Showing posts with label मी म्हणतो ... Show all posts
Showing posts with label मी म्हणतो ... Show all posts

Tuesday, August 4, 2020

भय इथले संपत नाही

       भय इथले संपत नाही

       मज तुझी आठवण येते

असे ऐकले आहे, की कवी ग्रेस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना त्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकरांना एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी या अजरामर ओळी लिहिल्या होत्या. "आज या हॉस्पिटलच्या एका छोट्या खोलीत मी एकटाच बसलो आहे, आजूबाजूला पांढऱ्या भिंती आणि मध्ये मध्ये सोडलेले हिरवे पडदे. इथे मला मी निसर्गाच्या फार जवळ असल्याचा भास होतोय. कधी ना कधी मृत्यू येणार हे अटळ सत्य मी मनात अगदी ठसवले आहे. त्यामुळे अशावेळी मला खरेतर फार शांत वाटायला हवे. असा एकांत.. अशी शांतता.. सगळे कमावून आयुष्याची उत्तरयात्रा चालू केलेल्या एखाद्या कवीला, एखाद्या लेखकाला अजून काय हवं ? खरेतर अशा जागी कसल्याही भीतीचा लवलेशही दूरदूरवर दिसत कामा नये. पण नाही. हे हवंहवंसं वातावरण असलं तरी मन स्वस्थ नाहीये. काहीतरी सलतंय.. आत.. खोल.. माहित नाही काय? माहित नाही का? पण भय इथले संपत नाही"

 खऱ्या अर्थाने शाश्वत सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ म्हणण्यासारख्या या ओळी - भय इथले संपत नाही. पाहायला गेले तर या चार शब्दात काही विशेष, छुपा, अगम्य अर्थ वगैरे असे काहीच नाहीपण तरी या जगातील मन नावाचा दृगोचर अवयव असलेल्या प्रत्येक सजीवाला लागू होईल असे हे शाश्वत सत्य. भय इथले संपत नाही. केवळ भीती नाही, तर संपणारी भीती. मनुष्य स्वभावानुसार अप्रिय गोष्टीपासून आपण नेहमीच दूर राहायचा प्रयत्न करतो. एकदा ती गोष्ट आपल्यापासून दूर झाली, नष्ट झाली, संपली कि आपण तणावमुक्त होऊआपल्याला आनंद होईल, सुख मिळेल असे सतत वाटत असते. पण या सर्वांसोबत ती गोष्ट दूर गेलीच नाही, संपलीच नाही तर? याची अनामिक भीती मनात असतेच. मिळेल कि नाही? जमेल कि नाही? येईल कि नाही? जाईल कि नाही? अशा एक अनेक भयांचं ओझं सतत पाठीवर घेऊन आपण वावरत असतो. एक गेले कि दुसरे, ते झाले कि तिसरे, हि भयाची शृंखला कधीच खंडित होत नाही. धनिकाला धन जाण्याचं भय, भिकाऱ्याला रात्रीच्या खाण्याचं भय, वांझेला पुत्र न होण्याचं भय आणि सपुत्रिकाला मुलानं सांभाळण्याचं भय, अपयशाचं भय, प्रेयसीच्या विरहाचं भय, तरुणाला वार्धक्याचं भय तर म्हाताऱ्याला मरणाचं भय. प्रत्येकाच्या मनात सतत ठाण मांडून कसले ना कसलेतरी भय. 

बहुरूपी बहुकल्पी अशा मूर्त भयांसाठी जगात उपाय आहे आणि उपाय नसेल तर दोष द्यायला नशिब आहेच. पण कवीने उल्लेख केलेलं भय ते हे नाही. ते अदृश्य आहे, अमूर्त आहे, अक्षय आहे, कधी न संपणारं आहे . अगदी जीवघेणं नसलं तरी जगूही न देणारं भय. सतत जाणवणारं पण स्वतःच स्वतःलाही ना कळणारं .  दिनरहाटीच्या कामात ज्याने त्याने जमेल तसा प्रयत्न करून त्याला कितीही खोल गाडले, तरी प्रत्येक एकाकी क्षणाला न चुकता उसळी मारून वर येणारं.   

आणि त्यासोबत समोर येणारा तो चेहरा - मज तुझी आठवण येते. भय तर न संपणारं आहे पण ते टाळण्यासाठीच्या प्रयत्नात माहित नाही का पण तुझी आठवण  येते. तू कोण ? आई ? बायको ? मित्र ? प्रेयसी ? कि भगवंत ? ज्याचे त्यालाच माहीत. पण खरेच "तू कोण" याने फरक पडतो का? तू कोणीही असले, पण या भयाने, या भीतीने व्यापलेल्या माझ्या मनात, जिथे दुसऱ्या कशालाच यायला वाव नाही, तिथे अचानक तुझी आठवण येते. कशी? का? याचे उत्तर मिळत नाही. पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार तसे तुझ्या आठवणीला घेऊन मी धडपडण्याचा प्रयत्न करतो, अज्ञाताशी डाव मांडायची हिम्मत करतो. माझा एकाकीपणा हीच त्या भयाची ताकद आहे आणि तुझी आठवण आल्यावर ते आपोआप क्षीण व्हायला हवे. हो ना? पण नाही.. तुझी आठवण येताना पुन्हा नव्या भयाला सोबत आणते.  हि आठवण नेहमी अशीच येईल का? नाही आली तर ? आणि पुन्हा मी ह्या माझ्या न संपणाऱ्या भयाच्या आणि तुझ्या सतत येणाऱ्या आठवणींच्या चक्रात सापडतो . वर्तुळाला कधी आदी अंत असतो का?  

म्हणून 'निर्भय' हि केवळ नाममात्र संज्ञा उरते. जगात निर्भय असे कोणीच नाही. सगळ्या भयांना टाळून संपवून अगदी मोक्षप्रद जागी बसले आणि तुझी आठवण आली कि पुन्हा या भयडोहात ओढले जाणे निश्चित आहे. आणि म्हणून हे भय संपणार नाही कारण भय संपले तर तुझी आठवण येणार नाही याचे भय आहेच. मी म्हंटले ना, हे वर्तुळ आहे. भयात तुझी आठवण आली काय किंवा  तुझ्या न आलेल्या आठवणींचे भय काय ? त्यामुळे कवीच्या या दोन्ही ओळी, आपल्याला एका कधी न संपणाऱ्या, अगणिताच्या चकव्यात अडकवतात. यातून कोणालाच बाहेर येणे शक्य नाही आणि म्हणूनच हे शाश्वत सत्य आहे.

                                                                                 मज तुझी आठवण येते 

                                                                                 भय इथले संपत नाही  


-- विशाल (०४/०८/२०२०)  

Thursday, June 6, 2019

उबदार पाऊस

तुझी आठवण येते
आणि एखादा ढग रेंगाळतो माझ्या घराच्या छपरावर
मग मी माझे सारे अश्रू भरतो त्या ढगाच्या पिगीबँकमध्ये
कधी दोन कधी चार ..
.
.
साठवणूक वाढेल तसा जड होऊन तो ढग आता खाली यायला लागला आहे
काही दिवसांनी पावसाळा येईल, आकाश दाटेल, वारा सुटेल
त्यावेळी पाठवीन माझे संचित तुझ्या घराकडे
.
.
मला माहित आहे तुला पहिल्या पावसात भिजायला आवडते..
मातीचा गंध सुटला की गच्चीत जाशील..
तेव्हा कदाचित तुझ्या अंगावर बरसलेला पहिला थेंब मीच असेन..
.
.
बघ यावेळचा पहिला पाऊस उबदार असेल..

विशाल (०७/०६/२०१९)

Tuesday, June 4, 2019

स्मशान

माझ्या घराकडून..
तुझ्या घराकडे येण्याच्या वाटेवर
मधेच एक स्मशान लागते..

छान जागा आहे.. शांत.. तुझी वाट पाहण्यासाठी...

आयुष्यभर...

युगानुयुगे...

- विशाल (०४/०६/२०१९)

Tuesday, November 22, 2016

एखाद्या अन्नपूर्णेच्या हातातून भाजीत उतरणारी चव अगदी शेवटच्या थेंबापर्यंत चाखता यावी म्हणून बोटे चाटूनपुसून स्वच्छ करण्यातली गम्मत ... हात खराब होऊ नये म्हणून एका हातात चपातीचा तुकडा घेऊन दुसऱ्या हातातील चमच्याने त्यावर अलगद भाजी ठेवणाऱ्या आणि भातात वरण/आमटी/रस्सा टाकून तो हाताने कालवण्याऐवजी चमच्याने वरचेवर हलवून खाणाऱ्याला कधीच समजणारच नाही ...
(मेस मध्ये समोरच्या व्यक्तीला असे खाताना पाहिले कि हसावे कि हळहळावे तेच समजत नाही)

विशाल (२३. ११. २०१२, ठाणे)

Wednesday, September 9, 2015

सारेगमप मपधनिसा


गणेशोत्सवात हल्ली गणपतीची सिनेमाच्या तालावरची फुटकळ गाणी ऐकली कि मला अजूनही तिच्या त्या गाण्याची आठवण येते. २५ वर्षे झाली तरी अज्जिबात पुसट झालेल्या त्या सुरात काय जादू होती काय माहित. प्राथमिक शाळेचा वर्ग भरलेला असायचा. १० ते ची शाळेची वेळ असायची. अभ्यासाचे विषय पर्यंत संपवून एक तासात बाई अभ्यासेतर गोष्टी करून घ्यायच्या. (त्यावेळी madam म्हणायची पद्धत निदान मराठी शाळांमध्ये तरी चालू व्हायची होती.)  त्यात प्रामुख्याने अथर्वशीर्ष , रामरक्षा, मनाचे श्लोक असायचे. उरलेल्या वेळात गोष्टी, विनोद, कोडी, सामुहिक कविता, वक्तृत्व किंवा गाणी असायची. अर्धवट लक्ष त्याकडे आणि अर्धवट लक्ष बाहेरच्या घंटेकडे आणि न्यायला आलेल्या पालकांकडे असायचे आणि अशातच तिचे ते गाणे चालू व्हायचे -

"सारेगमप मपधनिसा,
मंत्रमुग्ध अवतार मंत्रमुग्ध अवतार …. "

त्यावेळी पडद्यावरचे गाणे जुही किंवा माधुरी म्हणते अशी आमची दाट समजूत होती आणि लता आणि आशा या शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका आहेत असा गैरसमजही होता. गाणे नाचणे संगीत हे मुलींचे कार्यक्षेत्र असे वाटायचे. त्यामुळे त्यात त्यावेळी जास्त रस घेत नसलो तरी वर्गातील एकमेव गायिका आणि शिवाय पुढे उभे राहून बिनधास्त गाणे म्हणते म्हणजे नक्की मोठेपणी सिनेमात हिरोइन होणार असेही मनात यायचे. असो पण तरी तिने सूर लावला कि आपोआप डोक्यात त्याचे संगीत सुरु व्हायचे

"कऱ्हा नदीच्या तीरावरती घे गजमुख अवतार" ह्या ओळीनंतर चे "घे गजमुख अवतार घे गजमुख अवतार" हा कोरस  ती स्वताच म्हणायची नि श्वासात जराही खंड पडता पुढे "दुमदुमे ता था तै तत्कार नाचतो शिवनंदन सुकुमारमयुरेश हा रणी प्रकटला मावळला अंधार" हे कडवे संपून पुन्हा "सारेगमप मपधनिसा" चालू व्हायचे तेव्हा तर अगदी मंत्रमुग्ध होऊन जायचो. आणि शेवटी "गोसावीसुत मोरयाचा झाला जयजयकारम्हणल्यानंतरचे त्या विशिष्ट लयीतले "मंगलमुर्ती मोरया" घरी पोचेपर्यंत ओठांवर रुळलेले असायचे

त्यावेळी या शब्दांचे अर्थ हि माहित नव्हते. लय ताल सप्तसूर आलाप  इतकेच काय तर या गाण्याची मूळ गायिका लता / उषा मंगेशकर आहे आणि अष्टविनायका मधील मयुरेश्वरावर हे गाणे लिहिले आहे हे कळायला पुढच्या दहा वर्षाचा काळ उलटावा लागला. नंतर शाळा बदलल्या संपर्क लोप पावले (असेही त्यावेळी तरी कुठे मुलींशी फार बोलायला जमायचे म्हणा ) पण अजूनही गणपती म्हणले कि पहिले गाणे आठवते ते हेच आणि कानात आवाज घुमतो तिचाच.

(गीताचे बोल लिहिताना काही चुकले असल्यास क्षमस्व.)

तिच्यापर्यंत हा लेख पोचेल तिला सगळे आठवेल इतर वर्गमित्रांना काही आठवेल याबाबत तशी शंकाच आहे. पण बालपणीच्या या सुंदर आठवणीसाठी तिला या लेखाद्वारे धन्यवाद म्हणावेत यासाठीच हा प्रपंच

--- विशाल

Friday, November 30, 2012

'लोचा' आणि 'गोची' अशी नावे असणाऱ्या मुलांच्या वडिलांनी या नावाचे रहस्य शेवटी सांगितले ते असे..
"खरेतर यांच्या आईशी मला लग्नच करायचे नव्हते पण तिला दिवस गेले त्यामुळे माझी मोठी 'गोची' झाली ..
आणि मी दोन वर्ष घरापासून दूर असताना तिला पुन्हा दिवस गेले .. त्याच दरम्यान हा 'लोचा' झाला असावा ..."
---- joke created by विशाल जिरंगे 

Wednesday, October 24, 2012

 मला जेव्हा जेव्हा वाटायला लागते कि "i m perfect" तेव्हा तेव्हा तो अशी परिस्थिती निर्माण करतो जेणेकरून मला जाणीव व्हावी "NO ! u r NOT ",
आणि लोक समजतात चुका मी करतो.
---- विशाल

Tuesday, October 23, 2012

उकळलेल्या पाण्याला चहा आणि निथळलेल्या स्पर्शाला प्रेम म्हणणाऱ्याच्या संसारात वाद कधीच होत नाही.. पण म्हणून त्याला सुखी म्हणायचे का ?
--- विशाल