Wednesday, April 25, 2012

तव नयनांचे दल

तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी 
त्रिभुवन हे डळमळले गं || धृ ||

तारे गळले वारे ढळले 
दिग्गज पंचाननसे वळले 
गिरी ढासळले सूर कोसळले 
ऋषी मुनी योगी चळले गं || १ ||

ऋतुचक्राचे आस उडाले 
आभाळातून शब्द निघाले 
आवर आवर आपुले भाले 
मीन जळी तळमळले गं || २ ||

हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला भिडली 
दोन हृदयांची किमया घडली 
पुनरपि जग सावरले गं || ३ ||

---- बा भ बोरकर 

Tuesday, April 17, 2012

हाल-ए-दिल तुझ्याशी बोललो तरी पण ,
तुला किती कळाले  .. गोष्ट ही निराळी ..
--- विशाल 

Thursday, April 5, 2012

जगायास तेव्हा खरा अर्थ होता

जगायास तेव्हा खरा अर्थ होता 
निरर्थासही अर्थ भेटायचे ,
मनासारखा अर्थ लागायचा अन 
मनासारखे शब्दही यायचे ...

नदीसागराचे किनारे कधीही 
मुक्याने किती वेळ बोलायचे ,
निघोनी घरी शेवटी जात असता 
वळूनी कितीदा तरी पहायचे ...

उदासी जराशी गुलाबीच होती 
गुलाबातही दु:ख दाटायचे ,
जरा एक तारा कुठेही निखळता
नभाला किती खिन्न वाटायचे ...

असेही दिवस कि उन्हाच्या झळांनी 
जुने पावसाळे नवे व्हायचे ,
ऋतूंना ऋतूंनी जरा भागले कि 
नव्याने जुने झाड उगवायचे ...

मनाचा किती खोल काळोख होता 
किती काजवे त्यात चमकायचे ,
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही 
मनाला किती शुभ्र वाटायचे ...

आता सांजवेळी निघोनी घरातून 
दिशाहीन होऊन चालायचे ,
आता पाऊलेही दुखू लागली कि 
जरा मीच त्यांना उरी घ्यायचे ...

जगायास तेव्हा खरा अर्थ होता 
निरर्थासही अर्थ भेटायचे ...

--- सौमित्र (किशोर कदम)

Sunday, April 1, 2012

संधीप्रकाशात

आयुष्याची आता | झाली उजवण |
येतो तो तो क्षण | अमृताचा ||

जे जे भेट ते ते | दर्पणीचे बिंब |
तुझे प्रतिबिंब | लाडे गोडे ||

सुखोत्सवे असा | जीव अनावर |
पिंज-याचे दार | उघडावे ||

संधीप्रकाशात | अजून जो सोने |
तो माझी लोचने | मिटू यावी ||

असावीस पास | जसा स्वप्नभास |
जीवी कासावीस | झाल्याविना ||

तेव्हा सखे आण | तुळशीचे पान |
तुझ्या घरी वाण | नाही त्याची ||

तूच ओढलेले | त्यासवे दे पाणी |
थोर ना त्याहुनी | तीर्थ दुजे || 

वाळल्या ओठा दे | निरोपाचे फूल |
भूलीतली भूल | शेवटली ||

--- बा भ बोरकर 
आठवणींचा त्रास होतो.. पण यात तुझा तरी काय दोष गं...
देवानेच जगात प्रत्येकाला ज्याची त्याची कामे वाटून दिली आहेत ना..
तुला छळण्याचं...
नि मला...
...
...
जळण्याचं
--- विशाल