Wednesday, May 30, 2018

बेदरकार

तुटले बंध उघडले दार
वादळांवरी झालो स्वार
आता लगाम कसले यार
जिणं झालं बेदरकार

दिले सोडूनि फसलेले
स्वप्नामध्ये दिसलेले
हृदयामध्ये घुसलेले
अन अमुच्यावर हसलेले
फक्त स्वतःचा आता विचार
जिणं झालं ...

आता माझा मीच खरा
बुरेच सारे मीच बरा
पर्वतावरी जणू झरा
वा उनाड अवखळ वारा
सारे अडथळे करून पार
जिणं झालं ...

दिले तिला सोडून कधीचे
गेलो विसरून साफ आधीचे
निवडून काटे करवंदीचे
दंड बनविले त्या फांदीचे
त्या दंडाचे सहून प्रहार
जिणं झालं ...

-विशाल (१०/१२/२००७)

तू गेल्यापासून

शब्दही ना अस्फुटसा या मुखात आलेला
कर अजून वार ऊरी जीव नाही गेलेला

आठवणींना उराशी बांधून मी जगलेलो
अखेरीला साथ राहण्याचा वाद केलेला

ओढूनिया सहज तुटे हा नव्हे असा बंध
दाव तरी जोर किती तू उसना आणलेला

जाणूनिया जग सारे ठेवली ना जाण माझी
हे ही जाणले मी नाही मी किती अजाणलेला

तुकड्यांना हृदयाच्या दोष देती सर्व आता
तुटण्या आधीच का ना कोणी त्यास बोललेला

बरसत आहे अजून सर या नयनामधून
अन गेल्यापासून तू समुद्रही उधणालेला

-विशाल (१५/१२/२००७)

Wednesday, May 23, 2018

पिंपळपान

आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू
मग फुलांनी केलेला अपमान शोधू

दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची
अन्यथा रामायणात अज्ञान शोधू

सोसेना गलका सभोवती शांततेचा
दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू

बोलण्या आधीच सुरू होती लढाया
ऐकूनी घेतील असले कान शोधू

प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन
भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू

आदेश हा कारागृहे खुली करण्याचा
पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू

शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा
थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू

शिव्या शाप जरी रोजचेच ठरलेले
नशिबातील एखादे समाधान शोधू

खंत नको कालची वा तमा उद्याची
खुल्या बाहूंनी जगू.. वर्तमान शोधू

रात्र बाकी ये पुन्हा हरवून जावू
पहाटे माझे तुझे देहभान शोधू

अटळ प्रलय आहे हा विशाल तर
अवघे विश्व तराया पिंपळपान शोधू

-विशाल (२१/०५/२०१८)

Tuesday, May 15, 2018

तुझ्यात माझ्यात

घडले जे ते घडून गेले
अन घडणारे घडू दे सुंदर
तुझ्यात माझ्यात

काही भावना गोड कितीतरी
काही समजुती जरा कलंदर
तुझ्यात माझ्यात

कशास आता विचार त्याचा
नशिबात जे होईल नंतर
तुझ्यात माझ्यात

दुरुनही तू सोबत देते
मंतरलेले विशाल अंतर
तुझ्यात माझ्यात

रेशीमबंध अभंग अखंड
वाट असू दे कितीही खडतर
तुझ्यात माझ्यात

बघ जरा कुणी खडा मारला
उचलला अन कुणी लगेच फत्तर
तुझ्यात माझ्यात

सवाल हा जो खडा जाहला
कुणाकडे गं त्याचे उत्तर
तुझ्यात माझ्यात

असू देत ना फरक काय तो
काय चुकीचे किती बरोबर
तुझ्यात माझ्यात

दोघे चालू असेच भांडत
मी 'हो' म्हणतो तू 'ना ना' कर
तुझ्यात माझ्यात

-विशाल (०८/०३/२००८)

Tuesday, May 8, 2018

याचाच राग आला

याचाच राग आला याचाच राग आला

हरलो मी तेव्हा सारी चूक माझीच होती
जिंकलो तेव्हा त्यात नशिबाचा भाग आला
याचाच राग आला

थोडा तुझ्या कलाने मी वागावयास गेलो
माझ्या रितेपणावर प्रेमाचा डाग आला
याचाच राग आला

ना घडीचा भरवसा तरी बातमी उद्याची
तू सांगतोस तुजला कसला दिमाख आला
याचाच राग आला

शैशव हे अजूनही सरले ना पुरेसे
पाहिली ना जवानी तोवर विराग आला
याचाच राग आला

चुपचाप ऐकले मी त्यांचे रटाळ भाषण
माझ्या न बोलण्याचा त्यांस वैताग आला
याचाच राग आला

ते भांडखोर खासे सोडून ताळतंत्र
नि माझ्या विशेषणाला म्हणती कजाग आला
याचाच राग आला

पापी आम्ही दुरात्मे कधी मंदिरी न गेलो
तो पुण्यवान करुनि काशी प्रयाग आला
याचाच राग आला

झिडकारले जरी तू पाहून ओठी हासू
हा मोहरून माझ्या मनी फुलबाग आला
याचाच राग आला

ठिणगी ती कोणती जी तू टाकली उरात
भैरवीस आळवता ओठी दिपराग आला
याचाच राग आला

- विशाल (०८/०५/२००८)

तू म्हणसी तैसे

तू म्हणसी तैसे सरले जर का
दोघांमधले नाते
का कविता हातून होते ?

तू म्हणसी तैसे कथा आपली
तिथेच जर संपली
का नदी नाही थांबली ?

तू म्हणसी तैसे विसरलीस जर
तू झाले गेलेले
का मेघ भरून आलेले ?

तू म्हणसी तैसे पाहून आरसा
तुला न आली लाज
का इथे कडाडे वीज ?

तू म्हणसी तैसे जर जमला नाही
एकही अश्रू नयनी
का भिजली सारी धरणी ?

तू म्हणसी तैसे या प्रश्नाचे
जर उत्तर तुजला ठावे
का तू न मला भेटावे ?

तू म्हणसी तैसे जर का याचे
तुजकडे उत्तर नाही
का दूर तू सांग अजूनही ?

तू म्हणसी तैसे पुन्हा भेटीचा
तुला नाही विश्वास
का चालू माझा श्वास ?

- विशाल (०३/०६/२००८)

लिखाण

इतरांस जरा अंजान लिहिला होता
पण शेर तसा बेभान लिहिला होता

कुठे ऐकली? कधी? फुलांची गाथा
(मी लिहिताना तर प्राण लिहिला होता)

अर्थ समजून तू केलीस वाहवाही
(जाणूनबुजून आसान लिहिला होता)

आरोप जाहला पक्षपाताचा जरी
मी एकजातच समान लिहिला होता

बोधप्रद म्हणू कसे हे आत्मचरित्र
मी तर माझा अपमान लिहिला होता

बदनाम करून जाळला जयांनी लेख
नंतर ते वदले छान लिहिला होता
- विशाल (२९/०६/२००८)

Monday, May 7, 2018

गोंधळ

रंगतात चर्चा चौघीजणीत माझ्या
का तू अजूनही आठवणीत माझ्या

सरी दुःखाच्या पुरत्या ओसरल्या कोठे
गळतो मी रोज वळचणीत माझ्या

गझला नि लावण्या दिल्या मी किती तुला
हाती निदान दे तू सुनीत माझ्या

लोक मला बोलती शांततेचा पुजारी
मनात आत चालू गोंधळ नित माझ्या

मदतीचा हात दिला ज्यांना, त्यांनीच आज
तोंडे हो फिरवली अडचणीत माझ्या

वार्षिकेत प्रगतीच्या नको सोडू वाफा
पास तरी हो आधी चाचणीत माझ्या

तहानल्या जीवाची हाक ऐकली आणि
पाणी ओतले त्यांनी चाळणीत माझ्या

घामाचे पीक माझे कापून नेले कोणी
उरला कडबाच फक्त कापणीत माझ्या

मराठी, कला, शास्त्रे घेऊनि गेलो पुढे
का हे आले मागे बीजगणित माझ्या

शरण जाऊनि जीवाचे दान मिळविले पहा
राहिलो मी एकटाच छावणीत माझ्या

विरहाच्या अश्रूंचा पुर ओसरून गेला
आता तुझा निवास पापणीत माझ्या

दाग दागिने वस्त्रे ओरबाडूनी नेली
नेले पण मला न कोणी वाटणीत माझ्या

करण्या पापे भस्म होईल ज्याचा वणवा
निखारा असे कुठे तो अग्नीत माझ्या

कितीच खून पाडले । जिंकल्या किती लढाया
बळ सहस्त्र समशेरींचे लेखणीत माझ्या

दंश करणारा आता मी सर्प कुठे शोधू
मी साप पाळतोय अस्तनीत माझ्या

शब्दगंध नसे ज्यांना तेच बरळले पुढे
"कविता झाली नाही धाटणीत माझ्या"
- विशाल (२७/०५/२००८)

Friday, May 4, 2018

सांज

सांज स्वर्ण गात्रांची दरवळ
सांज धुंद प्रणयाची हिरवळ
सांजेमध्ये मने गुलाबी
सांज तरी का सावळ सावळ

सांज जीवाला लावून हुरहूर
सांज मनातून उठवून काहूर
सांज रात्रीची असून सुरावट
सांज कधीच ना बेसूर भेसूर

सांज ओंजळीत भरून घ्यावी
सांज थेंबथेंबांनी प्यावी
सांज सयीतून छळे तनुला
सांज कस्तुरी औषध लावी

सांज कधीतरी खवळून रक्त
सांज कधीतरी शांतचित्त
सांज धरे हर रूप आगळे
सांज आरक्त नि सांज विरक्त

सांजेवर विरहाची छाया
सांज समीप आणते प्रिया
सांज कशी हो अपराधी
सांज सजा की सांज दया

-विशाल (१७/०३/२०१०)

खरी वाटते पूरी वाटते

खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते

भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये
क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते

हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण
हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते

सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा
तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते

तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही
काय करू मी? हाय! तुझ्याहून याद तुझी कस्तुरी वाटते

सखे आज तू मला तुझे नि गगनाचे या नाते सांग
कशी तुझ्यासोबत असताना , सांज अजून सिंदूरी वाटते

कानामध्ये रुंजी घालत आहे अजून होकार तुझा
आता वाजू दे काही मजला ती कृष्णाची बासुरी वाटते

काय तुझी एकेक अदा.. जग होय फिदा त्यावरी परी
हृदयतोडीतील सहजपणाची अदा थोडीशी बुरी वाटते

-विशाल (०७/११/२००९)