Saturday, July 31, 2010

दिस एक जात नाही By समर्थ देर्देकर

हे गाणे माझा मित्र समर्थ देर्देकर याने आम्ही बी ई च्या शेवटच्या वर्षात असताना लिहिले होते  आणि तेच त्याच्या आवाजात त्याने बसविलेल्या चालीवर ऐकताना फार मजा यायची. त्याची आठवण सांगताना तो म्हणतो कि कुठल्याश्या घाटातून डोंगरावरून जात असताना पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग आणि उन्ह सावलीचा खेळ  पाहताना अचानक कुणाची तरी आठवण यावी आणि मन म्हणावे ---


समर्थ देर्देकर


दिस एक जात नाही आठवाविना तुझ्या गं 
अन तुझ्याबिगर न जाई पाणी आणि घास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास . . . 
.
.
भर उन्हातील तुझा शीतल सहवास सखे 
मऊ मातीतील तुझ्या पाउलखुणा 
सरी सरी मोजताना चिंब चिंब नेत्र तुझे 
हा भिजला क्षण न कधी येईल पुन्हा 
अजूनही दरवळतो मनी अंतरात सखे 
तुझ्या त्या बटांचा तो घमघम सुवास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास 
.
.
नाजूक नाजूक तुझ्या हातातील हात माझा 
आणिक तव गालांवरील रक्तिमा 
सांज सांज ढळताना सौम्य तुझ्या नेत्रातील 
अजूनही स्मरतो मज पूर्ण चंद्रमा 
अजूनही आठवतो तुझा धुंद श्वास सखे 
अशा क्षणी होई मग जिंदगी उदास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास  
.
.

आठवांचा वळीव असा कोसळे उन्हात
दिसे सप्तरंगी जादू दूर क्षितीजावरी
रंगुनी रंगात त्याच विसरुनी जातो स्वतास 
शोधतो दिशात तुझा गंध कस्तुरी
चाले किती दिवस मास ठाऊक ना या मनास 
हा असा अखंड आणि एकटा प्रवास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास 

----------- समर्थ देर्देकर 

1 comment: