Monday, July 17, 2017

भक्त

आकस्मिक नसे मीच ठरवून गेलो
तुला शोधतानाच हरवून गेलो

रीती जाहली ही कधी दानपात्रे
मुखी घास उष्टा मी भरवून गेलो

हिऱ्या माणकांच्या त्या झगमगत्या राती
दिपलो काजव्यापरी नि मिरवून गेलो

झाकला मी एक डोळा हासलो गाली जरासा
अखेरच्या श्वासातसुद्धा मृत्यूला चिडवून गेलो

अंतरे प्रस्थापितांची खडबडून जागृत झाली
कोंबडा उठलाच नव्हता, मी होतो... आरवून गेलो

पत्थरी देवास माझी समजली नाहीच भक्ती
तो बोलला मी फक्त त्याचे उंबरे झिजवून गेलो

-- विशाल (०३/०६/२०१७)

दुसरे काही

भासांना सहवास म्हणू कि दुसरे काही ...
आठवणींना त्रास म्हणू कि दुसरे काही

क्षणा क्षणाला मरण झेलूनी जिवंत आहे
ही जगण्याची फूस म्हणू की दुसरे काही

पुंडलिकासम दारावरती उभा विठोबा
वीट फेकुनी बैस म्हणू की दुसरे काही

कितीजणी सांगतात या जागेवर ताबा
ऐसपैस हृदयास म्हणू की दुसरे काही

नीतीच्या कुंपणात बंदी लाख श्वापदे
स्वतःस मी माणूस म्हणू की दुसरे काही

सुबक मांडणी शब्द बांधणी छंदामध्ये
कवितेला आरास म्हणू की दुसरे काही

कवी थोर पण कविता काही कळली नाही
खास म्हणू बकवास म्हणू की दुसरे काही

समुद्र मिळुनी घोटभराची तृषा ना शमली
याला नक्की विकास म्हणू की दुसरे काही

बलिदानाने दाटून आल्या आकाशाच्या
रंगाला तांबूस म्हणू की दुसरे काही

इथे तिथे अन तिथे असेल का दुसरे काही
आयुष्यभर हव्यास म्हणू की दुसरे काही

खिचडी केळी बर्फी आणि भगर संपली
एकादशीस उपवास म्हणू की दुसरे काही

दुसरे काही म्हणू कशाला मी कोणाला
दुसरे मीच स्वतःस म्हणू की दुसरे काही

--- विशाल (१७/०७/२०१७)