Monday, June 29, 2015

एक काम करण्याची परवानगी दे फक्त

रागाने झिडकारशील
स्वतःपासून दूर करशील
पण एक काम करण्याची परवानगी दे फक्त

मी बांधलेल्या मंगळसूत्राची वाटी
तुझ्या नकळत गळ्यात होईल पलटी
ती सरळ करण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

केसांच्या बटांची ती रेशीमडोर
लटक्याने  येईल डोळ्यांसमोर
ती मागे सारण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

घाईत कधी हळूवार
फसेल कुठेसा पदर
तो सोडवण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

रात्री एकांती कधी चमकेल वीज
दचकून अचानक तुटेल नीज
कुशीत घेऊन थोपटण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.

तुजवीन सखे काय ठाव
कधी अर्ध्यावर मोडेल डाव
आठवणीत येण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त

--- विशाल

(भावानुवाद / प्रेरणा : गुलजार - मुझको_इतने_से_काम_पे_रख_लो)




Thursday, June 4, 2015

हाक

"आजच नेमके साहेबाला काम आठवले" सदा स्वत:शीच बोलत होता. "एक तर आज अमावास्या, त्यातच तो रोजचा रोड पालिकेने सकाळी खोदून ठेवलेला म्हणजे त्या आडवाटेने कच्च्या रस्त्याने स्मशानावरुन फिरून जावे लागणार म्हणून लवकर निघावे म्हणले तर ११ वाजवले xxxने" साहेबाला शिव्या घालीत गडबडीत सायकल ताणत असलेल्या सदाची तंद्री पत्र्याच्या खडखडाटाने मोडली.   पॅडल फिरेना म्हणून त्याने उतरून पाहिले. सायकलची चेन निसटलेली. आता सायकलच्या नावाने अजून दोन शिव्या तोंडातून बाहेर पडल्या. सदाने आजूबाजूला पाहिले. चिटपाखरुहि नव्हते. मागे पडलेला आणि पुढे असलेला दिव्याचा खांब दोन्ही मेणबत्ती एवढे दिसत होते. त्यामुळे तिथे थांबून चेन बसवायची सदाची हिम्मत होत नव्हती. सायकल तशीच ढकलत नेण्याचा निर्णय त्याने घेतला. अंधारामुळे घड्याळात किती वाजले तेही कळायला मार्ग नव्हता. दुरून नदीवरून सू सू वाहणारा बोचरा  वारा आणि सोबत आता सायकलच्या चेन चा लयबद्ध आवाज सदाच्या भीतीत अजूनच भर घालत होता. "एकतर आज अमावास्या, रात्रीची वेळ, त्यात आपला मनुष्यगण, अंधुक प्रकाशात काळीकुट्ट पिंपळाची एखादी दुसरी आकृती आणि आजूबाजूला टाकलेले उतारे म्हणजे स्मशानाचा भाग चालू झाला बहुतेक." थंडीपेक्षा असल्या एक ना अनेक विचारांनीच तो जास्त गारठला होता. हा स्मशानाचा भाग लवकरात लवकर कसा पार करता येईल आणि समोरच्या खांबावरील दिव्याच्या प्रकाशात सायकलची चेन लाऊन पटकन घर कसे गाठता येईल" म्हणून सदा 'राम राम' म्हणत झाप झाप पावले टाकू लागला. दूर स्मशान दिसायला लागले होते पण ‘तिकडे पहायचे नाही, पहायचे नाही’ असे स्वत:लाच बजावून देखीलहि एक नजर तिकडे गेलीच.
"अरे बापरे, यावेळेला चिता पेटलेली? अरे हो, संध्याकाळी उशीर होईल म्हणून केलेल्या फोन वर बायको म्हणाली होती कुलकर्ण्याचा म्हातारा दुपारी गेला. गेली सहा वर्षे अंथरुणावर काढली. अंगाची काडी झालेली पण तरी नव्वदी गाठली." त्याच्या चेहरा समोर येताच सदा थरारला. मनातले विचार झटकून त्याने नाइलाजाने दिव्याखाली सायकल थांबवली. खाली डोके करून लगबगीने चेन बसवायच्या प्रयत्नात असतानाच त्याला साद आली "सदा …" त्याने चमकून वर पाहिले. "आपल्याला भास झाला का? कि ….  ?"  . नाही नाही भासच असेल. दुर्लक्ष करु म्हणता म्हणता त्याची नजर स्मशानाकडे वळली  आणि सदा जागच्या जागी गोठला. चितेच्या प्रकाशात हातवारे करणारी आकृती पाहून त्याचा चेहरा पांढराफट्ट पडला. ओठातले रामनाम तर आधीच बंद झालेले. धुरात अधिकच विचित्र दिसणारा तो प्रकार आपल्याकडे सरकतोय असे त्याला वाटले. धडधड्णारे हृदय थरथरणाऱ्या हातांनी काबू करण्याचा प्रयत्न करीत सदा नकळत उभा राहिला. दुरून अस्पष्ट शब्द कानावर येत होते. '…… या …. खा …. माणसे …. " शेवटच्या शब्दाने मात्र सदाचा  धीर सुटला . सायकल तिथेच टाकून त्याने जी धूम ठोकली ते थेट घराच्या पायरीवरच येउन आदळला. धापा  टाकीत त्याने दार ठोठावले. हाक मारण्यासाठी तोंडातून आवाज फुटतच नव्हता. बायकोने दरवाजा उघडला कसाबसा आत येउन सदा तेथेच कोसळला. दरदरून घाम सुटला होता. अंग तापाने फणफणत होते. "नको… भूत … स्मशान …  खाणार… " तापात काहीतरी बरळत होता. त्याची हि अवस्था पाहून बायकोने डॉक्टरांना  फोन लावला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर रात्री उशिरा त्याची झोप लागली.
"सदानंद… अरे सदानंद… "सकाळी दिनकरच्या हाकेने सदाची झोपमोड झाली. बाहेर कसलातरी दंगा ऐकू येत होता
"बरे झाले आलात भाओजी" सदाची बायको दरवाजा उघडताच म्हणाली.
"हि सदाची सायकल ना? लाईटीच्या डांबाखाली पडलेली. कवरवर नाव बघून ओळखली. आणि घेऊन आलो. चेन पडल्या. बहुतेक चोर नेत असल पण चेन पडल्याने सोडून पळाला असल… बाकी बाहेर एवढा गलका चालू आहे आणि हा अजून झोपलाय ? … कुठे आहे सदानंद ?"
"अहो बघा ना.  कालपासून काय झालय यांना. कामावरून उशिरा आले. कसेतरीच करत होते. काहीबाही बरळत होते.  रात्रीपासून तापाने फणफणले आहेत नुसते."
"काय झाले सदानंद साहेब" खोलीच्या दारातून आत येत दिनकरने विचारले.
"सांगतो… " जरा त्रासलेल्या चेहऱ्यानेच सदा बोलला. "पण बाहेर हा गलका कसला चालू आहे सकाळपासून?"
"अरे नेहमीचेच रे. जाधवाचा विनू… त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय ना. सारखे चालूच असते.  त्याचीच काहीतरी गडबड आहे. सकाळी श्रीपती परसाकडे निघालेला. त्याला कुलकर्ण्याच्या चीतेपाशी हा विनू दिसला. काहीतरी भाजत होता. शेवटी वेडाच तो. काय करतोय विचारले तर म्हणला 'या …  रात्री नदीवरून मासे धरून आणलेत ताजे ताजे …भाजून ठेवलेत रात्रीच… खाणार का ?'. त्या कुलकर्ण्याच्या पोराला कळले तसा तराट धावत आला. आता पायतानाने पूजा चालू आहे त्याची… बर ते राहू दे …  तुला काय झाले ते सांग ""
दिनकरची शेवटची दोन वाक्ये सदाला ऐकूच गेली नाहीत. रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर पुन्हा यायला लागला … "…. या … खा … माणसे….  मासे…."
 
--- विशाल