Thursday, October 31, 2019

जरा तडजोड करणारेच - सदानंद बेंद्रे

जरा तडजोड करणारेच रस्ते शोधले असते
मला तू  जीवना अन् मी  तुलाही सोसले असते

पगारी कारकूनाचे मला काळीज असते तर
उमाळे बिनपगारी वेदनांचे खोडले असते

नवी खानेसुमारी भावनांची मांडली असती
किती अस्सल किती खोट्या, बरोबर मोजले असते

असूदे मोगरा किंवा असेना शेण मेजावर
सुखाने कोरडे छापील शेरे ठोकले असते

टपालावर कशाला मारला तू खाजगी शिक्का
जगाने वाचण्याआधी मला ते पोचले असते

कशाला पाहिजे तो भिल्ल अन् तो बाणही त्याचा 
फुकटच्या टाचणीवर काळजाला खोचले असते

मनाला मारताना फार काही वाटले नसते
कदाचित घास गिळताना जरासे टोचले असते

दिला असता तुला तो चंद्र मी मोठ्या मनाने अन्
तुझ्या नावेच बिनबोभाट तारे तोडले असते

- सदानंद बेंद्रे 'मुसाफिर'

Sunday, October 27, 2019

जे करायचे ते कर जा

शिंकलो, जा जे करायचे ते कर जा
जिंकलो, जा जे करायचे ते कर जा

सांडलो, होऊनि रक्त मातीच्यासाठी,
भांडलो, जा जे करायचे ते कर जा

भंगलो, घाव घेऊन प्रीतीचे रक्तीम,
रंगलो, जा जे करायचे ते कर जा

तरसलो, जरी एकाच कटाक्षातूनी,
बरसलो, जा जे करायचे ते कर जा

पोळलो, जीवाचा यत्न करून विश्वाशी,
खेळलो, जा जे करायचे ते कर जा

टोचलो, त्यास नडला जो ध्येयप्राप्तीला,
पोचलो, जा जे करायचे ते कर जा

साचलो, कुठेही नाही जिथेही गेलो,
नाचलो, जा जे करायचे ते कर जा

खेटलो, थेट जाऊन सुबकता पाहता,
पेटलो, जा जे करायचे ते कर जा

झोपलो, शांत निर्धास्त वेळ आल्यावर,
लोपलो, जा जे करायचे ते कर जा

- विशाल (२७/१०/२०१९)

Wednesday, October 23, 2019

मी अनौरस यातनांचे मानले अर्भक  तुला- स्नेहल कुलकर्णी

मी अनौरस यातनांचे मानले अर्भक  तुला
पण दयाळू काळजाने ..घेतले दत्तक तुला

जानकी नाही जरी मी वाल्मिकींच्या काळची
एकपत्नी राघवाचे मानते द्योतक तुला

पाळली नाहीस आज्ञा रोज बिलगुन जायची
लागला घालून दयावा मग तसा दंडक तुला

वाटतो संदेह भक्ती व्यक्त करताना जरा 
पान बेलाचे शिवा पण वाहते बेशक तुला

ताठ केली आदराने मान झुकलेली तरी 
लीन आपोआप होते पाहुनी मस्तक तुला

सोवळी अद्याप प्रतिमा राहिली होती तुझी
वाटते चुंबून केले भ्रष्ट मी नाहक तुला

एकदा वाचून गाथा.. बघ तुक्याची आजही
शेवटी येईल सुद्धा ..न्यायला पुष्पक तुला

डॉ .स्नेहल कुलकर्णी

Saturday, October 19, 2019

राधा-मोहन

बावरली राधा दिसतेे ना दिसतो मोहन
फांदीवरुनी गंमत  बघतो हसतो मोहन

उधळीत वाळू फिरते राधा किनाऱ्यावरी
वाळूच्या कणकणात भरुनी असतो मोहन

मिलन ना तरी मनात केवळ राधा राधा
असती सोळा सहस्त्र  तरीही नसतो मोहन

घन दाटून येतात अचानक पाऊस येतो
झुरते तिकडे राधा इकडे झुरतो मोहन

तिथे रुक्मिणी भामा झगडे प्राजक्तावर
इथे राधेच्या रोमरोमात फुलतो  मोहन

तिन्ही लोक भरूनी त्याची माया जरीही
राधेला वगळून कितीसा उरतो मोहन

- विशाल (०५/०३/२०१९)

Wednesday, October 16, 2019

प्रारब्ध

माठाला जातो तडा, बाप बापुडा, काळजीत पडतो
माळ्यावर एकच घडा, तोही कोरडा, तान्हुला रडतो

अश्रूंचा सुटतो वेग, टाचेची भेग, सणाने कळ
नशिबाची पुसतो रेघ, भिजवतो मेघ, पाठीचा वळ

दाबून उरी हुंदका, राहुनी मुका, पाहिली दुनिया
जो उभा जीवाचा सखा, तोही पारखा, पाठ फिरवुनिया

मिणमिणतो नंदादीप, जाता समीप, वात थरथरते
इतके हे वारेमाप, जाहले पाप, रांजणी भरते

का झाड असे निस्तब्ध, फुटे ना शब्द, गळ्यातून काही
ते हवे तसे प्रारब्ध, कुठे उपलब्ध ? सांग ना आई

- विशाल (१७/१०/२०१९)