Tuesday, September 11, 2018

तुझे नाव

इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने
एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे

काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती
मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे

अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे
रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने

पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी
ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे

नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या
विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने

हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा
नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे

-- विशाल (११/०९/२०१८)

Monday, September 10, 2018

मिसकॉल

कितीतरी वेळ नुसता वाजत होता मिसकॉल
माझ्या फोनवरचा तुझा गाजत होता मिसकॉल

जातो जातो म्हणत किती माजला होता मिसकॉल
पण तुझ्याकडे येताना मात्र लाजला होता मिसकॉल

बोलण्यात नसलेली धार परजत होता मिसकॉल
पाच पाच मिनिटांनी पुन्हा गरजत होता मिसकॉल

मित्रांमधून तुला केलेला लपून होता मिसकॉल
कळत नकळत किती भावना जपून होता मिसकॉल

वाट पाहूनी जीव वेशीला टांगत होता मिसकॉल
मनामनाचे मनामनाला सांगत होता मिसकॉल

येऊन अचानक हृदयात घर करून राहिला मिसकॉल
फोनबरोबरच मनातूनही भरून वाहिला मिसकॉल

खळखळ सुंदर निर्झराप्रमाणे वहात होता मिसकॉल
अबोल्याच्या धीराचा अंत पहात होता मिसकॉल

काय झालं जर आज थोडा ओला होता मिसकॉल
मी न्हाणीघरात असताना तो केला होता मिसकॉल

माहीत नाही कुठलं देणं लागत होता मिसकॉल
माझ्यासोबत आठवणीत उगा जागत होता मिसकॉल

तुला भेटायचा एकमेव मार्ग ठरीत होता मिसकॉल
त्या मार्गावर मजला सोबत करीत होता मिसकॉल

-- विशाल (११/११/२००६)

Thursday, September 6, 2018

आसूड

इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले  
मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले

जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता
भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता 

स्वप्ने विषारी बिछाना दुधारी कुशी पालटून सरे रात्र जागी
कवडशामध्ये चांदण्याच्या पिशी थरारते कातडी ही अभागी

दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार
"तिळा तिळा" मी किती घोकतो हे उघडीत नाही तरीही कवाड

अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ?
पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका

मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा आसूड होतो 
चकोराप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो

-- विशाल (०६/०९/२०१८)

Wednesday, August 8, 2018

निरोपाच्या क्षणी मन रेंगाळले क्षणभर

निरोपाच्या क्षणी मन रेंगाळले क्षणभर
शेष राखेला पुन्हा मी जाळले क्षणभर

प्रभाव म्हण हा तुझा वा माझी मजबुरी
कायदे पण डोळ्यांचे मी पाळले क्षणभर

वाया नाही गेली मेहनत तुझ्या बहाण्यांची
खरे सांगतो मीही अश्रू ढाळले क्षणभर

काट्यांचे मी ताज तुझ्या घातले सुखाने पण
गुलाबही माझे कुठे तू माळले क्षणभर ?

झेलताना सरी अघोरी तप्त जाणिवांच्या
तुला स्मरूनी भोवताल गंधाळले क्षणभर

-विशाल (०८/०८/२०१८)

Saturday, August 4, 2018

एवढा कसला खुलासा चालला आहे

एवढा कसला खुलासा चालला आहे
मी कुठे माझा गुन्हा नाकारला आहे

लढून मेला तो कधी न हारला रणी
पळून जाणारा कधीचा वारला आहे

तुलाही जाताना कसे ना वाटले काही
दिवस भर दुपारी अंधारला आहे

कापरासम जळलो नुरलो जराही
समीधेत भाव माझा वधारला आहे

कसली करतो काळजी तू पाप पुण्याची
("संभवामी युगे युगे" तो बोलला आहे )

- विशाल (०५/०८/२०१८)

Monday, July 16, 2018

अशी पावसाची हि सर कोसळावी
तिची पाठमोरी मिठी घट्ट व्हावी
असे काही व्हावे कळावे ना क्षणभर
सरावे ना अंतर उरावे ना अंतर

Thursday, June 28, 2018

वाया गेलेली कविता

प्रहर चालला तो दुपारचा
त्यातून घन आलेले दाटून
दमट जराशी हवा पसरली
लपाछपी खेळतसे ऊन

दूर कुठे तो बसून रावा
घालीत होता किर किर शीळ
उदास होते आयुष्य झाले
सरता सरेना आजची वेळ

अशाच वेळी बसून एकटा
हळूच असे तो निरखत तिजला
एक भेंडोळे एक लेखणी
होता हाती घेऊन बसला

काही अंतरावर ती होती
घागर बुडवीत पाण्यामध्ये
रेखीव काया लवचिक बांधा
वर्ण गोमटा कपडे साधे

तिला ना होती जाणीव त्याची
गुणगुणतसे आपल्या तंद्रीत
आडोशास तो बसला होता
काही खोडीत काही लिहीत

घागर भरुनी ती निघताना
याची लेखणी थांबे पुरी
शीळ घालुनी तिज तो बोले
तुजवर लिहिले हे वाच सुंदरी

निघे गुलाब मग खिशातुनी
जशी ती एकेक ओळ वाचता
जरा थांबुनी मग ती वदली
"वा रे दादा छान कविता !"

गुलाब गेला सुकुनी खिशातच
ती लबाड हसली जाता जाता
गेली घेऊन भेंडोळेही
वाया गेली एक कविता

- विशाल (२४/०६/२००६)

Friday, June 8, 2018

फलीत

पाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का
जी बनवणाऱ्यास होता भेटला प्रेषित का

काय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले
अर्धवटसे वाटते आहे मला हे  गीत का

भंगले याच्यात काही खंगले याच्यात काही
दंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का

नाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती
नाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का

घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन
अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का

खोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा
तीच कविता भासते आहे अशी विपरीत का

हा नव्याने जन्म आहे या नव्या दुनियेमधे
तू तरीही बैसली कित्ता जुना गिरवीत का

बंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा
जे खिशाला परवडेना ते  म्हणू जनहित का

उतरता उन्माद कळले एकटाच रणांगणी
मित्र नाही आप्त नाही ही म्हणावी जीत का

ओळ आहे खूप साधी वाच अन सोडून दे
शोधते आहे तयातील अर्थ तू गर्भित का

दूर तू अन दूर मी राहिली कुठली कमी
भेट ना घडे या जन्मी ही अंतरे शापित का

पाहणी केली तयांनी साक्ष घेतली नोंदवून
काढले फोटो.. निघाले.. पुढे लालगी फीत का

धुतल्यानंतर थाळीे तू ही घे तपासून एकदा
त्यात कृष्णाच्या नावाचे उरले आहे शीत का

अग्नी परीक्षा देताना वदली सीता रामाला
जपले शील तुझ्यास्तव हे त्याचे फलीत का

- विशाल (०८/०६/२०१८)
In between Pune to Karad

Friday, June 1, 2018

पदर

आयुष्या मला तुझी खबर मिळू दे
केलेल्या सर्व नोंदीची बखर मिळू दे

प्रेमरोगी कधी होत नाही बरा
औषधाच्या नावावर जहर मिळू दे

जन्म जावो उभा वाळवंटी फिरून
अंत समयी परी तुझे शहर मिळू दे

काट मारल्या स्वप्नांची खाडाखोड सारी
कागद कोरा कराया रबर मिळू दे

नको ती ठाम काळ्या धोंड्यावरली रेष
मिळणारा हर क्षण जर-तर मिळू दे

वाट पंढरीची सरता सरे ना झाली
विठुनामी अमृताचा गजर मिळू दे

मंजूर आहे मरण अगदी या क्षणीही
एक तुझी हळहळती नजर मिळू दे

किनाऱ्यावर आता नाही राहिली मजा
खोल आत ओढून नेणारी लहर मिळू दे

सात जन्म संपत आले गोष्ट तरी बाकी
सोबतीचा अजून एखादा प्रहर मिळू दे

काहीच यातले वा नको तुझ्या कुशीत
लपायला तुझा फक्त आई पदर मिळू दे

- विशाल (०१/०६/२०१८)
From Pune, all the way to Karad

Wednesday, May 30, 2018

बेदरकार

तुटले बंध उघडले दार
वादळांवरी झालो स्वार
आता लगाम कसले यार
जिणं झालं बेदरकार

दिले सोडूनि फसलेले
स्वप्नामध्ये दिसलेले
हृदयामध्ये घुसलेले
अन अमुच्यावर हसलेले
फक्त स्वतःचा आता विचार
जिणं झालं ...

आता माझा मीच खरा
बुरेच सारे मीच बरा
पर्वतावरी जणू झरा
वा उनाड अवखळ वारा
सारे अडथळे करून पार
जिणं झालं ...

दिले तिला सोडून कधीचे
गेलो विसरून साफ आधीचे
निवडून काटे करवंदीचे
दंड बनविले त्या फांदीचे
त्या दंडाचे सहून प्रहार
जिणं झालं ...

-विशाल (१०/१२/२००७)

तू गेल्यापासून

शब्दही ना अस्फुटसा या मुखात आलेला
कर अजून वार ऊरी जीव नाही गेलेला

आठवणींना उराशी बांधून मी जगलेलो
अखेरीला साथ राहण्याचा वाद केलेला

ओढूनिया सहज तुटे हा नव्हे असा बंध
दाव तरी जोर किती तू उसना आणलेला

जाणूनिया जग सारे ठेवली ना जाण माझी
हे ही जाणले मी नाही मी किती अजाणलेला

तुकड्यांना हृदयाच्या दोष देती सर्व आता
तुटण्या आधीच का ना कोणी त्यास बोललेला

बरसत आहे अजून सर या नयनामधून
अन गेल्यापासून तू समुद्रही उधणालेला

-विशाल (१५/१२/२००७)

Wednesday, May 23, 2018

पिंपळपान

आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू
मग फुलांनी केलेला अपमान शोधू

दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची
अन्यथा रामायणात अज्ञान शोधू

सोसेना गलका सभोवती शांततेचा
दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू

बोलण्या आधीच सुरू होती लढाया
ऐकूनी घेतील असले कान शोधू

प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन
भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू

आदेश हा कारागृहे खुली करण्याचा
पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू

शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा
थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू

शिव्या शाप जरी रोजचेच ठरलेले
नशिबातील एखादे समाधान शोधू

खंत नको कालची वा तमा उद्याची
खुल्या बाहूंनी जगू.. वर्तमान शोधू

रात्र बाकी ये पुन्हा हरवून जावू
पहाटे माझे तुझे देहभान शोधू

अटळ प्रलय आहे हा विशाल तर
अवघे विश्व तराया पिंपळपान शोधू

-विशाल (२१/०५/२०१८)

Tuesday, May 15, 2018

तुझ्यात माझ्यात

घडले जे ते घडून गेले
अन घडणारे घडू दे सुंदर
तुझ्यात माझ्यात

काही भावना गोड कितीतरी
काही समजुती जरा कलंदर
तुझ्यात माझ्यात

कशास आता विचार त्याचा
नशिबात जे होईल नंतर
तुझ्यात माझ्यात

दुरुनही तू सोबत देते
मंतरलेले विशाल अंतर
तुझ्यात माझ्यात

रेशीमबंध अभंग अखंड
वाट असू दे कितीही खडतर
तुझ्यात माझ्यात

बघ जरा कुणी खडा मारला
उचलला अन कुणी लगेच फत्तर
तुझ्यात माझ्यात

सवाल हा जो खडा जाहला
कुणाकडे गं त्याचे उत्तर
तुझ्यात माझ्यात

असू देत ना फरक काय तो
काय चुकीचे किती बरोबर
तुझ्यात माझ्यात

दोघे चालू असेच भांडत
मी 'हो' म्हणतो तू 'ना ना' कर
तुझ्यात माझ्यात

-विशाल (०८/०३/२००८)

Tuesday, May 8, 2018

याचाच राग आला

याचाच राग आला याचाच राग आला

हरलो मी तेव्हा सारी चूक माझीच होती
जिंकलो तेव्हा त्यात नशिबाचा भाग आला
याचाच राग आला

थोडा तुझ्या कलाने मी वागावयास गेलो
माझ्या रितेपणावर प्रेमाचा डाग आला
याचाच राग आला

ना घडीचा भरवसा तरी बातमी उद्याची
तू सांगतोस तुजला कसला दिमाख आला
याचाच राग आला

शैशव हे अजूनही सरले ना पुरेसे
पाहिली ना जवानी तोवर विराग आला
याचाच राग आला

चुपचाप ऐकले मी त्यांचे रटाळ भाषण
माझ्या न बोलण्याचा त्यांस वैताग आला
याचाच राग आला

ते भांडखोर खासे सोडून ताळतंत्र
नि माझ्या विशेषणाला म्हणती कजाग आला
याचाच राग आला

पापी आम्ही दुरात्मे कधी मंदिरी न गेलो
तो पुण्यवान करुनि काशी प्रयाग आला
याचाच राग आला

झिडकारले जरी तू पाहून ओठी हासू
हा मोहरून माझ्या मनी फुलबाग आला
याचाच राग आला

ठिणगी ती कोणती जी तू टाकली उरात
भैरवीस आळवता ओठी दिपराग आला
याचाच राग आला

- विशाल (०८/०५/२००८)

तू म्हणसी तैसे

तू म्हणसी तैसे सरले जर का
दोघांमधले नाते
का कविता हातून होते ?

तू म्हणसी तैसे कथा आपली
तिथेच जर संपली
का नदी नाही थांबली ?

तू म्हणसी तैसे विसरलीस जर
तू झाले गेलेले
का मेघ भरून आलेले ?

तू म्हणसी तैसे पाहून आरसा
तुला न आली लाज
का इथे कडाडे वीज ?

तू म्हणसी तैसे जर जमला नाही
एकही अश्रू नयनी
का भिजली सारी धरणी ?

तू म्हणसी तैसे या प्रश्नाचे
जर उत्तर तुजला ठावे
का तू न मला भेटावे ?

तू म्हणसी तैसे जर का याचे
तुजकडे उत्तर नाही
का दूर तू सांग अजूनही ?

तू म्हणसी तैसे पुन्हा भेटीचा
तुला नाही विश्वास
का चालू माझा श्वास ?

- विशाल (०३/०६/२००८)

लिखाण

इतरांस जरा अंजान लिहिला होता
पण शेर तसा बेभान लिहिला होता

कुठे ऐकली? कधी? फुलांची गाथा
(मी लिहिताना तर प्राण लिहिला होता)

अर्थ समजून तू केलीस वाहवाही
(जाणूनबुजून आसान लिहिला होता)

आरोप जाहला पक्षपाताचा जरी
मी एकजातच समान लिहिला होता

बोधप्रद म्हणू कसे हे आत्मचरित्र
मी तर माझा अपमान लिहिला होता

बदनाम करून जाळला जयांनी लेख
नंतर ते वदले छान लिहिला होता
- विशाल (२९/०६/२००८)

Monday, May 7, 2018

गोंधळ

रंगतात चर्चा चौघीजणीत माझ्या
का तू अजूनही आठवणीत माझ्या

सरी दुःखाच्या पुरत्या ओसरल्या कोठे
गळतो मी रोज वळचणीत माझ्या

गझला नि लावण्या दिल्या मी किती तुला
हाती निदान दे तू सुनीत माझ्या

लोक मला बोलती शांततेचा पुजारी
मनात आत चालू गोंधळ नित माझ्या

मदतीचा हात दिला ज्यांना, त्यांनीच आज
तोंडे हो फिरवली अडचणीत माझ्या

वार्षिकेत प्रगतीच्या नको सोडू वाफा
पास तरी हो आधी चाचणीत माझ्या

तहानल्या जीवाची हाक ऐकली आणि
पाणी ओतले त्यांनी चाळणीत माझ्या

घामाचे पीक माझे कापून नेले कोणी
उरला कडबाच फक्त कापणीत माझ्या

मराठी, कला, शास्त्रे घेऊनि गेलो पुढे
का हे आले मागे बीजगणित माझ्या

शरण जाऊनि जीवाचे दान मिळविले पहा
राहिलो मी एकटाच छावणीत माझ्या

विरहाच्या अश्रूंचा पुर ओसरून गेला
आता तुझा निवास पापणीत माझ्या

दाग दागिने वस्त्रे ओरबाडूनी नेली
नेले पण मला न कोणी वाटणीत माझ्या

करण्या पापे भस्म होईल ज्याचा वणवा
निखारा असे कुठे तो अग्नीत माझ्या

कितीच खून पाडले । जिंकल्या किती लढाया
बळ सहस्त्र समशेरींचे लेखणीत माझ्या

दंश करणारा आता मी सर्प कुठे शोधू
मी साप पाळतोय अस्तनीत माझ्या

शब्दगंध नसे ज्यांना तेच बरळले पुढे
"कविता झाली नाही धाटणीत माझ्या"
- विशाल (२७/०५/२००८)

Friday, May 4, 2018

सांज

सांज स्वर्ण गात्रांची दरवळ
सांज धुंद प्रणयाची हिरवळ
सांजेमध्ये मने गुलाबी
सांज तरी का सावळ सावळ

सांज जीवाला लावून हुरहूर
सांज मनातून उठवून काहूर
सांज रात्रीची असून सुरावट
सांज कधीच ना बेसूर भेसूर

सांज ओंजळीत भरून घ्यावी
सांज थेंबथेंबांनी प्यावी
सांज सयीतून छळे तनुला
सांज कस्तुरी औषध लावी

सांज कधीतरी खवळून रक्त
सांज कधीतरी शांतचित्त
सांज धरे हर रूप आगळे
सांज आरक्त नि सांज विरक्त

सांजेवर विरहाची छाया
सांज समीप आणते प्रिया
सांज कशी हो अपराधी
सांज सजा की सांज दया

-विशाल (१७/०३/२०१०)

खरी वाटते पूरी वाटते

खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते

भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये
क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते

हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण
हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते

सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा
तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते

तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही
काय करू मी? हाय! तुझ्याहून याद तुझी कस्तुरी वाटते

सखे आज तू मला तुझे नि गगनाचे या नाते सांग
कशी तुझ्यासोबत असताना , सांज अजून सिंदूरी वाटते

कानामध्ये रुंजी घालत आहे अजून होकार तुझा
आता वाजू दे काही मजला ती कृष्णाची बासुरी वाटते

काय तुझी एकेक अदा.. जग होय फिदा त्यावरी परी
हृदयतोडीतील सहजपणाची अदा थोडीशी बुरी वाटते

-विशाल (०७/११/२००९)

Thursday, April 19, 2018

आज हलके वाटले तर

आज हलके वाटले तर
चांदण्या तोलून धर

बोल.. पण नयनातुनी
उघडू नको देऊ अधर

उजळुनी हे विश्व अवघे
सावरिशी का पदर

होऊ दे गलका उसासा
मोकळे कर मूक स्वर

जीव घे हासून हलके
ओठ हेच धनु नि शर

ने कुशीतून कालडोही
गुदमरूदे रात्रभर

बरस आता अंतरातुनी
हो पुरी सारी कसर

व्यापूनिया ये तमासम
गात्र गात्र नि शांत कर

- विशाल (१७/०४/२०१८)

Monday, April 16, 2018

ज्वालामुखी

लाट आली सुनामी किनाऱ्यामध्ये
कोणता कोन झाला ग्रहताऱ्यांमध्ये

लावली मैफिलीस हजेरी जरी
मी असूनही नव्हतो त्या साऱ्यांमध्ये

इथे येतसे तुझी स्पर्शून काया
राख माझी उडे त्याच वाऱ्यामध्ये

ठेवुनी उतारा का  उतरे ना बाधा
एक अंडे कमी त्या उताऱ्यामध्ये

कैदी पळाला ही अफवाच होती
शोधतो ढील जो तो पहाऱ्यामध्ये

घोडी जाई जरी पाठीच्या भाराने
जाई शिंगरू फुका येरझाऱ्यामध्ये

खून पाडून घातली मान खाली
लाज का हीच ती लाजणाऱ्यामध्ये

दिसे थंड तरी नका राख मानू
सुप्त ज्वालामुखी या निखाऱ्यामध्ये

-विशाल (३०/१०/२००९)

Thursday, April 12, 2018

नकार

खरेच माझा लढावयाचा विचार नाही
असे जरी तरी तेवढा मी हुशार नाही

विचारला मी सवाल त्याचा का त्रास झाला?
तुझ्या उत्तराची वेदनाही सुमार नाही

उडी मारण्या आधीच मज हे ठाव होते
बुडेन मी खोल.. या नदीला उतार नाही

तुझ्या मिठीतही ना ज्याचा विसर पडावा
प्रिये भूतली असा एकही आजार नाही

गांडीवधारी.. कुठे परी नेम अर्जुनाचा?
धनुर्गत शर एकही आरपार नाही

दशरथाचा बाण लागला श्रावणास अन
सिंह वदे- खास एवढी ही शिकार नाही

म्हणे फुलांना मी एकदा हात लावलेला
अशाप्रकारे आरोप हा निराधार नाही

डोईवरल्या कर्जाचे कसले सत्कार
श्वासही इथे कधी घेतला उधार नाही

गडे जरी नव्हता दिला होकार तेव्हा
आता तुझा "हो" म्हणायासही नकार नाही

- विशाल (१८/०९/२००९)

Wednesday, March 28, 2018

नको आठवू आता पुन्हा नव्याने

नको आठवू ,आता पुन्हा नव्याने,
तुला काय सांगू, किती त्रास होतो?
ना रात्र सरते, ना दिवस जातो,
तीनही त्रिकाळी, तुझा भास होतो ।

नको आठवू, आता पुन्हा नव्याने,
तुझ्यासाठी ओठात, हर घास अडतो,
सुचते ना दुसरे, काही मनाला,
कवितांचा तुझीया, मला ध्यास जडतो ।

नको आठवू, आता पुन्हा नव्याने,
दृष्टी मी शून्यात, लावून बघतो,
नयनी भरुनी, हृदयी असे तो,
तुझा चेहरा, नित्य पाहून जगतो ।

नको आठवू, आता पुन्हा नव्याने,
स्वतःलाच मी, गोष्टी सांगून हसतो,
मला ठाव असते, तू बसुनी समोर,
पण तिसऱ्याला, मी वेडाच दिसतो ।

नको आठवू, आता पुन्हा नव्याने,
हे पान सुद्धा, बघ गेले भरून,
स्याही ही आटली, लेखणी लिहीना,
अन शब्द माझेही, गेले संपून ।

- विशाल (कराड १०/१२/२००६)

Wednesday, March 7, 2018

आदमीका वक्त बुरा हो मगर इतनाभी नही गालिब
की हम चुहा मारना चाहते हो और तू नजर आ जाये
- विशाल

Monday, March 5, 2018

खलाशी

ठाव ना आम्हा मदिना मक्का
ठाव ना आम्हा प्रयाग काशी
आम्ही वेडे विमुख खलाशी
आयुष्याच्या वेशीपाशी

तुम्ही झगडता आयुष्याशी
आम्ही होतो त्याला सोबत
पुण्य पाप तुम्ही अलग ठेवता
उचलतो दोन्ही आम्ही अलगद
मध्य गाठण्या बुडता तुम्ही
आम्ही पहातो किनाऱ्याशी

जीवनात या नकोत संकट
तुमचे आयुष्यास साकडे
लगाम त्यांचा आमच्या हाती
संकट आम्हापुढे तोकडे
झुकणे कसले आम्हा ना माहीत
नाते आमुचे आभाळाशी

गुलाम तुम्ही असे कारकून
गठ्ठे बांधता दिवस खरडून
आम्ही उधळतो रंग छटांचे
चाकोरीची चौकट मोडून
तुम्ही बंदी अन मुक्त आम्ही
जरी तुमच्या नजरेतून दोषी

आराम ओढून तुम्ही झोपता
काम जरा लावून उशाशी
कष्टाचे आभूषण लेवून
फिरतो आम्ही चहू दिशाशी
आस सुखाची तुम्हास आमुचे
दुःखही खेळे आनंदाशी

-विशाल (कराड १८/०१/२००६)

Thursday, March 1, 2018

उशिरा

आल्यावर ती यार उशिरा
का न पडे अंधार उशिरा

आधी घाव पचवा प्रेमाचे
शत्रू करतील वार उशिरा

समजवा रे दिलास कोणी
यास कळे व्यापार उशिरा

जिण्या-मरणाचा प्रश्न जयात
तीच पोहोचली तार उशिरा

सांभाळा धर्म अजून जरासा
यंदा त्याचा अवतार उशिरा 

जो तो पुसतो कोण? कशाला?
नको इतका सत्कार उशिरा

आधी थिरकते वीज अंबरी
कडकडती झंकार उशिरा

इडली कधीच उकडली होती
कढले पण सांभार उशिरा

नको फैसला बीजास पाहून
कर्म घेई आकार उशिरा

इथे आटपता कामे लवकर
तिथे वाजती चार उशिरा

ओढीस क्षणभर उसंत नाही
पण भेटीचा वार उशिरा

उशिरा तुझे गं रंग उमगले
(कळती फुलांचे प्रकार उशिरा)

जगणे कधीच संपून जाते
मरण येते फार उशिरा

त्यांचे किंचाळणे विरु दे
गा विशाल ओंकार उशिरा

-विशाल (पुणे २६/०२/२०१८)

Tuesday, February 27, 2018

जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माय मराठी माऊली गे
मागतो इतकाच वर
ज्ञानियाचा टाकातुन दोन थेंब
पडू दे आमच्या कागदावर
-विशाल

जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लिहिणारे लिहीत राहो
वाचणारे वाचत राहो
जोवर श्वास चालू माझा
जिव्हेवर मराठी नाचत राहो

- पुणे (२७/०२/२०१८)

Tuesday, January 2, 2018

नाते

एक आठवणीचे बीज पेरले होते त्या वळणावर
जिथे उमटली होती तुझी शेवटची पाऊलखुन
सिंचनाला आसवांचे दोन थेंब ढाळले होते
तुला कदाचित जाणीव नसेल
पण आता त्या रोपाला फुल लागले आहे
काढून ठेवीन त्याला तुझ्यावर लिहिलेल्या कवितांच्या वहीत
तिथेच
जिथे दोन कवितांच्या मधले पान फाटले होते
जिथे हात हातातून सुटले होते
एक नाते तुटले होते

-विशाल ३०/१२/१७