Thursday, November 21, 2019

तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला -– विंदा करंदीकर

तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला ।।
तो झाला सोहळा। दुकानात.

जाहली दोघांची । उराउरी भेट
उरातलें थेट । उरामध्ये

तुका म्हणे “विल्या। तुझे कर्म थोर;
अवघाचि संसार । उभा केला।।”

शेक्सपीअर म्हणे । एक ते राहिले; ।
तुका जे पाहिले विटेवरी.”

तुका म्हणे, “बाबा ते त्वां बरे केले,
त्याने तडे गेले। संसाराला;

विठठ्ल अट्टल, । त्याची रीत न्यारी
माझी पाटी कोरी । लिहोनिया.”

शेक्सपीअर म्हणे । तुझ्या शब्दामुळे
मातीत खेळले । शब्दातीत

तुका म्हणे गड्या । वृथा शब्दपीट
प्रत्येकाची वाट । वेगळाली

वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच.

ऐक ऐक वाजे । घंटा ही मंदिरी।
कजागीण घरी । वाट पाहे.”

दोघे निघोनिया गेले दोन दिशां
कवतिक आकाशा आवरेना ।

Thursday, November 14, 2019

ढळताच एक अश्रू, बोलेल राख माझी - आनंद पेंढारकर

ढळताच एक अश्रू, बोलेल राख माझी
सरलो कसा कसा मी, सांगेल राख माझी

हातात हात माझ्या होता कधी तुझाही
इतकीच फक्त कबुली मागेल राख माझी

संपून जन्म गेला जे मांडता न आले
ते विषय जीवघेणे टाळेल राख माझी 

फिर्याद थांबलेली ओठी असेल सुद्धा
पण आब गुंतल्याची राखेल राख माझी

जाता निघून सारे कर स्पर्श एक हलका
बघ ओलसर जराशी वाटेल राख माझी

निःश्वास टाकल्यावर, वळशील तू निघाया
पायास त्या क्षणाला माखेल राख माझी

नजरेपल्याड जेव्हा होशील सावरूनी
हलकेच शेर हळवा मांडेल राख माझी

आनंद पेंढारकर

Thursday, November 7, 2019

तुझी आठवण सहज निघाली - चिंतामणी जोगळेकर

तुझी आठवण सहज निघाली
कुठे दूर चुकचुकल्या पाली

कुणी म्हणाले रडू नको रे
डोळ्यामध्ये धूळ उडाली

वाट पाहुनी थकवा आला
समई मधली ज्योत निमाली

सांग जरा तू लपून कोठे
विस्तव थोडा राखेखाली

थकले आता पायच माझे
बसून एका झाडाखाली

भेट घडावी वाटत असते
साद न कोणी कोणा घाली

दूर कुठेशी थंडी पडली
इथे उगा घुसमटल्या शाली

©चिंतामणी जोगळेकर

Friday, November 1, 2019

लळा-जिव्हाळा, रुसवा-फुगवा, राग वगैरे - अनिल आठलेकर

लळा-जिव्हाळा, रुसवा-फुगवा, राग वगैरे
तुझ्या नि माझ्या आयुष्याचा भाग वगैरे

कुणी वेडसर बनवत जातो नवीन वाटा,
काढत बसते दुनिया नंतर माग वगैरे

एक शहारा अलगद येतो तुझा पहाटे,
म्हणून होते सकाळ... येते जाग वगैरे

काय गाडले आहे नक्की मौनाखाली?
फुत्कारत आहेत विचारी नाग वगैरे

जंगल-बिंगल मधे फालतू हवे कशाला?
तोडू, कापू शिसम, बाभळी, साग वगैरे

तसा खरा आनंदी आहे स्वभाव माझा
दृष्ट न लागो म्हणून हा.. वैताग वगैरे

पायाखालिल जमीन सरकत आहे माझ्या
काय करू घेऊन तुझा भूभाग वगैरे ..

~ अनिल विद्याधर आठलेकर