Sunday, June 9, 2013

आई


आकाश उतरता खाली
अस्तित्व नष्ट कराया
मी हळूच पांघरून घेतो
आईची हळवी माया

ती पैलावरती माया
ऐलावर होते रात
ठेवता उशीवर डोके
केसातून फिरतो हात

का डोळ्यामध्ये आसू
का अंतर्मन व्याकूळ
गगनात भारली प्रतिमा
अस्पष्ट करतसे धूळ

झाकल्या पदराखाली
आयुष्याचे कोंदण
आईच्या हातावरती
एक पिंडीचे गोंदण

हातात चंद्र धरून
स्वप्नात भेटते आई
घेऊन कुशीत मजला
गाते अजूनही अंगाई

--- विशाल


अदृश्य मिठी

पाउस थेंब थेंबाने
पानावरुनी ओघळतो
अस्तित्व उदासीन माझे
आज झुगारून देतो

कोसळत्या धारातून
क्षितिजावर दिसे न काही
अंतरात डोकावुनी
भिजलेला सूर आठवतो

ओला रस्ता ओले मन
ओली सांज प्रेमही ओले
रुततात जीवाला ओल्या
चिमणीचे व्याकुळ डोळे

सरतात मुक्याने आता
नात्यांचे दंश विषारी
त्या नाग घळीतून रात्री
फुत्कार निनावी घुमतो

एकाकी रात्र आताशा
मळभाची घेऊन चादर
सत्याला स्वप्न म्हणून
अदृश्य मिठीत मी शिरतो

--- विशाल



Saturday, June 8, 2013

सजलेल्या मौसमाची चढलेली धुंदी
कोसळत्या पावसाची आहे रजामंदी
पण
बांधलेले हात माझे, हुकलेली संधी
चिंब तू समोर, मला पहायची बंदी