्हा

गोविंद नाईक

Thursday, November 21, 2019

तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला -– विंदा करंदीकर

तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला ।।
तो झाला सोहळा। दुकानात.

जाहली दोघांची । उराउरी भेट
उरातलें थेट । उरामध्ये

तुका म्हणे “विल्या। तुझे कर्म थोर;
अवघाचि संसार । उभा केला।।”

शेक्सपीअर म्हणे । एक ते राहिले; ।
तुका जे पाहिले विटेवरी.”

तुका म्हणे, “बाबा ते त्वां बरे केले,
त्याने तडे गेले। संसाराला;

विठठ्ल अट्टल, । त्याची रीत न्यारी
माझी पाटी कोरी । लिहोनिया.”

शेक्सपीअर म्हणे । तुझ्या शब्दामुळे
मातीत खेळले । शब्दातीत

तुका म्हणे गड्या । वृथा शब्दपीट
प्रत्येकाची वाट । वेगळाली

वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच.

ऐक ऐक वाजे । घंटा ही मंदिरी।
कजागीण घरी । वाट पाहे.”

दोघे निघोनिया गेले दोन दिशां
कवतिक आकाशा आवरेना ।

Thursday, November 14, 2019

ढळताच एक अश्रू, बोलेल राख माझी - आनंद पेंढारकर

ढळताच एक अश्रू, बोलेल राख माझी
सरलो कसा कसा मी, सांगेल राख माझी

हातात हात माझ्या होता कधी तुझाही
इतकीच फक्त कबुली मागेल राख माझी

संपून जन्म गेला जे मांडता न आले
ते विषय जीवघेणे टाळेल राख माझी 

फिर्याद थांबलेली ओठी असेल सुद्धा
पण आब गुंतल्याची राखेल राख माझी

जाता निघून सारे कर स्पर्श एक हलका
बघ ओलसर जराशी वाटेल राख माझी

निःश्वास टाकल्यावर, वळशील तू निघाया
पायास त्या क्षणाला माखेल राख माझी

नजरेपल्याड जेव्हा होशील सावरूनी
हलकेच शेर हळवा मांडेल राख माझी

आनंद पेंढारकर

Thursday, November 7, 2019

तुझी आठवण सहज निघाली - चिंतामणी जोगळेकर

तुझी आठवण सहज निघाली
कुठे दूर चुकचुकल्या पाली

कुणी म्हणाले रडू नको रे
डोळ्यामध्ये धूळ उडाली

वाट पाहुनी थकवा आला
समई मधली ज्योत निमाली

सांग जरा तू लपून कोठे
विस्तव थोडा राखेखाली

थकले आता पायच माझे
बसून एका झाडाखाली

भेट घडावी वाटत असते
साद न कोणी कोणा घाली

दूर कुठेशी थंडी पडली
इथे उगा घुसमटल्या शाली

©चिंतामणी जोगळेकर

Friday, November 1, 2019

लळा-जिव्हाळा, रुसवा-फुगवा, राग वगैरे - अनिल आठलेकर

लळा-जिव्हाळा, रुसवा-फुगवा, राग वगैरे
तुझ्या नि माझ्या आयुष्याचा भाग वगैरे

कुणी वेडसर बनवत जातो नवीन वाटा,
काढत बसते दुनिया नंतर माग वगैरे

एक शहारा अलगद येतो तुझा पहाटे,
म्हणून होते सकाळ... येते जाग वगैरे

काय गाडले आहे नक्की मौनाखाली?
फुत्कारत आहेत विचारी नाग वगैरे

जंगल-बिंगल मधे फालतू हवे कशाला?
तोडू, कापू शिसम, बाभळी, साग वगैरे

तसा खरा आनंदी आहे स्वभाव माझा
दृष्ट न लागो म्हणून हा.. वैताग वगैरे

पायाखालिल जमीन सरकत आहे माझ्या
काय करू घेऊन तुझा भूभाग वगैरे ..

~ अनिल विद्याधर आठलेकर

Thursday, October 31, 2019

जरा तडजोड करणारेच - सदानंद बेंद्रे

जरा तडजोड करणारेच रस्ते शोधले असते
मला तू  जीवना अन् मी  तुलाही सोसले असते

पगारी कारकूनाचे मला काळीज असते तर
उमाळे बिनपगारी वेदनांचे खोडले असते

नवी खानेसुमारी भावनांची मांडली असती
किती अस्सल किती खोट्या, बरोबर मोजले असते

असूदे मोगरा किंवा असेना शेण मेजावर
सुखाने कोरडे छापील शेरे ठोकले असते

टपालावर कशाला मारला तू खाजगी शिक्का
जगाने वाचण्याआधी मला ते पोचले असते

कशाला पाहिजे तो भिल्ल अन् तो बाणही त्याचा 
फुकटच्या टाचणीवर काळजाला खोचले असते

मनाला मारताना फार काही वाटले नसते
कदाचित घास गिळताना जरासे टोचले असते

दिला असता तुला तो चंद्र मी मोठ्या मनाने अन्
तुझ्या नावेच बिनबोभाट तारे तोडले असते

- सदानंद बेंद्रे 'मुसाफिर'

Sunday, October 27, 2019

जे करायचे ते कर जा

शिंकलो, जा जे करायचे ते कर जा
जिंकलो, जा जे करायचे ते कर जा

सांडलो, होऊनि रक्त मातीच्यासाठी,
भांडलो, जा जे करायचे ते कर जा

भंगलो, घाव घेऊन प्रीतीचे रक्तीम,
रंगलो, जा जे करायचे ते कर जा

तरसलो, जरी एकाच कटाक्षातूनी,
बरसलो, जा जे करायचे ते कर जा

पोळलो, जीवाचा यत्न करून विश्वाशी,
खेळलो, जा जे करायचे ते कर जा

टोचलो, त्यास नडला जो ध्येयप्राप्तीला,
पोचलो, जा जे करायचे ते कर जा

साचलो, कुठेही नाही जिथेही गेलो,
नाचलो, जा जे करायचे ते कर जा

खेटलो, थेट जाऊन सुबकता पाहता,
पेटलो, जा जे करायचे ते कर जा

झोपलो, शांत निर्धास्त वेळ आल्यावर,
लोपलो, जा जे करायचे ते कर जा

- विशाल (२७/१०/२०१९)

Wednesday, October 23, 2019

मी अनौरस यातनांचे मानले अर्भक  तुला- स्नेहल कुलकर्णी

मी अनौरस यातनांचे मानले अर्भक  तुला
पण दयाळू काळजाने ..घेतले दत्तक तुला

जानकी नाही जरी मी वाल्मिकींच्या काळची
एकपत्नी राघवाचे मानते द्योतक तुला

पाळली नाहीस आज्ञा रोज बिलगुन जायची
लागला घालून दयावा मग तसा दंडक तुला

वाटतो संदेह भक्ती व्यक्त करताना जरा 
पान बेलाचे शिवा पण वाहते बेशक तुला

ताठ केली आदराने मान झुकलेली तरी 
लीन आपोआप होते पाहुनी मस्तक तुला

सोवळी अद्याप प्रतिमा राहिली होती तुझी
वाटते चुंबून केले भ्रष्ट मी नाहक तुला

एकदा वाचून गाथा.. बघ तुक्याची आजही
शेवटी येईल सुद्धा ..न्यायला पुष्पक तुला

डॉ .स्नेहल कुलकर्णी

Saturday, October 19, 2019

राधा-मोहन

बावरली राधा दिसतेे ना दिसतो मोहन
फांदीवरुनी गंमत  बघतो हसतो मोहन

उधळीत वाळू फिरते राधा किनाऱ्यावरी
वाळूच्या कणकणात भरुनी असतो मोहन

मिलन ना तरी मनात केवळ राधा राधा
असती सोळा सहस्त्र  तरीही नसतो मोहन

घन दाटून येतात अचानक पाऊस येतो
झुरते तिकडे राधा इकडे झुरतो मोहन

तिथे रुक्मिणी भामा झगडे प्राजक्तावर
इथे राधेच्या रोमरोमात फुलतो  मोहन

तिन्ही लोक भरूनी त्याची माया जरीही
राधेला वगळून कितीसा उरतो मोहन

- विशाल (०५/०३/२०१९)

Wednesday, October 16, 2019

प्रारब्ध

माठाला जातो तडा, बाप बापुडा, काळजीत पडतो
माळ्यावर एकच घडा, तोही कोरडा, तान्हुला रडतो

अश्रूंचा सुटतो वेग, टाचेची भेग, सणाने कळ
नशिबाची पुसतो रेघ, भिजवतो मेघ, पाठीचा वळ

दाबून उरी हुंदका, राहुनी मुका, पाहिली दुनिया
जो उभा जीवाचा सखा, तोही पारखा, पाठ फिरवुनिया

मिणमिणतो नंदादीप, जाता समीप, वात थरथरते
इतके हे वारेमाप, जाहले पाप, रांजणी भरते

का झाड असे निस्तब्ध, फुटे ना शब्द, गळ्यातून काही
ते हवे तसे प्रारब्ध, कुठे उपलब्ध ? सांग ना आई

- विशाल (१७/१०/२०१९)

Friday, July 19, 2019

तरळले लोचनी आसू तिला हसवून जाताना

तरळले लोचनी आसू तिला हसवून जाताना
उरली वीण थोडी जन्म हा उसवून जाताना

न झाला हात कातर क्षणभरी थरथर सुद्धा नाही
न काही वाटले, खंजीर उरी धसवून जाताना ?

निघाली भेट कपटी जी सुगंधी वाटली तेव्हा
विषारी माळली होती फुले .. फसवून जाताना

तुटतो जीव, पाऊल रोज अडते उंबऱ्यामध्ये
पिलांना एकटे घरट्यामध्ये बसवून जाताना

देणे मातीचे आतातरी फिटले असेल बहुधा
रित्या हातीच गेला गाव तो वसवून जाताना

विना जाणीव घडलेले असे गारुड होते ते
पुंगीत गुंगले सारे ...साप डसवून जाताना

कुणी माळी महार कुणी इथे झाले तुका वाणी
मनावर भाव विठ्ठलमय असा ठसवून जाताना

- विशाल (१९/०७/२०१९)

Wednesday, June 19, 2019

फुलांचा बेत

देणे सुगंध, जोवर निर्माल्य होत नाही
बाकी तसा फुलांचा विशेष बेत नाही

तिची कट्यार आहे छातीत रुतून किंचित
जी आत जात नाही बाहेर येत नाही

तोडून बंध कुठल्या चकव्यात पाडले तू
रस्ता तुझ्याकडे मज कुठलाच नेत नाही

मीही कधी न त्यांच्या गर्दीत झालो सामील
त्यांनी कधीच मजला धरले जमेत नाही

कुठला धरू पुरावा तोडू कसा भरवसा
तुकडेच हे चितेवर अखंड प्रेत नाही

कर्जात शेत आमुचे लाटालही परंतु
रक्तातूनी मरेतो जाणार शेत नाही

आता जगास देऊ कुठला नवा बहाणा
तीही कवेत नाही... मीही नशेत नाही..

- विशाल (१९/०६/२०१९)

Saturday, June 8, 2019

धुळीची गोष्ट

सोसाट्याचा वारा आला
धूळ उडाली हवेत
पण येणे ठरलेले
याच भूमीच्या कवेत

धूळ आसमानी गेली
ढगासोबत मिळाली
झाला जोराचा पाऊस
सारी बंधने गळाली

वीज कडाडली मोठी
आला काळोख दाटून
जड होऊन आताशा
गेला ढगही फाटून

ढगा धूळ पेलवेना
दिले सोडून धुळीला
दंभ ढोंग त्या ढगाचे
आता कळले धुळीला

धूळ धरेवर आली
आसवांचा पूर झाला
मातीनेच दिला आसरा
ढग जेव्हा दूर पळाला

- विशाल (१९/०५/२००५)

एक आणखी प्याला

खाली झाला प्याला साकी
भर पुन्हा एकवार जाम
धुंदीत याच्या बुडल्यानंतर
होतील दुःखे सारी तमाम

विसरू दे आता जगाला
बुडवू दे मदिरेत त्याला
विसरतो मीही स्वतःला
पिऊन आणखी एक प्याला

जाणिवांच्या अक्षरावर
पसरू दे स्याही नशेची
रात्र सरो प्याल्यात अशी की
नको ती जुनी याद कशाची

आजच्याच या रात्रीसाठी
उठू दे सारी दारूबंदी
तुझ्या नशिल्या नयनामधुनी
वाढू दे प्याल्यातील धुंदी

जड जाहले नेत्र तरीही
आहे तुझीच मूर्ती समोर
ये जवळ ये पुन्हा आणिक
अखेरचा हा प्याला भर

- विशाल (०२/१२/२००५)

Thursday, June 6, 2019

उबदार पाऊस

तुझी आठवण येते
आणि एखादा ढग रेंगाळतो माझ्या घराच्या छपरावर
मग मी माझे सारे अश्रू भरतो त्या ढगाच्या पिगीबँकमध्ये
कधी दोन कधी चार ..
.
.
साठवणूक वाढेल तसा जड होऊन तो ढग आता खाली यायला लागला आहे
काही दिवसांनी पावसाळा येईल, आकाश दाटेल, वारा सुटेल
त्यावेळी पाठवीन माझे संचित तुझ्या घराकडे
.
.
मला माहित आहे तुला पहिल्या पावसात भिजायला आवडते..
मातीचा गंध सुटला की गच्चीत जाशील..
तेव्हा कदाचित तुझ्या अंगावर बरसलेला पहिला थेंब मीच असेन..
.
.
बघ यावेळचा पहिला पाऊस उबदार असेल..

विशाल (०७/०६/२०१९)

Tuesday, June 4, 2019

स्मशान

माझ्या घराकडून..
तुझ्या घराकडे येण्याच्या वाटेवर
मधेच एक स्मशान लागते..

छान जागा आहे.. शांत.. तुझी वाट पाहण्यासाठी...

आयुष्यभर...

युगानुयुगे...

- विशाल (०४/०६/२०१९)

Tuesday, May 28, 2019

लागलो आता कुठे बोलायला

लागलो आता कुठे बोलायला
गारदी आले गळा कापायला

स्वप्न होते ते तुझे की पाश होता
प्राण फिरुनी लागला गुंतायला

सय तिची जेव्हा नभाच्या पार गेली
लागलो मी तारका मोजायला

खरडुनी केली आधी काया रीती
धावले मग सावली चोरायला

पावसाची फक्त फसवी हूल होती
मोर वेडे लागले नाचायला

अर्थ नाही अन्नपूर्णेचा असा की
आयुष्य जावे हे उभे रांधायला

- विशाल (२३/०५/२०१९)

सय तुझी

सय तुझी केव्हातरी जाते थराला
लागते अन बोचरी घरघर घराला

सागराने काय जादू सांग केली
भेटताना का नदी आली भराला

दान पेटीतील द्यावे त्या करांना
घडवती जे देव.. कोरून फत्तराला

जोडले नाते गुलाबाशी असे की
टोचती काटे सुगंधी अंतराला

या तीरावरल्या सुखांचा वीट आला
जीवना ने ना मला तू त्या तीराला

- विशाल (२७/०५/२०१९)

दिली साद त्यांनी

तिच्यावरील कवितेला दिली दाद त्यांनी
जुन्या वेदनेस फिरून दिली साद त्यांनी

शब्दांची जडली व्यसने अशी भयानक
जिंदगानी केली सारी बरबाद त्यांनी

चुकून सागरांना या समजलो मी शांत
वादळातून दाखविली अवकाद त्यांनी

भासले जे बंड ती वळवळ निघाली
चिरडले भीतीत जीव निष्पाद त्यांनी

कधी ना कधी तोल जाणार होता
दडपुन जपलेले मनी उन्माद त्यांनी

"मला वाटते.." एवढेच बोललो मी
विषय सोडुनी घातला वाद त्यांनी

जाताच दांभिकांच्या हातून दानपेटी
मोलभाव करुनी विकला प्रसाद त्यांनी

(ज्यांनी कधी न धरली बाजू विषयसुखाची
निलचित्र पाहताना केला प्रमाद त्यांनी )

- विशाल (२८/०५/२०१९)

Thursday, May 23, 2019

भय इथले संपत नाही

गर्द निबिड रात्रीत
साथीला केवळ शब्द
ओठात गोठले गाणे
भोवती सर्व निस्तब्ध
मी लयीत चालतो तरीही
पायात वाट भरकटते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

एकांती विरतो देह
अलवार धुक्यात तमाच्या
नावास निळाई उरते
काठावर दग्ध मनाच्या
गाथेतील अभंग ओळ
अस्तित्व दुभंगत जाते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

स्तोत्रात झिंगले पाप
मरणांत छंद पेशींना
रक्तातील खुळे आलाप
गात्रात छेडती वीणा
दिसते ते नसते बहुधा
नसते ते फिरुनी दिसते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

- विशाल (२४/०५/२०१९)

Sunday, April 21, 2019

अंतराय

शल्य कैवल्याचे बाई
दुःख रानोमाळ जळे
रक्त गोठून गोठून
नसानसात साखळे

नाद कांचनमृगाचा
ओलांडते बाई रेघ
वेणी सोडून मोकळी
बोलावते काळा मेघ

कोरी साखर साखर
दुधामधे विरघळे
बाई नाचते रानात
घाम चोळीत निथळे

उभी रात घाली डोळा
ओल्या दवाचा उखाणा
श्वास रोखून थांबला
आहे झाडाशी पाहुणा

धावे दाराकडे बाई
फाटे पळताना ऊर
गाठ गाठीला असू दे
पुढे जायचंय दूर

नभ झरू दे कितीही
किती हंबरु दे गाई
काटा रुतेल पायात
मागे वळू नको बाई

नाद लागता खुळाचा
काय बाप कोण माय
बाण सुटल्यावरी गे
पुढे ठेव अंतराय

- विशाल (२२/०४/२०१९)

Saturday, April 13, 2019

प्रचिती

आयुष्यामधे या
केले असे कांड
जाहलो प्रकांड
पंडित मी

अनुभव सारे
बांधले गाठीशी
टाकली पाठीशी
सुखदुःखे

पूजा आरत्यांचे
आंधळे इशारे
खाजगी गाभारे
देवळात

खाजवली दाढी
शमविले कंड
असे थोर बंड
जोगीयाचे

तूच सांग आता
कोणती प्रचिती
वाट पाहू किती
माऊली गे

- विशाल (१३/०४/२०१९)

Thursday, April 4, 2019

सुबकता

घाल जरा मोकळेपणाला आवर
वाढला इथे चोरांचा आता वावर
टाळ विहरणे तंग घालुनी कपडे
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

म्यान कर त्या नजरेच्या तलवारी
थांबव मंद स्मितातील गोळाबारी
मिटुनी अधर कमान रोख ते बाण
भाळावर रुळता पाश धाड माघारी
निशस्त्र कशी तू ? देशी घाव मनावर
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

नाकात मोरणी ती रेखीव कशाला
झुलविशी फुलातून कानी जीव कशाला
ओठांचा रक्तीम घोर कमी का त्यात
हा चवथीचंद्र माथी कोरीव कशाला
सालंकृत चढते कर्ज अलंकारावर
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

भरली मादकता ठासुनिया अंगात
मग म्हणू कसे तव आहे भोळी जात
हर उभार ताशीव असा घडवला यत्ने
ना चित्र बने ना हो वर्णन शब्दात
स्वर्गस्थ सुंदरी जणू तू भूमीतलावर
ही अशी सुबकता चित्तारून देहावर

- विशाल (०४/०४/२०१९)

Monday, April 1, 2019

घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुला आठवता कागदावरी उतरून आली ओळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
स्पर्शता तुला विसरून गेलो करायची अंघोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुझ्या सयीने हृदयाच्या छिद्राचे झाले बोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुझ्या अदा टोमणे बहाणे मिसळून झाला कोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
झोप नाही रात्रीला सोबत घुबड नि वटवाघोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
पाहताच तू दुजाकडे उठतात आगीचे लोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
कोरेगाव तू पार्क पुण्यातील अन मी कापूरहोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
किती मारल्या उड्या तवपुढे जैसे बेडूक टोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तू पाहून मज हसता उठला केवढा गदारोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
लागून मागे तुझ्या जाहला पुरता बट्ट्याबोळ
सखे गं घोळ झाला घोळ

घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुला पटविण्या चालू सारा कवितेचा हा झोळ
सखे गं घोळ झाला घोळ

-विशाल (०२/०४/२०१९)