Saturday, November 27, 2010
रस्सीखेच
रक्ताळल्या हातांचे सांगणे हेच आता
मी घेतलेत काटे तू फुले वेच आता
याच्यात प्राण नाही त्यालाही कान नाही
सारी मुखे पहातो मी मुक्यानेच आता
प्यादे पळून गेले फासे झिजून गेले
डाव चल उभारू हा नव्यानेच आता
आम्ही कधी न केले कोणास दार बंद
ये वारीयासवेने सारे खुलेच आता
उपमा नवीन शोधा आता जनावरांना
आहेत हिंस्त्र झाली हि माणसेच आता
निवडून कोण आला खड्ड्यात त्यास घाला
मंत्री कुठे धनाचे ते बाहुलेच आता
दरवाढ पृथ्वीवरी स्वर्गात नाही जागा
नरकात सूट आहे जावे तिथेच आता
फेडूनिया कटीचे माथ्यास बांधलेले
कर 'डोळेझाक' दुनिये 'ते' नागवेच आता
उस्फुर्तला कवी नि प्रतिभेस पूर आला
उतरती शब्द पानी हे ओळीनेच आता
हासला विदुषक पाहून आसवे का ?
कि भासती मुखवटे चेहरेच आता
ओठात तुझ्या काही अर्थात काही बाही
होती सवाल सारी का उत्तरेच आता ?
या क्षणी पास येशी त्या क्षणी दूर जाशी
अर्थ काय याचा ? ( मज नवा 'पेच' आता )
शब्दांसवे असा का तू खेळशी 'विशाला'
झाली पुरे रोख ना हि 'रस्सीखेच' आता
------विशाल
Friday, November 26, 2010
निर्वाणीच्या क्षणामध्ये
निर्वाणीच्या क्षणामध्ये हे भडकून उठले बाहू
आम्ही निघालो कोण आडवे येतो आता पाहू
असेल हिम्मत तर दाखवा वाट आमची अडवून
बांधून ठेवा , डांबून ठेवा , ठेवा अथवा गुंतवून
मोहमायेचा पाश एकही उपयोगी पडणार नाही
निघून गेलो कधी तुम्हातून, तुम्हासही कळणार नाही
रडतील खडतील पडतील थोडे आसू आमुच्यासाठी
जेव्हा होईल कलेवराची राख नदीच्या काठी
शांतही होतील लगेच आमचा विझण्याआधी जाळ
विसरून जातील पुन्हा हळू हळू सरेल जैसा काळ
बनून तारका नभामधुनी लक्ष ठेउनी राहू
पण या समयाला कोण आडवे येतो आता पाहू
------- विशाल
Wednesday, November 24, 2010
Tuesday, November 23, 2010
ती आहे ... तिथेच आहे ...
ती आहे ...
तिथेच आहे ...
मी फिरतो इकडे तिकडे
मेंदूचे पडती तुकडे ....
ती आहे ...
तिथेच आहे ...
मी उगाच करतो त्रागा
नाही होत रिकामी
पण तिच्याजवळची जागा ....
ती आहे ...
तिथेच आहे ...
मीच जो वेगळा पडतो
ती अस्खलित जातीची
मी शब्दशब्दास अडतो ...
ती आहे ...
तिथेच आहे ...
मज तरीही येतो राग
सांगावे कसे तिला हे
कि जरा वेगळे वाग...
ती आहे ...
तिथेच आहे ...
मज ठाऊक खूप शहाणी
हसते गालात हळूच
ओळखून माझी कहाणी ...
ती आहे ...
तिथेच आहे ...
---- विशाल
Thursday, November 18, 2010
मुंबई - Here I come
खरे तर मुंबई मध्ये आल्या आल्या जे दिसले ते वहीत नोंद झाले होते पण इथे लिहायला मार्ग उपलब्ध नव्हता. आता रूमवर नेट आहे. सारे वहीतले मनातल्या सोबत हळू हळू बाहेर येईल.
सुरुवात करू या मायानगरीत आल्यावर सुचलेल्या पहिल्याच ओळींनी--
आले किती गेले किती आम्ही फक्त पहात होतो
ऑटो मधल्या मिठ्या आणि खरे खोटेपणा ,
मोजत होतो काही कर्तव्यमग्न ओठ , गुंतलेले हात
जवळजवळ नसलेलेच अंतर आणि
ब-याचशा अंतरांतील फसवेपणा.....
--- bandstand road, Mumbai (16 Aug, 10)
Saturday, August 7, 2010
दादांची मिश्किली
मध्यंतरी श्री दादा कोंडके यांचे 'सोंगाड्या' हे आत्मचरित्र वाचनात आले. आपल्यावर सतत होणारा द्वयर्थी विनोदाचा आरोप खोडून काढताना दादांनी अत्यंत समर्पक उदाहरणे देऊन आपल्या हजरजबाबीपणाची प्रचीती दिली आहे. ते म्हणतात ---
मोठमोठ्या कवींना शब्दांची गम्मत करण्याचा मोह आवरलेला नाही. मोरोपंत हे महान कवी होते कि नाही ? होतेच . त्यांच्या आर्या अतिशय गाजलेल्या आहेत कि नाही ? आहेतच . मग त्यांनीच केलेल्या एका आर्येचे उदाहरण घेऊ या ..
.
" स्व स्त्री घरात नसता कंडू शमनार्थ रंडीरा खावी |
ती हि नसता , स्वहस्ते चीबुल्ली दाबावी || "
.
आता यात थोडे संस्कृत आहे म्हणून अर्थ सांगितला पाहिजे . कंडू म्हणजे खोकला आणि रंडीरा म्हणजे खडीसाखर . अर्थ असा आहे कि स्वत:ची बायको घरात नसली आणि खोकला आला तर काय करावं ? तर खडीसाखर खावी . तीही म्हणजे खडीसाखर घरात नसली तर चीबुल्ली म्हणजे कंठमणी . तो हाताने थोडा दाबावा . अर्थ किती सरळ सोपा आहे कि नाही ? पण याच आर्येतील 'रंडीरा' या शब्दातला 'रा' जर पुढच्या शब्दाला जोडला आणि 'चीबुल्ली' मधला ची जर आधीच्या शब्दाला जोडला तर काय अर्थ होईल ? मी तो सांगायची गरज नाही. आपल्या सगळ्यांना तो कळू शकतो.मोरोपंत सारख्या जाड्या विद्वानाने अशी शब्दांची गम्मत का करावी ? तर त्यात मजा आहे म्हणून . हि जी मजा आहे ती आयुष्यात गम्मत आणते
.
आता एका गो-या कवीची गम्मत पहा . गो-या चमडीच सगळ चांगल वाटत म्हणून सांगतोय
.
एक तरुणी म्हणते .........त्याने मला सोफ्यावर निजवून प्रयत्न केला ,
खुर्चीवर बसवून प्रयत्न केला ,
खिडकीच्या कठड्यावर बसवून त्याने जमत का ते पहिले ,
पण त्याला यश आलं नाही .......
मग त्याने मला खाटेवर झोपवून प्रयत्न केला ,
मला भिंतीला टेकवून उभी केली ,
मी जमिनीवर बसलेदेखील , पण तरीही जमेना ,
त्याने असा प्रयत्न करून पहिला ,
त्याने तसा प्रयत्न करून पहिला ,
पण जमेचना .....
खरोखर हसून हसून माझी मुरकुंडी वळली ,
त्याची ती धडपड पाहून ,
माझा फोटो काढण्याची .........
.
आहे कि नाही गम्मत ? गंमतीच असंच असत . ती आपल्या मनात असते . करणा-याच्यात असतेच असे नाही .
कुसुमाग्रज
दानवीकरण घडते वारंवारतेने
देवदूतीकरणासाठी मात्र
करावी लागते प्रतीक्षा दीर्घकाल
त्या एका आश्वासनावर
भिस्त ठेऊन -
" संभवामि युगे युगे "
------- कुसुमाग्रज
Friday, August 6, 2010
कृष्णएकांत
झाडाप्रमाणे असे झाड हेही असे सांगते ती ,तरी हुंदका ?
इथे बासरीच्या गडे आतड्याला हवा चंदनी लाकडाची नवी;
तुला रुक्मिणी का फुले वेचताना सुगंधात हि भेटते वाळवी ?
संहार आता करा यादवांचे जुनी राजधानी रिकामी करा ;
रथाला कुणी अश्व देऊ नका अन शिरच्छेद माझे कसे हि धरा
वैराण आयुष्य झाले तरीही फुलांना कुणी बोल देऊ नये;
मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या गवाक्षातला चंद्र झाकू नये .
नको धाक घालू नको हाक तोलू इलाख्यातली गुप्त झाली नदी ;
निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो खुनाच्या कटातूनहि पारधी .
जिथे कृष्णएकांत देठात प्राजक्त राधेस हा रंग येतो कसा ?
सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा .
------- ग्रेस
Sunday, August 1, 2010
Happy Friendship Day
आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार . Friendship Day खरे तर मला एक समजत नाही मैत्रीसाठी हा एकच दिवस विशेष का मनवायाचा ? मैत्री तर आयुष्यभरासाठी असते ना ? मग ? पण आजच्या दिवशी येणारे message पाहिले कि कळते. हा दिवस जवळच्या मित्रांसाठी नसून जे लांब आहेत म्हणजे जे वर्षभर संपर्क करत नाहीत पण यादिवशी आपली मैत्री अशी आहे तशी आहे वगैरे संदेश पाठवतात त्यांच्यासाठी हा दिवस विशेष आहे . जाऊ दे आहे तर आहे
जो बोता है वो पाता है अपने बाप का क्या जाता है
.
पण तरीही यादिवशी जेव्हा संपूर्ण जग Happy Friendship Day चा नारा लावत आहे आपण एक कविता तर पोस्ट करू शकतोच ना
(खास माझ्या मित्रांसाठी : मंगल , मंगेश ,सौगंध , चिराग , इरफान, अपर्णा आणि वगैरे वगैरे )
.
जेव्हा ओसाड भासू लागते गजबजलेले गाव ,उलटे पडतात सगळेच फासे उधळून जाती डाव ,
प्रेम नाती सा-यांचा होतो झूठा बनाव ,
स्वतालाच लागत नाही स्वताचाच ठाव ,
मलम ही पडते अपुरे भराया जेव्हा हृदयीचे घाव ,
अशावेळी ओठी येते मित्रा फक्त तुझे नाव ...
------विशाल
Saturday, July 31, 2010
दिस एक जात नाही By समर्थ देर्देकर
हे गाणे माझा मित्र समर्थ देर्देकर याने आम्ही बी ई च्या शेवटच्या वर्षात असताना लिहिले होते आणि तेच त्याच्या आवाजात त्याने बसविलेल्या चालीवर ऐकताना फार मजा यायची. त्याची आठवण सांगताना तो म्हणतो कि कुठल्याश्या घाटातून डोंगरावरून जात असताना पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग आणि उन्ह सावलीचा खेळ पाहताना अचानक कुणाची तरी आठवण यावी आणि मन म्हणावे ---
समर्थ देर्देकर |
दिस एक जात नाही आठवाविना तुझ्या गं
अन तुझ्याबिगर न जाई पाणी आणि घास
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास . . .
.
.
भर उन्हातील तुझा शीतल सहवास सखे
मऊ मातीतील तुझ्या पाउलखुणा
सरी सरी मोजताना चिंब चिंब नेत्र तुझे
हा भिजला क्षण न कधी येईल पुन्हा
अजूनही दरवळतो मनी अंतरात सखे
तुझ्या त्या बटांचा तो घमघम सुवास
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास
.
.
नाजूक नाजूक तुझ्या हातातील हात माझा
आणिक तव गालांवरील रक्तिमा
सांज सांज ढळताना सौम्य तुझ्या नेत्रातील
अजूनही स्मरतो मज पूर्ण चंद्रमा
अजूनही आठवतो तुझा धुंद श्वास सखे
अशा क्षणी होई मग जिंदगी उदास
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास
.
.
दिसे सप्तरंगी जादू दूर क्षितीजावरी
रंगुनी रंगात त्याच विसरुनी जातो स्वतास
शोधतो दिशात तुझा गंध कस्तुरी
चाले किती दिवस मास ठाऊक ना या मनास
हा असा अखंड आणि एकटा प्रवास
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास
----------- समर्थ देर्देकर
शहादत
सुखात कोसळत होता, दु:खात निनादत आहे
पाउस कुणाचा साथी.. रोजचीच आदत आहे
हा शब्दखेळ का सोपा ? लागावे कोणी नादी
संधान क्षेत्रपार्थांना जेमतेम साधत आहे
संपले जरी हे श्वास, संपली तरी ना आस
जगण्यावरती आता या मी स्वतास लादत आहे
गडे जगापलीकडले हे असे आपुले नाते
तू तिथे उमललीस आणि मी इथे आल्हादत आहे
कोण कसे बलीदानी ज्याचे त्याने ठरवावे
माझ्यासाठी हे माझे जगणेच शहादत आहे ..
-----विशाल
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .
ते जातात शिवालयी
मी मादिरालायी
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .
ते सदा नामजपात दंग
मी नेहमी प्याल्यात धुंद
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .
ते स्वताला म्हणवून घेतात
भक्त , विरक्त , योगी , जोगी
मी मात्र म्हणवतो
आसक्त , आरक्त , अनुरक्त ,भोगी
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .
ते माळतात रुद्राक्ष कंठी
मी त्याच कंठाखाली रिचवतो द्राक्षबेटी
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .
त्यांना त्यागायचा आहे संसार
मिळवायला मुक्तता
मी तर कधीच विसरलोय दुनिया ..
मग याहून वेगळी काय असते मुक्तता
मग आता तुम्हीच सांगा काय फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .
----- विशाल
त्या रात्री पाउस होता
त्या रात्री पाउस होता
अन गात्रांमध्ये थरथर
जवळजवळ सरलेले
दोघांमधले अंतर
त्या रात्री पाउस होता
ओलावा चिंब हवेतून
पण पेटत होती काया
त्याच्या उबदार कवेतून
त्या रात्री पाउस होता
अन हरले होते भान
ओठ बंद ओठांनी
श्वासातून उमटे तान
त्या रात्री पाउस होता
जागच्याच जागी थिजला
थेंबात मिसळला घाम की
घामाने थेंबहि भिजला
त्या रात्री पाउस होता
साचून बंद डोळ्यात
वेदना असो वा हर्ष
सारेच खोलवर आर्त
त्या रात्री पाउस होता
तो खराच किंवा भास
दरवळला तो जाईचा
की धुंद तुझाच सुवास
त्या रात्री पाउस होता
---- विशाल
---- विशाल
Saturday, July 24, 2010
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन्ह पडे "
प्रत्येक वर्षी श्रावण येतो ते ओठावर हे गाणे घेऊनच. तसे पाहता मराठी महिन्याप्रमाणे श्रावण सुरु व्हायला अजून काही दिवस जायचे आहेत पण वातावरणात श्रावणाचा प्रवेश झाल्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. थोडी रिमझिम थोडी उघडीप चालू झालीच आहे . मला श्रावणाची नेहमी गम्मत वाटते म्हणजे बघा ह आज सकाळपासून पाउस थांबला होता म्हणून तिला भेटून यावे म्हंटले आणि दारातून पाय बाहेर न काढतो तोच हा मुसळधार सुरु. काल छत्री घेऊन बाहेर पडलो तर एक थेंबही आला नाही. त्याला कसे कळते असे त्रास द्यायचे.पण खरच हा त्रास आहे का ?अरे त्यामुळे तर आपल्याला भिजायची गम्मत कळते. पाउस नाही म्हणून बाहेर पडायचे... तिला भेटायचे.... तेवढ्यात पाउस सुरु... मग बोलणे लांबच... आडोसा शोधायचा... . तिच्या गालावर तोवर दोन टपोरे थेंब ओघळलेले... त्याची तारीफ करावी तर ती वळचणीतून पडणा-या पाण्याशी खेळण्यात दंग... . नंतर एवढा वेळ पावसात कुठे होतीस म्हणून आई विचारेल आता निघायला हवे म्हंटल्यावर तिला निरोप द्यायचा.... . बर घरी भिजत एकटी कशी जाणार म्हणून स्वताच्या पैशाने रिक्षा करून द्यायची . आणि आठवणी साठवून चिंब ओले होऊन घरी परतायचे ..... खरेच दरवर्षीचा श्रावण बरेच काही देऊन जातो नाही .
अशा या श्रावणाचे वर्णन श्री सुरेश वाडकरांनी गायलेल्या या छानश्या गाण्याशिवाय पूर्ण झाले असे वाटतच नाही. मग करूया ना त्याच गाण्याने श्रावणाचे स्वागत... |
|
कधी रिमझिम....
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
कधी टपो-या थेंबांचा आला ऋतू आला
कधी पुलकित हर्षाचा, हळव्या क्षण स्पर्शाचा
आला ऋतू आला ऋतू आला ऋतू आला
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
पानावर थिरकत नाचे पाणी
मनामध्ये झुलतात गाणी दिवाणी
साद गांधाळूनी, ओल्या मातीतुनी
आला ऋतू आला ऋतू आला
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
अंग अंग स्पर्शताती मोती रुपेरी
आठवे ती अनावर भेट अधुरी
मन चिंब ओले, शहारत बोले
आला ऋतू आला ऋतू आला
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
हा पाऊस वागे तुझ्यासारखा
हा येतो नि जातो तुझ्यासारखा
ऊन पावसाचा, खेळ श्रावणाचा
आला ऋतू आला ऋतू आला
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
Friday, July 23, 2010
|| श्री गणेशाय नमः ||
श्री गणेशा झाला ,ब्लॉग लिहायला चालू केला खरा पण सुरुवात कशाने करता येईल तेच समजत नाही. कारण ब्लॉगच नावच ठेवलंय ना ' तुम्ही म्हणाल तसं ' मग लिहिताना प्रत्येक वेळी विचार करावाच लागणार ना कि तुम्ही काय म्हणाल ?.
असो ...
सुरुवात मी माझ्या आणि संपूर्ण मराठी रसिकांच्या लाडक्या गझल सम्राट श्री सुरेश भट यांच्या काही ओळींनी करतो . पहा आवडल्या तर -
" आता कुठे वासनेस माझ्या फुलोर आला ||
आता कुठे काळजातला कल्लोळ मत्त झाला ||
आता कुठे अमृतातला मी तरंग झालो ||
आता कुठे लागली तुझी काळजी विषाला || "
Subscribe to:
Posts (Atom)