Wednesday, June 19, 2019

फुलांचा बेत

देणे सुगंध, जोवर निर्माल्य होत नाही
बाकी तसा फुलांचा विशेष बेत नाही

तिची कट्यार आहे छातीत रुतून किंचित
जी आत जात नाही बाहेर येत नाही

तोडून बंध कुठल्या चकव्यात पाडले तू
रस्ता तुझ्याकडे मज कुठलाच नेत नाही

मीही कधी न त्यांच्या गर्दीत झालो सामील
त्यांनी कधीच मजला धरले जमेत नाही

कुठला धरू पुरावा तोडू कसा भरवसा
तुकडेच हे चितेवर अखंड प्रेत नाही

कर्जात शेत आमुचे लाटालही परंतु
रक्तातूनी मरेतो जाणार शेत नाही

आता जगास देऊ कुठला नवा बहाणा
तीही कवेत नाही... मीही नशेत नाही..

- विशाल (१९/०६/२०१९)

Saturday, June 8, 2019

धुळीची गोष्ट

सोसाट्याचा वारा आला
धूळ उडाली हवेत
पण येणे ठरलेले
याच भूमीच्या कवेत

धूळ आसमानी गेली
ढगासोबत मिळाली
झाला जोराचा पाऊस
सारी बंधने गळाली

वीज कडाडली मोठी
आला काळोख दाटून
जड होऊन आताशा
गेला ढगही फाटून

ढगा धूळ पेलवेना
दिले सोडून धुळीला
दंभ ढोंग त्या ढगाचे
आता कळले धुळीला

धूळ धरेवर आली
आसवांचा पूर झाला
मातीनेच दिला आसरा
ढग जेव्हा दूर पळाला

- विशाल (१९/०५/२००५)

एक आणखी प्याला

खाली झाला प्याला साकी
भर पुन्हा एकवार जाम
धुंदीत याच्या बुडल्यानंतर
होतील दुःखे सारी तमाम

विसरू दे आता जगाला
बुडवू दे मदिरेत त्याला
विसरतो मीही स्वतःला
पिऊन आणखी एक प्याला

जाणिवांच्या अक्षरावर
पसरू दे स्याही नशेची
रात्र सरो प्याल्यात अशी की
नको ती जुनी याद कशाची

आजच्याच या रात्रीसाठी
उठू दे सारी दारूबंदी
तुझ्या नशिल्या नयनामधुनी
वाढू दे प्याल्यातील धुंदी

जड जाहले नेत्र तरीही
आहे तुझीच मूर्ती समोर
ये जवळ ये पुन्हा आणिक
अखेरचा हा प्याला भर

- विशाल (०२/१२/२००५)

Thursday, June 6, 2019

उबदार पाऊस

तुझी आठवण येते
आणि एखादा ढग रेंगाळतो माझ्या घराच्या छपरावर
मग मी माझे सारे अश्रू भरतो त्या ढगाच्या पिगीबँकमध्ये
कधी दोन कधी चार ..
.
.
साठवणूक वाढेल तसा जड होऊन तो ढग आता खाली यायला लागला आहे
काही दिवसांनी पावसाळा येईल, आकाश दाटेल, वारा सुटेल
त्यावेळी पाठवीन माझे संचित तुझ्या घराकडे
.
.
मला माहित आहे तुला पहिल्या पावसात भिजायला आवडते..
मातीचा गंध सुटला की गच्चीत जाशील..
तेव्हा कदाचित तुझ्या अंगावर बरसलेला पहिला थेंब मीच असेन..
.
.
बघ यावेळचा पहिला पाऊस उबदार असेल..

विशाल (०७/०६/२०१९)

Tuesday, June 4, 2019

स्मशान

माझ्या घराकडून..
तुझ्या घराकडे येण्याच्या वाटेवर
मधेच एक स्मशान लागते..

छान जागा आहे.. शांत.. तुझी वाट पाहण्यासाठी...

आयुष्यभर...

युगानुयुगे...

- विशाल (०४/०६/२०१९)