Saturday, November 27, 2010
रस्सीखेच
रक्ताळल्या हातांचे सांगणे हेच आता
मी घेतलेत काटे तू फुले वेच आता
याच्यात प्राण नाही त्यालाही कान नाही
सारी मुखे पहातो मी मुक्यानेच आता
प्यादे पळून गेले फासे झिजून गेले
डाव चल उभारू हा नव्यानेच आता
आम्ही कधी न केले कोणास दार बंद
ये वारीयासवेने सारे खुलेच आता
उपमा नवीन शोधा आता जनावरांना
आहेत हिंस्त्र झाली हि माणसेच आता
निवडून कोण आला खड्ड्यात त्यास घाला
मंत्री कुठे धनाचे ते बाहुलेच आता
दरवाढ पृथ्वीवरी स्वर्गात नाही जागा
नरकात सूट आहे जावे तिथेच आता
फेडूनिया कटीचे माथ्यास बांधलेले
कर 'डोळेझाक' दुनिये 'ते' नागवेच आता
उस्फुर्तला कवी नि प्रतिभेस पूर आला
उतरती शब्द पानी हे ओळीनेच आता
हासला विदुषक पाहून आसवे का ?
कि भासती मुखवटे चेहरेच आता
ओठात तुझ्या काही अर्थात काही बाही
होती सवाल सारी का उत्तरेच आता ?
या क्षणी पास येशी त्या क्षणी दूर जाशी
अर्थ काय याचा ? ( मज नवा 'पेच' आता )
शब्दांसवे असा का तू खेळशी 'विशाला'
झाली पुरे रोख ना हि 'रस्सीखेच' आता
------विशाल
Friday, November 26, 2010
निर्वाणीच्या क्षणामध्ये
निर्वाणीच्या क्षणामध्ये हे भडकून उठले बाहू
आम्ही निघालो कोण आडवे येतो आता पाहू
असेल हिम्मत तर दाखवा वाट आमची अडवून
बांधून ठेवा , डांबून ठेवा , ठेवा अथवा गुंतवून
मोहमायेचा पाश एकही उपयोगी पडणार नाही
निघून गेलो कधी तुम्हातून, तुम्हासही कळणार नाही
रडतील खडतील पडतील थोडे आसू आमुच्यासाठी
जेव्हा होईल कलेवराची राख नदीच्या काठी
शांतही होतील लगेच आमचा विझण्याआधी जाळ
विसरून जातील पुन्हा हळू हळू सरेल जैसा काळ
बनून तारका नभामधुनी लक्ष ठेउनी राहू
पण या समयाला कोण आडवे येतो आता पाहू
------- विशाल
Wednesday, November 24, 2010
Tuesday, November 23, 2010
ती आहे ... तिथेच आहे ...
ती आहे ...
तिथेच आहे ...
मी फिरतो इकडे तिकडे
मेंदूचे पडती तुकडे ....
ती आहे ...
तिथेच आहे ...
मी उगाच करतो त्रागा
नाही होत रिकामी
पण तिच्याजवळची जागा ....
ती आहे ...
तिथेच आहे ...
मीच जो वेगळा पडतो
ती अस्खलित जातीची
मी शब्दशब्दास अडतो ...
ती आहे ...
तिथेच आहे ...
मज तरीही येतो राग
सांगावे कसे तिला हे
कि जरा वेगळे वाग...
ती आहे ...
तिथेच आहे ...
मज ठाऊक खूप शहाणी
हसते गालात हळूच
ओळखून माझी कहाणी ...
ती आहे ...
तिथेच आहे ...
---- विशाल
Thursday, November 18, 2010
मुंबई - Here I come
खरे तर मुंबई मध्ये आल्या आल्या जे दिसले ते वहीत नोंद झाले होते पण इथे लिहायला मार्ग उपलब्ध नव्हता. आता रूमवर नेट आहे. सारे वहीतले मनातल्या सोबत हळू हळू बाहेर येईल.
सुरुवात करू या मायानगरीत आल्यावर सुचलेल्या पहिल्याच ओळींनी--
आले किती गेले किती आम्ही फक्त पहात होतो
ऑटो मधल्या मिठ्या आणि खरे खोटेपणा ,
मोजत होतो काही कर्तव्यमग्न ओठ , गुंतलेले हात
जवळजवळ नसलेलेच अंतर आणि
ब-याचशा अंतरांतील फसवेपणा.....
--- bandstand road, Mumbai (16 Aug, 10)
Subscribe to:
Posts (Atom)