Wednesday, March 30, 2011

मन भरकटलेले दूर

मन भरकटलेले दूर 
सावरण्या ती ही नव्हती 
स्मरणांची सर झरताना 
सागरा यायची भरती

मी पहायचो क्षितिजाला 
नावेच्या कोनाड्यातून 
माझ्याच हृदयामधला
मी तरंग पाण्यावरती 

आकाश प्यायचे लाली 
सोबती सांज गाणारी 
भगवी एक सुरावट 
ओठात ओघळत होती 

तीज फितूर का हा वारा ?
अस्वस्थ होऊनी फिरता 
मीच मनातून चंचल 
माझीच मला ना गणती 

मिटताच पापणी ओली
थेंबात साचला दर्या 
जपलेले स्वप्न अपुरे 
बुबुळात लावूनी पणती

क्षण सरते, ढळता सूर्य 
उरलेलो मी ही जरासा 
पाण्यावर आता केवळ 
अंधुकशी छाया विरती 
----- विशाल