Tuesday, September 11, 2018

तुझे नाव

इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने
एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे

काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती
मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे

अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे
रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने

पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी
ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे

नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या
विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने

हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा
नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे

-- विशाल (११/०९/२०१८)

Monday, September 10, 2018

मिसकॉल

कितीतरी वेळ नुसता वाजत होता मिसकॉल
माझ्या फोनवरचा तुझा गाजत होता मिसकॉल

जातो जातो म्हणत किती माजला होता मिसकॉल
पण तुझ्याकडे येताना मात्र लाजला होता मिसकॉल

बोलण्यात नसलेली धार परजत होता मिसकॉल
पाच पाच मिनिटांनी पुन्हा गरजत होता मिसकॉल

मित्रांमधून तुला केलेला लपून होता मिसकॉल
कळत नकळत किती भावना जपून होता मिसकॉल

वाट पाहूनी जीव वेशीला टांगत होता मिसकॉल
मनामनाचे मनामनाला सांगत होता मिसकॉल

येऊन अचानक हृदयात घर करून राहिला मिसकॉल
फोनबरोबरच मनातूनही भरून वाहिला मिसकॉल

खळखळ सुंदर निर्झराप्रमाणे वहात होता मिसकॉल
अबोल्याच्या धीराचा अंत पहात होता मिसकॉल

काय झालं जर आज थोडा ओला होता मिसकॉल
मी न्हाणीघरात असताना तो केला होता मिसकॉल

माहीत नाही कुठलं देणं लागत होता मिसकॉल
माझ्यासोबत आठवणीत उगा जागत होता मिसकॉल

तुला भेटायचा एकमेव मार्ग ठरीत होता मिसकॉल
त्या मार्गावर मजला सोबत करीत होता मिसकॉल

-- विशाल (११/११/२००६)

Thursday, September 6, 2018

आसूड

इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले  
मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले

जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता
भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता 

स्वप्ने विषारी बिछाना दुधारी कुशी पालटून सरे रात्र जागी
कवडशामध्ये चांदण्याच्या पिशी थरारते कातडी ही अभागी

दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार
"तिळा तिळा" मी किती घोकतो हे उघडीत नाही तरीही कवाड

अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ?
पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका

मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा आसूड होतो 
चकोराप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो

-- विशाल (०६/०९/२०१८)